पर्यावरण आणि भारतीय संस्कृती

05 Jun 2021 22:00:35

env_1  H x W: 0
 
इतर काही संस्कृतीत देवाने मानवाच्या उपभोगासाठीच ही पृथ्वी निर्माण केली, असे मानले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र मानव हा निसर्गाचा भाग आहे आणि निसर्गाचे रक्षण करणे, ही त्याचे आद्यकर्तव्य मानले गेले आहे.
 
 
दि. ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून आपण साजरा केला. पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, पर्यावरणविषयक समस्यांची ओळख होऊन सगळ्यांनी मिळून त्याबद्दल उपाययोजना करायला चालना मिळावी, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व सजीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन) घटकांचे आवरण. या सगळ्या घटकांच्या आंतर्क्रिया आणि एकमेकांवरील अवलंबिता मिळून परिसंस्था तयार होते. मानवदेखील याच पर्यावरणाचा एक घटक. पण इतरांपेक्षा अधिक बुद्धी असलेल्या मानवामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे. म्हणूनच जगभर पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपाययोजना व चर्चा सुरु झाली आहे.
 
 
 
भारतात मात्र अगदी प्राचीन काळापासून पर्यावरणाचा विचार केलेला आढळतो. भारतीय संस्कृती ही पर्यावरणपूरकच आहे. निसर्गातील झाडे, नद्या, पर्वत, भूमी, सूर्य, चंद्र इत्यादी घटकांना देवतास्वरूप मानून त्यांचे पूजन, रक्षण करणे ही भारतीय संस्कृतीची विशेषता. आपल्या संस्कृतीतील या पर्यावरणस्नेही वृत्तीचे दाखले संस्कृत साहित्यात अनेक ठिकाणी आढळतात. ‘द्यौ: शान्ति: अन्तरिक्ष शान्ति:’ या यजुर्वेदातील शांतिमंत्रात पृथ्वीपासून अंतराळापर्यंत सगळीकडे जैविक-अजैविक घटकात संतुलनाची प्रार्थना केली आहे. ऋग्वेदात पृथ्वीला आई आणि आकाशाला पिता म्हणत सर्व सजीवांच्या रक्षणाची कामना केली आहे. अथर्ववेदातदेखील ‘माता भूमिः पुत्रो अहं पृथिव्याः’ म्हणत पृथ्वीवरील सर्व जीवांना सहोदर मानले आहे. ‘मा हिंसी पुरुषं जगत’ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याच प्राण्याची हत्या करू नये अशी वेदांची आज्ञा आहे.
 
 
 
ऋग्वेदात वनानि नः प्रजहितानि(ऋ ८.१.१३ )- जंगलाची तोड न करण्याविषयी म्हटले आहे. पद्मपुराणात ‘दशपुत्रसमो द्रुम:’ म्हणजे एक झाड दहा अपत्यांसारखे समजावे असे म्हटले आहे. बृहत्संहिता, चरकसंहिता, आयुर्वेदीय ग्रंथ, अथर्ववेदांत ठिकठिकाणी विविध वृक्ष व त्यांचे आरोग्य, परिसरावर होणारे कल्याणकारक परिणाम यांचे उल्लेख येतात. स्कंदपुराणात म्हटले आहे की, ‘अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम्। कपित्थबिल्वामल मलकत्रयंचपञ्चाम्रवापी नरकं न पश्यते॥’ म्हणजे वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, बेल, आंबा, कवठ व अशोक ही झाडे लावून त्यांचे संगोपन करणार्‍याला कधीच नरकयातना होत नाही. संस्कृत साहित्यातील अनेक नायिका झाडांची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेत असलेली दाखवले आहे.
 
 
शतपथ ब्राह्मणात ‘अमृत वा आपः’ म्हणत पाण्याला पृथ्वीवरील अमृत समजले आहे. यामुळे जलप्रदूषण करणे महापाप समजले आहे. ‘सुकूपानां तड़ागानां प्रपानां च परंतप। सरसां चैव भैत्तारो नरा निरयगामिनः॥’ (पद्मपुराण ९६.७.८ )नदी, विहिरीत प्रदूषण करणार्‍याला नरकवासाची शिक्षा आहे. ‘नु वायोः अमृतं वि दस्येत्’ (ऋग्वेद ६.३७.३) या ऋचेत वायूमधील अमृत म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण कमी न होऊ देण्याविषयी प्रार्थना आहे. फक्त जल, वायू, अमी, भूमी प्रदूषणच नाही, तर ध्वनिप्रदूषणाविषयीदेखील वेदात विचार आढळतो. यजुर्वेदात ‘द्यां मां लेखीरन्तरिक्षंमा हिंसीः।’ म्हणजे आकाशतत्त्वाची उच्च ध्वनीद्वारा प्रदूषण करण्याचा विरोध केला आहे. ऋग्वेदाच्या ७.५० सूक्तात विविध घटकातील विष म्हणजे प्रदूषण हरण करण्याची प्रार्थना केली आहे.
 
 
इतर काही संस्कृतीत देवाने मानवाच्या उपभोगासाठीच ही पृथ्वी निर्माण केली, असे मानले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र मानव हा निसर्गाचा भाग आहे आणि निसर्गाचे रक्षण करणे, ही त्याचे आद्यकर्तव्य मानले गेले आहे. ‘तेन त्यक्तेन भुञ्जिथा’ या उक्तीप्रमाणे मानवाने निसर्गाला न ओरबाडता, त्याचे रक्षण करत सुख उपभोगावे, ही आपल्या ऋषींची अपेक्षा आहे. झाडे लावणे, पाणवठे तयार करणे, प्रदूषण न करणे यालादेखील यज्ञ मानले गेले आहे. यातून पाऊस नियमित पडून अन्न निर्माण होते, असे गीतेत म्हटले आहे. भारतीय संस्कृतीतील हे पर्यावरणपूरक विचार आपल्या सर्वांच्या आचरणात यावे, हीच सदिच्छा...!
 
- विनय जोशी
 
 
Powered By Sangraha 9.0