मुंबई : भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्र लिहून चित्रा वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळविले आहे. महिलांचे प्रश्न आणि समस्या प्रभावीपणे सरकार दरबारी पोहोचवत त्याविरोधात आवाज उठविणाऱ्या महिला नेत्या म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
पक्षातील उल्लेखनीय कामगिरी चित्रा वाघ यांच्यावर भाजप उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तब्बल २० वर्षे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधील उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलत राज्यातील वाढते महिला अत्याचारांच्या घटना आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर चित्र वाघ यांनी वारंवार महविकास आघाडीला सवाल केले. महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड यांचे नाव एका युवतीच्या मृत्यू प्रकरणात आल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात चित्रा वाघ यांचा मोठा वाटा राहिला. भाजप नेतृत्व चित्रा वाघ यांच्या कामावर खूश आहे. त्याचमुळे त्यांच्या हाती भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
चित्रा वाघ यांनी मानले आभार
यानंतर ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या,"भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजप महाराष्ट्र-युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, विधीमंडळ नेते मा. देवेंद्र फडणवीसजी मा.सुधीर मुनगंटीवार यांचे मनस्वी आभार !"