कुंपणच शेत खातंय!

07 Jun 2021 12:26:51

PRAVIN DARKAR AAREY_1&nbs

वरळीतील वृक्षतोड प्रकरणावरून विरोधकांचे सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र


मुंबई : पर्यावरण दिनाच्या दिवशीच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी येथे झालेल्या वृक्षतोडीवरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार निशाणा साधला आहे. वरळीत झालेल्या वृक्षतोडीची मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवार, दि. 6 जून रोजी जाऊन पाहणी केली. या पाहणी दौर्‍यादरम्यान त्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल केला. कुंपणच शेत खाण्याचा हा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी यावेळी केली.
 
 
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात पर्यावरण दिनी झालेल्या वृक्षतोडीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा राजकीय सामना रंगलेला असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवार, दि. ६ जून रोजी वरळीत झालेल्या या वृक्षतोडीच्या पाहणीसाठी विशेष दौरा केला.


आपल्या पाहणी दौर्‍यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या प्रकारावरून सत्ताधार्‍यांवर टीका करताना दरेकर म्हणाले की, “पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल झाली. हा म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असून याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे. मुंबई मनपा व पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच झाडांची अमानुष कत्तल करण्याची हिंमत वृक्षशत्रू दाखवू शकले. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.



दरेकर पुढे म्हणाले की, “वृत्तपत्रांमधून जागतिक पर्यावरण दिनाची पानभर जाहिरात देणार्‍या पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघात रात्रीच्या अंधारात झाडांची अमानुष कत्तल करण्यात आली. नेमका कशासाठी हा घाट घालण्यात आला. होर्डिंग दिसावेत म्हणून की, कंत्राटदारांचे हित साधण्यासाठी?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “बेंबीच्या देठापासून मेट्रो कारशेडला विरोध करणारे, या प्रश्नाचे आता उत्तर देतील का?” असा जोरदार चिमटाही यावेळी दरेकर यांनी सत्ताधार्‍यांना काढला.


“या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे की, या भागात काही होर्डिंग्ज आहेत, त्याला ही झाडे अडसर ठरत होती. त्यामुळे ही झाडे कापण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. मला वाटते यावर कडक कारवाई झाली पाहिजे. केवळ दोन दिवस वातावरण संतप्त आहे म्हणून, कारवाई सुरू आहे असे दाखवून जमणार नाही. इथल्या नागरिकांनीदेखील माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे सर्व पुरावे असल्याने, याआधारे दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल करून, कारवाई झाली पाहिजे.


याचबरोबर माझी तर मागणी राहील, महापालिकेचे वृक्ष प्राधीकरण असेल किंवा मुंबई महापालिकेचे जे जबाबदार अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण, झाडांच्या फांद्या आडव्या आल्या व नागरिकांनी तक्रार केली तर दोन-दोन महिने वेळ नसतो. त्या फांद्या पडून घरांचे नुकसान होते, माणसं मरतात आणि आता सकाळी कुणीतरी येते व सर्रास कत्तल करतात. कोणालाही पाठीशी घालायचे कारण नाही.


आम्ही कुणावरही वैयक्तिक रागापोटी आलेलो नाही. परंतु, हा पर्यावरणमंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथेच जर कुंपणच शेत खायला लागले, तर शेवटी नागरिकांनी कुणाकडे अपेक्षेने पाहायचे. म्हणून मुंबईचे आमचे भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह मी पाहणी करण्यासाठी आलो आहे. अत्यंत हृदयद्रावक असे चित्र आहे. आज एकीकडे ‘ऑक्सिजन’ कमतरता व वृक्षारोपणाची आवश्यकता असताना, झाडे तोडणे हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे कृत्य आहे. याचा जाब विचारला जाईल, पोलिसांनादेखील तशा प्रकारच्या कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांनीदेखील आम्हाला कडक कारवाईबाबत शब्द दिला आहे,” असे दरेकर यावेळी म्हणाले.

आरोप सिद्ध करण्याचे महापौरांचे आव्हान
 
 
दरम्यान, विरोधकांच्या आरोपाला शिवसेनेनेदेखील प्रत्युत्तर दिले आहे. “आरोप सिद्ध करा,” असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दरेकरांना दिले आहे. “याचबरोबर झाडे कापणार्‍यांचा पोलीस शोध वरळीतील वृक्षतोड प्रकरणावरून विरोधकांचे सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र सोडले आहे."
Powered By Sangraha 9.0