सेलिब्रेटी लसीकरण प्रकरण ; २१ जणांना दिली बनावट ओळखपत्र

03 Jun 2021 19:48:31

TMC_1  H x W: 0
 
ठाणे : ठाण्यातील सेलिब्रिटी लसीकरण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. अभिनेत्री मीरा चोप्राप्रमाणे तब्बल २१ जणांना ठेकेदाराने बनावट ओळखपत्र दिल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचा समावेश असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या सेलिब्रेटी लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत यातील १५ जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचे सांगितले जात आहे.
 
 
ठाणे महापालिकेच्या 'पार्कींग प्लाझा' या कोविड केद्रात अभिनेत्री मीरा चोप्राला झालेल्या बेकायदेशीर लसीकरणानंतर महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यानुसार या समितीने केलेल्या तपासावरून आत्तापर्यंत २१ जणांना अशाप्रकारे बनावट ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे. त्यातील १५ जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
 
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असतानाही पालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात मीरा चोप्रा या अभिनेत्रीला फ्रंटलाईन वर्कर असल्याचे दाखवून लस देण्यात आली होती. ओम साई आरोग्य सेवा या संस्थेनेच हे बनावट ओळखपत्र तयार करून अशाप्रकारे लस दिल्याची माहिती समोर आल्यानंतर उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीअंती या समितीने सादर केलेल्या अहवालात १९ जणांना सुपरवायझर तर २ जणांना अटेंडंट असल्याचे बनावट ओळखपत्र देण्यात आल्याचे समोर आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0