सिताबाई के. शहा मेमोरियल शाळा येत्या दहा दिवसांत होणार सुरू

29 Jun 2021 20:21:02

dombivali_1  H
डोंबिवली: खिडकाळी येथील सिताबाई के. शहा मेमोरियल शाळांचे मालक भरत शहा यांनी येत्या दहा दिवसात शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या शाळेतील पालकांनी केलेले आंदोलन शहा यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे अशी माहिती पालकांच्या वतीने देण्यात आली.

खिडकाळी येथील सीताबाई के. शहा मेमोरिअल या शाळेत राज्य मंडळाचा अभ्यासक्रम बंद करून सीबीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संलग्न अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शाळेच्या मालकांनी घेतला होता. पण शाळेच्या या निर्णयाला पालकांकडून विरोध केला जात होता. ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने देखील त्यांना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संलग्न शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही शाळेच्या मालकांकडून यंदाच्या वर्षात ऑनलाईन शाळा सुरू केली नव्हती. त्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या ४५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. पालकांकडून शाळेला निवेदन ही देण्यात आले होते.


पालकांकडून अनेक मार्गाने सीबीएसई शाळेला विरोध केला जात होता. मात्र शाळा मालक राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची शाळा बंद करण्याच्या निर्णयावर ठाम होते. पालकांनी शेवटी शाळेच्या गेटवर ऑनलाईन प्रतिकात्मक शाळा मंगळवार पासून सुरू केली होती. पालकांच्या अनोख्या आंदोलनानंतर शाळा मालक शहा यांनी आंदोलन स्थळी भेट देवून शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. पालकांना ही त्यांना मागील वर्षातील फी चे पैसे भरण्यास सांगितले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्य मध्यस्थीनंतर शाळा मालक शहा यांच्या आश्वासनानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी कॉम्रेड काळू कोमास्कर, दिपेश पाटील, उत्तम पवार, राम म्हात्रे, संजय पाटील, सत्तेवान पाटील, रूपेश पाटील आणि शाळेचा पालक वर्ग उपस्थित होता.
Powered By Sangraha 9.0