मराठीतील पहिली जागतिक कोविड परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2021
Total Views |

Global Covid conferance _ 

 
 
 

विवेक समूह व मुंबई तरूण भारतचा उपक्रम, १२ जून रोजी थेट प्रक्षेपण

 
 
मुंबई : कोविड महामारी विरोधातील जागतिक लढाईच्या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध देशांत कार्यरत असलेले मराठी मान्यवर सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित उद्योजक - व्यावसायिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे विचारमंथन घडवून आणणारी मराठीतील पहिली 'जागतिक कोविड परिषद' साप्ताहिक 'विवेक' समूह व दै. 'मुंबई तरूण भारत'च्या वतीने शनिवार, दि. १२ जून रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन माध्यमातून थेट प्रक्षेपण होणाऱ्या या परिषदेला १५ देशांतील मराठी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
 
 
साप्ताहिक विवेक व महाएमटीबीच्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या जागतिक कोविड परिषदेचे थेट प्रक्षेपण होईल. या परिषदेचे उद्घाटन भारताच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांच्या भाषणाने होईल. तसेच ज्येष्ठ विज्ञानकथा लेखक व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कम्युनिकेशनचे माजी संचालक डॉ. बाळ फोंडके हेही यावेळी उपस्थित असतील. तसेच, या परिषदेला अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, नायजेरिया, केनिया, दुबई, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आदी देशांतील विविध मराठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मूळचे महाराष्ट्रातील परंतु गेली अनेक वर्षे त्या देशात वास्तव्य असलेले, तेथील प्रतिष्ठित उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर्स म्हणून ख्याती असलेले व विविध सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवाराशी संबंधित संस्था - संघटना, महाराष्ट्र मंडळे आदींच्या माध्यमातून सामाजिक जीवनात सक्रिय असलेले मान्यवर समाविष्ट आहेत. तसेच, या परिषदेचा समारोप 'गर्जे मराठी ग्लोबल' या जागतिक स्तरावर कार्यरत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांच्या संबोधनाने होणार आहे.
 
 
संबंधित देशातील कोविड प्रादुर्भावाचे वर्तमान स्वरूप व गेल्या वर्षभरातील घडामोडी, लसीकरणाची सद्यस्थिती, तेथील सरकारने कोविडकाळात घेतलेली भूमिका व केलेलं काम, तेथील आरोग्य यंत्रणा, अर्थव्यवस्था, जनजीवन आदींवर झालेला परिणाम, कोविड काळात संबंधित देश व भारत यांचे संबंध अशा विविध मुद्द्यांवर या जागतिक कोविड परिषदेत सखोल व अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. कोरोना-कोविड विरोधातील जागतिक लढाईत या परिषदेच्या माध्यमातून एक नवा दृष्टिकोन मिळावा, परस्पर संवाद व सहकार्याच्या माध्यमातून नवे बळ मिळावे याकरिता व या सर्व प्रक्रियेतील एक दुवा काम करण्याकरिता विवेक समूहाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून या जागतिक कोविड परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्व वाचक-दर्शकांनी शनिवार, दि. १२ जून रोजी दुपारी ४.०० वाजता आपल्या फेसबुक व युट्यूब अकाऊंटद्वारे या जागतिक कोविड परिषदेला ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन विवेक समूहाद्वारे करण्यात आले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@