'सैराट'ने केला १.२ बिलियनचा टप्पा पार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2021
Total Views |

Sairat_1  H x W
 
मुंबई : 'आधुनिक काळातील क्लासिक' म्हणून नावाजण्यात येणाऱ्या 'सैराट' संगीताच्या झी म्युझिक कंपनीच्या अल्बमने २०१६ साली सुरुवातीपासूनच प्रसिद्धीची उत्तुंग शिखरे गाठली. ताजेतवाने करणारा साउंडट्रॅक, महाराष्ट्राचे लोकसंगीत व पाश्चिमात्त्य सिम्फोनिक म्युझिक यांचा अप्रतिम मिलाप यामुळे आजही हा अल्बम अतिशय लोकप्रिय आहे. आता या गाण्याने १.२ बिलियनचा टप्पा पार केला आहे.
 
 
झी म्युझिकचे मुख्य व्यवसाय अधिकारी अनुराग बेदी यांनी सांगितले, "सैराटच्या संगीताला युट्युब आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर १.२ बिलियनपेक्षा म्हणजेच १२००० लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आणि स्ट्रीम्स मिळाले आहेत. खूप मोठी बाब आहे आणि हा ‘आजवरचा सर्वात महान मराठी अल्बम’ ठरला आहे. मोठमोठ्या बॉलिवूड हिट्सला मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. अतिशय लोकप्रिय 'झिंगाट'च्या हिंदी गाण्याला देखील ५०० मिलियनपेक्षा जास्त युट्युब व्ह्यूज् व स्ट्रीम्ससह खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. अजय आणि अतुल हे आजच्या काळातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक असून प्रचंड लोकप्रिय आहेत. आजही जगभरातील चाहते हा अल्बम आवर्जून ऐकत असतात."
 
 
हॉलिवूडमध्ये लाईव्ह सिम्फनी ऑर्केस्ट्रासोबत संगीत रेकॉर्ड करण्यात आलेला पहिला भारतीय सिनेमा म्हणजे सैराट! या अल्बममधील प्रत्येक गाणे प्रेमाची नवी अनुभूती मिळवून देते. वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या दोन युवा प्रेमीजीवांची नाजूक प्रेमकहाणी या गाण्यांमधून अलवार गुंफली गेली आहे. यातील 'झिंगाट' हे गाणे वाजू लागताच पाय थिरकणार नाहीत असा रसिक जगात शोधून सापडायचा नाही.'याड लागलं' हे अल्बममधील पहिलेच गाणे खऱ्या अर्थाने जादुई आहे, कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा-पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. 'आताच बया का बावरलं' हे गाणे कानावर पडताच मनात प्रेम रुंजी घालू लागते तर 'सैराट झालं जी' हे गाणे सतत गुणगुणले जाते.
 
 
राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार अजय-अतुल यांच्या मोहक संगीतामुळे हा अल्बम मराठी भाषिक नसलेल्या श्रोत्यांमध्ये देखील प्रचंड लोकप्रिय ठरला. अल्बमच्या यशाबद्दल अजय-अतुल यांनी सांगितले, "आजही या अल्बमला श्रोत्यांकडून एवढे प्रेम आणि वाहवा मिळत आहे हे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. फक्त मराठी सिनेमातच नव्हे तर, संपूर्ण भारतीय चित्रपट क्षेत्रात या अल्बमने जो उत्तुंग मापदंड निर्माण केला आहे तो गाठणे आम्हाला आता शक्य झाले आहे. या साउंडट्रॅकला रसिकांनी इतके प्रेम दिले आणि चित्रपट क्षेत्रात नवनवे मापदंड रचण्यात याची मदत केली याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत."
 
 
@@AUTHORINFO_V1@@