उशिरा का होईना; पण अखेर शहाणपण सुचले!

    दिनांक  07-Jun-2021 13:36:22
|


CHINJA_1  H x W

आपल्या ९० टक्के सैनिकांना सीमेवरून माघारी बोलावण्याचा चीनचा निर्णय पूर्व लडाखच्या सीमेवरील सैनिक मेटाकुटीला


केवळ १० टक्के नवे सैनिक तैनात आपल्या ९० टक्के सैनिकांना सीमेवरून माघारी बोलावण्याचा चीनचा निर्णय

लडाख : लडाखच्या सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करून भारताला वारंवार चिथावणार्‍या चीनला उशिरा का होईना; पण अखेर शहाणपण सुचले आहे.लडाखच्या सीमेवर तैनात करण्यात आलेल्या सैनिकांपैकी आपले ९० टक्के सैन्य माघारी बोलाविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. या सीमेवर आता केवळ दहा टक्केच सैन्य तैनात ठेवण्याचा निर्णय चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने घेतल्याची माहिती आहे. पूर्व लडाखमधील भागात असणार्‍या प्रतिकूल वातावरणात चिनी सैन्य अधिक काळापर्यंत तग धरू न शकल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समजते.

चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना या ठिकाणी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ९० टक्के सैनिक माघारी घेतले असून, नवे सैनिक तैनात केले आहेत. पूर्व लडाखमध्ये सीमेवर पहारा देताना चिनी सैनिकांची पुरती वाट लागली आहे. रक्त गोठवणार्‍या थंडीने चिनी सैनिकांचे पाय लडखडू लागले आहेत. या थंडीने प्रकृती बिघडल्यामुळे‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने ‘एलएसी’वर तैनात ९० टक्के सैनिकांना माघारी बोलावले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल, मे नंतरच्या तणावामुळे चीनने भारतीय सीमाक्षेत्रात तब्बल ५० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले होते. आता नव्याने तैनात करण्यात आलेल्या सैनिकांनाही वातावरणाशी जुळवून घेणे अवघड होत असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वीच चिनी सैन्याने पेंगाँग झीलवरून माघार घेतली होती. परंतु, आजही हे सैनिक त्या आसपासच्या भागात तैनात आहेत.
येथील डोंगराळ भागात उंचीवरील भागात थंडीमुळे सध्या कठीण परिस्थिती आहे.यामुळे चीनचे सैनिक थंडी आणि अन्य कारणांनी खूप त्रस्त झाले आहेत. पेंगाँग झील क्षेत्रात तैनात असताना चीन त्याच्या टेकड्यांवरील सैनिकांना दररोज बदलत होते. यामुळे त्यांच्या हालचाली खूप मंदावल्या होत्या.दुसरीकडे भारतीय सैन्य दोन वर्षांसाठी आपल्या जवानांना लडाखच्या उंच भागांत तैनात करते. तसेच वर्षाला ४० ते ५० टक्के जवानांना बदलले जाते. या परिस्थितीमुळे ‘आयटीबीपी’च्या जवानांचा कार्यकाळ कधी-कधी दोन वर्षांपेक्षा जास्त होतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.