मालवणात चिमुकल्यांनी दिले खवले मांजराला जीवदान: पर्यावरण दिनी गावासमोर आदर्श

05 Jun 2021 18:59:29

pangolin _1  H



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील सर्जेकोट गावातील लहान मुलांना शनिवारी जाळ्यात अडकलेले खवले मांजर आढळले. यावेळी चिमुकल्यांनी प्रसंगावधान राखून या खवले मांजराची माहिती वन विभागाला दिल्याने त्याला जीवदान मिळाले. प्रसंगी कोकणात छुप्यामार्गाने सुरू असलेल्या खवले मांजराच्या तस्करीच्या प्रकरणांना छेद देऊन या चिमुकल्यांनी समाजासमोर अशा दुर्मीळ प्राण्याच्या रक्षणाचे उदाहरण ठेवले आहे.

 
 
सर्जेकोट गावातील क्रिकेटच्या मैदानामध्ये शनिवारी सकाळी एक खवले मांजर आढळून आले. मैदानाभोवती लावलेल्या जाळ्यामध्ये हे खवले मांजर अडकले होते. यावेळी तिथे खेळण्यासाठी आलेल्या हर्ष पराडकर, ओंकार आचरेकर आणि नील आचरेकर या मुलांना ते खवले मांजर दिसेल. त्यांनी लागलीच ही माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी कुडाळाचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना कळविले असता परिमंडळ मालवणच्या कर्मचाऱ्यांनी त्याची जाळ्यातून सुखरूप सुटका केली. मालवणचे वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक कांदळगाव सारीक फकीर, वनमजूर अनिल परब, ग्रामस्थ यांनी बचावकार्य यशस्वी केले.

 
 
 
 
पशुवैद्यकीय अधिकारी मालवण दळवी यांच्याकडून खवले मांजराची तपासणी करण्यात आली. त्यानंतर खवले मांजराला नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्यात आले. ग्रामस्थांनी वेळीच वनविभागास माहिती दिल्याने खवले मांजराचा जीव वाचला. त्यामुळे अर्थाने जागतिक पर्यावरण दिन सार्थकी लागला. कोकणात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने खवले मांजराची तस्करी सुरू आहे. यासंबंधीची प्रकरणेही सातत्याने समोर येत आहेत. खवले मांजरांची तस्करी करणारे दलाल ग्रामस्थांना पैशांचे आमिष दाखवून या प्राण्याची शिकार करवून घेतात. अशा परिस्थितीत या चिमुकल्यांनी खवले मांजराला जीवदान दिले आहे. वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात खवले मांजरांना मोठी मागणी आहे. मात्र, भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत खवले मांजरांना संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांची शिकार, व्यापार, तस्करी आणि वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे.

Powered By Sangraha 9.0