कोरोनाग्रस्तांसाठी धावून येणाऱ्या 'या' मराठी अभिनेत्याचे निधन

29 Jun 2021 11:54:42

Ujjwal Dhangar _1 &n


टिटवाळा-शहापूरकरांचा हक्काचा आवाज हरपला

टिटवाळा : मराठी रंगकर्मी आणि वेगवेगळया हिंदी, मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता उज्ज्वल धनगर याचे सोमवारी सकाळी हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. स्थानिक कार्यक्रम तसेच राजकारणी, सामाजिक मोठमोठे इव्हेन्टमध्ये आपल्या दिलखुलास निवेदनाने अनेक लहानमोठ्या व्यक्तींना उज्ज्वल याने आपलेसे केले होते.
 
 
सूत्रसंचालन आणि उज्ज्वल असे समीकरण असले तरी, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत त्याने खाशाबाचा अभिनय केला होता, त्याची ती भूमिका देखील अविस्मरणीय होती. विनोदी, खलनायक, पोलीस, वात्रट भूमिका तो सहज निभावत होता. स्वभाव अत्यंत बोलका, मनमिळाऊ व दिलफेक व्यक्तिमत्व असलेला उज्ज्वल समाजसेवेतही पुढाकार घेत होता.
 
 
सर्वसाधारण पथनाटयपासून सुरुवात करून एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा असे एक एक करून उज्जवल हिंदी मालिकांमध्ये देखील आपले नशीब आजमावत होता. कोरोना काळात गरजूंना मदत करण्यासाठी तो सदैव तत्पर होता. शहापूरमधील आजी-आजोबांना बेड मिळवून देण्यापासून ते इंजेक्शन, ऑक्सीजनपर्यंत त्यांची व्यवस्था करून त्यांना उज्ज्वलने सुखरूप करूनच घरी देखील पाठवले होते. अनेक कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन, इंजेक्शन मिळवण्यासाठी तो स्वतः आपल्या मित्रांसोबत तासनतास रांगेत देखील उभा राहत होता, अशी माहिती त्यांच्या परिचितांनी दिली.
 
 
सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उज्जवलच्या छातीत दुखत असल्यामुळे उपचारसाठी टिटवाळ्यामधील हॉस्पीटलमध्ये जात होता मात्र, ऍसिडिटी असल्यामुळे त्रास होत असेल असे जाणवल्यामुळे त्याने गोळ्या घेतल्या त्यामुळे त्याला बरे वाटू लागले. म्हणून अर्ध्या रस्त्यातून परत घरी आला. घरी परतल्यावर पुन्हा छातीत दुखू लागल्याने तो आई व भावासोबत हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्याआधीच त्याला हृद्यविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पच्छात त्याची आई, वडील, भाऊ असा त्यांचा परिवार आहे.



Powered By Sangraha 9.0