जनमत मानसशास्त्रात विशिष्ट प्रकारच्या बाबींवर चिन्हे, घोषणा किंवा घोषवाक्यांचा प्रयोग सोशल मीडियाद्वारे केला जातो. तथापि, लोक एखाद्या विषयावर मते तयार करतील की नाही, हे त्यांच्या मूल्यांच्या मानसशास्त्रावर अवलंबून आहे. जेव्हा ही सर्वसामान्य मते त्यांच्या मूल्यांशी निगडित असतील, तेव्हा ती पक्की होतात.
साधारणपणे एखादा मुद्दा एकदा समजला की, काही लोक त्याबद्दल मत किंवा अमुक दृष्टिकोन बनवू लागतात. ही मतं लोकांनी इतरांकडे हळूहळू व्यक्त केली की, त्या विषयावर जनमत बनू लागते, प्रकट होऊ लागते. सर्वच लोक एखाद्या सार्वजनिक विषयाबद्दल विशिष्ट किंवा खास मत विकसित करतील असे नाही. काहींना स्वारस्य नसते, कल नसतो म्हणूनच अनेक वेळ जनमत एकसंघ भासले, तरी ते लोकांच्या भिन्नभिन्न रुची व मूल्यांवर आधारित असू शकते. याशिवाय अशा प्रकारची सर्वसामान्य विषयावरील मतप्रणाली एखाद्या कारणाने उपयुक्त ठरते का नाही, यावर ती व्यक्ती ती मते बाळगेल अन्यथा नाही. आज मीडियाचा व्याप व्यापक झाला आहे. बातम्या, वृत्तपत्रे, अभिप्राय रेडिओ, टेलिव्हिजन मीडिया यामुळे आधीच मनात असलेल्या मतांची व दृष्टिकोनाची पुष्टी होऊ शकते. मास मीडिया आणि सोशल मीडियामुळे सुप्त मानसिकता बळकट होत जाते आणि लोकांना स्वयंप्रेरित करीत जाते. राजकारणात विशेषत: निवडणुकीच्या काळात आपण भारतापासून आणि ‘डायनॅमिक’ प्रयोग पाहत आलो आहोत. मास मीडियामुळे एका टोकाकडची माहिती कुठल्याही देशाच्या दुसर्या टोकाला अगदी वार्याच्या वेगाने पसरते. राजकीय नेत्यांना यामुळे खूप अनुयायी मिळतात तरी किंवा ते दुसर्या पक्षात किंवा दुसर्या नेत्याकडे काम करायला निघून जातात. आज एखाद्या विषयावर अभिप्राय देणारे नेतृत्व केवळ सार्वजनिक जीवनातील प्रमुख व्यक्तींपुरते मर्यादित राहिलेले नाही.
एखाद्या खास किंवा विशिष्ट विषयावर प्रयत्न, मार्गदर्शन करणार्या व्यक्तीसुद्धाही अभिप्राय देण्याची भूमिका यशस्वी दृष्टीने पार पाडू शकतात. अशा व्यक्तींचा राजकारणात चपळाईने आणि परिणामकारक उपयोग करुन घेतला जातो. या व्यक्ती कधी प्रसिद्ध सिनेकलावंत असतात, खेळाडू असतात. काही सामाजिक अभियानांचे नेतृत्व करणारे असतात. एखाद्या व्यक्तीची मते तयार करण्यात त्याचा मानसशास्त्रीय ‘मेकअप’, वैयक्तिक परिस्थिती आणि त्याच्यावर असलेला सामाजिक प्रभाव या गोष्टींचा विचार शेवटी महत्त्वाचा आहे, म्हणूनच एखाद्या विषयांवरील लोकमत कसे विकसित होईल, कुठला आकार घेईल, हे सांगणे सामान्य गणिताहूनही गुंतागुंतीचे आहे. काही लोकमत विशिष्ट घटना, प्रसंग आणि तत्कालीन परिस्थितीद्वारे समजावून घेता येते, तथापि इतर प्रकरणांत ते अर्थबोधन तितके स्पष्ट असत नाही. किंबहुना, ते अधिक गुंतागुंतीचे असते. लोकांना प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जात असेल, तर त्यांचा स्वत:चा दृष्टिकोन बदलू शकतो. अनेक व्यक्तींशी जोडलेल्या काही खास घटना जसे की, नैसर्गिक आपत्ती मानव शोकांतिका, अंतर्गत समस्या लोकांची सर्वसामान्यपणे जागरुकता वाढवू शकते आणि लोकांचे मतपरिवर्तन होत जाते. आज लोकांच्या मतातील बदल उकलणे तज्ज्ञांना कठीण झाले आहे. कारण, एकापेक्षा अनेक घटक, त्यातही काही स्थानिक घटक महत्त्वाचे ठरतात.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगाच्या अनेक भागात धर्म, कुटुंब, लिंग, आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थव्यवस्था यांसारख्या जागतिक पातळीवरच्या विषयांमुळे लोकांमध्ये भावनिक आणि वैचारिक खळबळ माजली आहे. लोकांची या विषयांवरील मते आणि दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली आहे. ‘कोविड’च्या आजच्या महामारीत जागतिक ‘कनेक्टिव्हिटी’ सोशल मीडियामुळे अधिक वाढली आहे. त्यामुळे या सर्व बाबींमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे, हे निश्चित!
आज विधिमंडळातही ज्या महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घ्यावयाचा आहे, ती कोणतीही बाब एखाद्या महत्त्वाच्या सक्षम व्यक्तीने सार्वजनिक समस्या करायचा प्रयत्न केला, तर ती सार्वजनिक समस्या बनू शकते. कित्येक धार्मिक गट आणि कामगार संघटना त्यांच्या मतदारसंघामधील महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांची मते तयार करतात आणि ती पसरवतातही. हे गट विशेष करून सर्वसामान्य मुद्द्यांशी निगडित असलेल्या बाबींवर मास मीडिया, सोशल मीडिया आणि मौखिक संवादाद्वारेही कामे करतात. जगातील काही मोठे आणि समृद्ध गट या कामासाठी जाहिराती आणि जनसंपर्क वापरतात. जनमत मानसशास्त्रात विशिष्ट प्रकारच्या बाबींवर चिन्हे, घोषणा किंवा घोषवाक्यांचा प्रयोग सोशल मीडियाद्वारे केला जातो. तथापि, लोक एखाद्या विषयावर मते तयार करतील की नाही, हे त्यांच्या मूल्यांच्या मानसशास्त्रावर अवलंबून आहे. जेव्हा ही सर्वसामान्य मते त्यांच्या मूल्यांशी निगडित असतील, तेव्हा ती पक्की होतात. ही मूल्ये खूप लहानपणापासून लोकं जपत असतात. यात धार्मिक संकल्पना, विश्वास किंवा अविश्वास, नैतिक परिमाण आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. एकूणच काय तर व्यक्तीची मानसिक जडणघडण ही या सर्व घटकांवर अवलंबून असते.
- शुभांगी पारकर