‘फुकट्या मॉडेल’ची फुंकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2021   
Total Views |

kejariwal_1  H
 
 
 
वीज फुकट, पाणी फुकट, करमाफी अशा घोषणांचा पाऊस पडायला लागला की, समजावं कुठल्या तरी निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांची तर फुकट वाटपात जणू पीएच.डीच! कारण, ‘फुकट वाटा, मतं लाटा’ हेच केजरीवालांचे ‘दिल्ली मॉडेल.’ राजधानीत या नेत्याने वीज, पाणी असेच फुकट केले आणि दिल्लीकर महिलांसाठी तर बसची वाहतूकही मोफत. परिणामी, दिल्लीकरही केजरीवालांच्या ‘फुकट्या मॉडेल’च्या या फुंकरीला भुलले आणि त्यांनी ‘आप’ला सत्तेत आणले. मग काय, हेच ते फुकटे ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांतही राबवायची केजरीवालांना खुमखुमी, म्हणूनच आगामी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथेही ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन केजरीवालांनी दिले. त्यात सत्ताधारी काँग्रेसची पोटदुखी ती वेगळीच. ‘आम्ही वीज मोफत करण्याचा निर्णय घेणार म्हणून केजरीवालांनी तो मतदारांना आकर्षित करण्यासाठी आधीच जाहीर केला,’ म्हणून पंजाब काँग्रेस हिरमुसली. म्हणजे, ‘आप’ काय किंवा काँग्रेस काय, ‘फुकट ते पौष्टिक’ याची निवडणूक नीती अवलंबण्याच्या तयारीत होते. केजरीवालांना केवळ फुकट वाटायचीच नाही, तर फुकटचे ‘क्रेडिट’ लाटायचीही तितकीच वाईट सवय. कारण, दिल्लीच्या कानाकोपर्‍यापासून ते वर्तमानपत्रांच्या पूर्ण पान जाहिरातींपर्यंत ‘वॅक्सिन लगवाई क्या?’ असा प्रश्न विचारत जिथे-तिथे केजरीवालांनी आपला फोटो छापून प्रसिद्धीची हौस भागवली. त्यामुळे लसखरेदी करणार केंद्र सरकार, राज्यांना लसी पुरवणारही केंद्र सरकार. पण, जणू लसीकरणाचे शिवधनुष्य आम्हीच पेलले, ही जाहिरातबाजी करणार ते केजरीवालांसारखे प्रसिद्धीलोलुप नेते. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो आहेच की, मग बाकीकडे आपला फोटो छापला तर बिघडले कुठे, असाच केजरीवालांचा हा आईतखाऊपणा! परंतु, केजरीवालांनी एक ध्यानात ठेवावे - जनतेला फुकटचे वाटून एकदा मूर्ख बनवता येईलही. पण, वारंवार जनता या फुकटच्या आमिषांना भुलणारी नाही. म्हणूनच, केजरीवालांनी असा फुकटेपणा असो वा ‘ऑक्सिजन’ची फुगवून सांगितलेली मागणी, यांसारखे फसवणुकीचे धंदे करू नयेत. कारण, ‘ये पब्लिक हैं, सब जानती हैं।’
 
 

शिंदेंची खदखद

 
 
 
एकीकडे नाना पटोले, भाई जगताप यांना महाराष्ट्रात स्वबळाची उबळ येत असताना, दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. एका कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले की, “काँग्रेसमध्ये पूर्वी चिंतन शिबिरांची परंपरा होती. त्यामध्ये पक्षाच्या वाटचालीविषयी चर्चा व्हायची. पण, आज काँग्रेस नेमकी कुठे आहे, तेच कळायला मार्ग नाही.” आता शिंदे जे म्हणाले, त्यात नवीन असे काहीच नाही. कारण, यापूर्वी काँग्रेसमधील ‘जी-23’ गटातील नेत्यांनीदेखील काँग्रेसच्या वर्तमान कार्यपद्धतीविषयी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. सोनिया, राहुल गांधींना शेकडो पत्रही लिहिली. पक्षव्यवस्थेत बदल करण्याचे, पराभवाचे चिंतन करायचेही वारंवार सल्ले दिले. पण, सगळे व्यर्थ. इथे तर काँग्रेसच्याच नेत्यांना सोनिया-राहुल गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत तीन-चार दिवस ताटकळत बसावे लागते. मग तिथे चर्चा होईल, सुसंवाद घडेल ही अपेक्षाच मुळी फोल ठरावी. शिंदेंनीही बोलताना आपल्या मनातली कित्येक दिवसांची खदखद अखेरीस बोलून दाखवली खरी; पण त्यामुळे पक्ष खडबडून जागा होईल किंवा शिंदे काँग्रेसचा ‘हात’ सोडतील, यापैकी काहीएक होणे नाही. कारण, शिंदे म्हणतात तसे, “कोणे एकेकाळी काँग्रेस पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण, आता माझ्या शब्दाला या पक्षात किंमत आहे की नाही, ते माहीत नाही. कारण, काँग्रेस पक्ष आपल्या विचारसरणीची संस्कृतीदेखील विसरत चाललेला दिसतो.” शिंदे म्हणाले ते अगदी खरे. काँग्रेसच्या कार्यक्रमांना शिंदेंची हजेरी जरूर असते. पण, त्यांनी केलेले मार्गदर्शन, राज्यातल्या नेत्यांना दिलेले सल्ले हे कुठेतरी दुर्लक्षित केल्यामुळेच शिंदे यांना आपली पक्षातील किंमत लक्षात आली असावी. असो. ‘गरज सरो वैद्य मरो’ ही काँग्रेसची त्यांच्या नेत्यांबाबतची तशी अगदी जुनीच रीत. त्याबद्दल अधिक ते काय बोलावे. पण, आजच्या काँग्रेसची अवस्था कॅप्टनशिवाय भरकटलेल्या जहाजासारखीच! आता तर हे जहाज आज बुडेल की उद्या, अशी बिकट परिस्थिती. तेव्हा, शिंदे असतील किंवा अन्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आता चिंतन-मंथनातूनही फारसे काहीच हाती लागणार नाही. कारण, आता काँग्रेस पक्षाची एकूणच दुरुस्ती, सुधारणांच्याही पलीकडे झालेली क्षती कधीही न भरून येणारीच आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@