मुंबई, पुण्यापाठोपाठ लसीकरणात ठाणे अव्वल

04 Jun 2021 12:00:34

Thane_1  H x W:
 
ठाणे (दीपक शेलार) : केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा कमी होत असल्याची नेहमीच बोंब उठवणार्‍या ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याचे पितळ उघडे पडले आहे. राज्य शासनाने २ जून रोजी जाहीर केलेल्या लसीकरणाच्या अधिकृत आकडेवारीवरून मुंबई, पुण्यापाठोपाठ ठाण्यामध्ये लसीकरण सर्वाधिक झाले आहे. मुंबईमध्ये सुमारे ३५ लाख जणांचे, पुण्यामध्ये २९ लाख, तर ठाणे जिल्ह्यातील तब्बल साडेसतरा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, देशातदेखील लसीकरणात महाराष्ट्र अव्वल असून, लसपुरवठ्यात केंद्राने महाराष्ट्रालाच झुकते माप दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
 
 
ठाणे जिल्ह्यामध्ये १९ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यानंतर ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ ४५ पुढील वयोगटातील सर्वासाठी लस घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा सरकारने केली. ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी अशी १४२ लसीकरण केंद्रे आहेत. या केंद्रांवर हजारो नागरिकांना लस दिली जात आहे. संपूर्ण देशभरातील केंद्रशासित प्रदेशांसह ३७ राज्यांमध्ये लसीकरणात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे.
 
 
आतापर्यंत महाराष्ट्रात दोन कोटी ३० लाख ५३ हजार जणांना लसीचे डोस देण्यात आलेत. तर, मुंबईत ३५ लाख तीन हजार ७३३, तर पुणे जिल्ह्यात २९ लाख ३७ हजार ६३० जणांना लसींचा डोस देण्यात आला असून तिसऱ्या क्रमांकावर ठाणे आहे. ठाणे जिल्ह्यात १७ लाख ३० हजार ४८२ जणांना लस देण्यात आली आहे. यात ठाण्यातील तीन लाख ५६ हजार ७५१ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला असून तब्बल १३ लाख ७३ हजार ७३१ जण दुसर्‍या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. कालावधी वाढल्याने दुसरा डोस लांबला. लसीकरणात राज्याने आघाडी घेतली असून, ठाणेदेखील अव्वल नंबरवर आहे. मात्र, दोन डोसमधील अंतर पूर्वी ४२ दिवसांचे होते ते आता ८४ दिवस केले असल्याने दुसर्‍या डोससाठीच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. दुसरा डोस मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. मात्र, लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरणात खोडा निर्माण झाला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0