(फोटो - प्रतीक मोरे, डाॅ. आदित्य शिंदे)
पावसाच्या सरी बरसू लागल्यावर हंगामी फुलांचा बहर फुलायला सुरुवात होते. या बहरामध्ये अनेक विविध प्रजातींची फुले पाहायला मिळतात. काही फुलांचे आयुष्य हे पावसाच्या पहिल्या सरींनंतर १५ दिवसांपुरते असते, तर काही फुले ही मुसळधार पाऊस पडल्यानंतर फुलू लागतात. हंगामी फुलांचे हे चक्र कसे असते? आणि त्यामध्ये कोणत्या विशेष फुलांचा समावेश होतो? याविषयी माहिती देणारे ‘निसर्गज्ञान’...
प्रतीक मोरे (देवरुख) - पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या की, उन्हाने तप्त झालेला कातळसडा थंडावतो आणि जणू या कातळाच्या गर्भातून छेद देऊन विविध कंदवर्गीय वनस्पतींचे फुलोरे प्रकट होतात. वर्षभर सुप्तावस्थेत असणारे हे कंद आणि गवत जणू पावसाने पुनरुजीवित होऊन कातळाला जीवनाने व्यापून टाकते. दुर्मीळ असलेली दीपकाडी, भुईचक्र, चीकर कांदा, गडांबी कांदा, वेगवेगळ्या जातींचे नेचे हे सर्वात प्रथम उगवतात. या काळात इतर गवत कमीच उगवलेले असल्यामुळे बरेचदा या वनस्पतींची पाने गुराढोरांच्या भक्ष्यस्थानी पडतात. मात्र, जसजसा पाऊस वाढू लागतो आणि श्रावण महिना येऊ लागतो, तसतसे इतर वनस्पती आणि गवतपण वाढतात. ऊन पडू लागली की, मग सीतेची आसवे, भुईगेंद, चोहोळा, बंबाखू, तुतारी, कवळा, सोनकी, कंदील पुष्प, काळी आणि सफेद मुसळी, रानहळद, लहान बरकी, तेरडा, नियानोटीस, ढालगोधडी ही फुले दिसू लागतात. यातील क्रिनम लीली, दीपकाडी, आषाढ अमरी ही फुलं स्थानिक स्त्रियांना केसात माळण्यासाठी मिळालेली पर्वणीच जणू. फक्त पावसाळ्यापुरतेच आयुष्यमान असलेल्या या वनस्पती सड्यांच्या राकटपणाला अनुकूलित झालेल्या आहेत. तसेच सड्यावर माती आणि इतर पौष्टिक द्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी विविध प्रकारची उत्परिवर्तने या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात. यात सूक्ष्मजीव भक्षण, कीटक भक्षण, दुष्काळ प्रतिरोध, पूर्ण?तः परजीवी, मूळ परजीवी असे अनेक प्रकार आहेत.
गजरा, सीतेची वेणी किंवा पणस केळी (फॉक्सटेल ऑर्किड) अशा नावांनी ओळखली जाणारी आणि गजर्यासारखी लांब फुलांची रचना असणारी ही यक्षपुष्पे वर्षा ऋतूची चाहूल लागली की, हळूहळू प्रकट होऊ लागतात. याचे शास्त्रीय नाव ( Rhynchostylis retusa) आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावलेले जुने वटवृक्ष, आंबे अशी झाडं या ऑर्किडची जन्मस्थाने. यांच्या जीर्ण झालेल्या फांद्यांवर ऑर्किडची लहान पानं आणि छोटीशी मांसल मुळे दिसतात. हवेतील बाष्प मुळांकरवी शोषून त्यावर जगणारी ही झाडं ‘फोटोसिंथेसिस’ने आपलं अन्न बनवत असतात. त्यामुळे ती परोपजीवी नाहीत. ‘फॉक्सटेल ऑर्किड’ ही शळिहिूींश वर्गीय वनस्पती आहे. म्हणजेच, यांना आधारासाठी दुसर्या झाडाची आवश्यकता असते. मात्र, बांडगूळप्रमाणे या वनस्पती परजीवी नसतात. याउलट झाडावर साठणारे अन्नकण, हवा, पाणी आणि पाऊस या मार्गांनी आवश्यक मूलद्रव्ये मिळवतात. अशा प्रकारची विशिष्ट उत्परिवर्तित मुळे यामध्ये पाहायला मिळतात. यामुळेच अन्नसाखळीमध्ये या झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचा आढळ तसा भारतभर आहे. आसाम या राज्याचे हे राज्यफूल असून बिहू सणामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि व्याधींवर याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो.
ठिपके इरीड आमरी (Fox Brush Orchid, Cat's-tail Orchid)
सीतेची वेणी सारखीच दिसणारी फक्त गुच्छरचना वेगळ्या प्रकारची असणारी ही ऑर्किडसुद्धा संपूर्ण भारतीय उपखंडात आढळतात. यांचे शास्त्रीय नाव Aerides maculosa हे आहे. हीसुद्धा epiphyte वर्गीय वनस्पती आहे. गुलाबी उठावदार नाचणार्या मोराची प्रतिकृती वाटावी, अशी सुगंधी फुले हे या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. एखाद्या लंबकाप्रमाणे लोंबणारे यांच्या फुलांचे घोस अनेक कीटकांना परागीभवनासाठी आकर्षित करतात. यांची हवेत तरंगणारी ‘एरियल रुट्स’ हवेतून बाष्प शोषून घेतात आणि खोडाला चिकटून राहण्यासाठी आवश्यक असतात. या वनस्पती त्यांना लागणारी पोषणद्रव्ये खनिज धूळ, सेंद्रिय द्रव्ये, प्राण्यांच्या विष्ठा आणि आधारासाठी असणार्या इतर घटकांतून मिळवतात. सीतेच्या वेणीपेक्षा या फुलांचे गुच्छ आकाराने लहान आणि अधिक काळ टिकणारे असतात. वृक्षतोड आणि वनस्पतींचा संग्रह करणारे छंदिस्त लोक या वनस्पतींसमोरची मोठी आव्हाने आहेत.
कंदवर्गीय वनस्पती - एकदांडी किंवा दीपकाडी
Dipcadi concanense या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती तिच्या एकाच दांडीला येणार्या सुंदर फुलामुळे एकदांडी किंवा डोकाच फूल नावाने प्रसिद्ध आहे. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणार्या या वनस्पतीचे अस्तित्व दोन्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मिळून एकूण फक्त २३ ठिकाणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी १९ ठिकाणे रत्नागिरी जिल्ह्यातील असून, उरलेली पाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली (देवरुख), रत्नागिरी विमानतळ, जैतापूर, सागवे, देवाचे गोठणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) ही या वनस्पतीच्या आढळाची प्रमुख ठिकाणे आहेत. कातळावर या वनस्पतीची गवतासारखी पाने इतर वनस्पतींच्या तुलनेने अगोदरच वाढतात. त्यावेळी अन्य चारा कमी असल्याने गुरे ही पाने खातात. मात्र, पावसाळा सुरळीत चालू झाला की, गुरांना खायला चारा उपलब्ध होतो. मग ती या वनस्पतीकडे दुर्लक्ष करतात. पुढे हळूहळू या वनस्पतीला एक दांडी येते आणि मग कळ्या येतात. त्यानंतर सुरू होतो तो नजारा. काळा कातळ या पांढर्या फुलांनी पूर्ण भरून जातो. कोकणात याला ‘गौरीची फुलं’ म्हणतात. बर्याच बायका याचे गजरे करून डोक्यात घालतात आणि गणपती सजावटीसाठी पण वापरतात. काही ठिकाणी या फुलांचा वापर गजरे, हार आणि वेण्या बनवण्यासाठीही केला जातो. रत्नागिरी, देवरुख आणि देवगडच्या बाजारपेठेत ही फुले विक्रीलाही आलेली दिसतात.
भुई शिरड (Dipcadi concanense)
भुई शिरड किंवा नागदमणी नावाने ओळखली जाणारी ही कंदवर्गीय वनस्पती पावसाळ्यात येणार्या पांढर्या फुलांमुळे ओळखू येते. या वनस्पतीचे सर्वच भाग विषारी असतात. तर पानाला हात लावल्यास किंवा चिक लागल्यास अंगाला खाज उठते. अनेक वेळेला विषाला उतारा म्हणून या वनस्पतीचा वापर केला जातो.
गडांबी कांदा
pink-striped trumpet lily म्हणजेच Crinum latifolium या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही लीलीवर्गीय वनस्पती आहे. मराठीत हिला गडंबी कांदा किंवा गुलाबी कर्णफूल असेही म्हणतात. अगदी पहिल्या पावसाच्या सरी पडल्या की, सर्वात प्रथम उगवणार्या फुलांमध्ये याचा समावेश होतो. सह्याद्री रांगांमध्ये काही टेकड्यांचे उतार या फुलांनी बहरून गेल्याची दृश्य अनेक ठिकाणी दिसतात. थोडीशी सुगंधित असणारी ही वनस्पती मूळव्याध संधिवातावर उपयोगी पडते.
आषाढ हबेआमरी किंवा चीकर कांदा (Single Leaved Habenaria)
आषाढ महिना जवळ आला की, सर्वात पहिली फुलते ती ही हबेआमरी. एक पान आणि त्यातून अलगद उगवलेली नाजूक सुवासिक फुले चीकर कांदा किंवा चीचुर कांदा या नावानेदेखील ओळखली जातात. Single Leaved Habenaria ( Habenaria grandifloriformis ) हे शास्त्रीय नाव असून ऑर्किड फॅमिलीमध्ये यांचा समावेश होतो. अगदी उंचीवरच्या माळरानावरसुद्धा उगवणारी ही वनस्पती पांढर्या फुलांमुळे चटकन नजरेत भरते.
चोहोळा (Scaped Ginger)
Curcuma scaposa हे शास्त्रीय नाव असणारी ही कंदवर्गीय वनस्पती आल्याच्या फॅमिलीमधील आहे. सोनटक्का सारखी मंद सुवासाची फुले अत्यंत आकर्षक दिसतात. शेतीचे ांध, सड्यावरील माती साठलेली जागा अशा ठिकाणी झुक्याने ही फुले आलेली दिसतात. ही वनस्पती नष्टप्राय होण्याच्या मार्गा?वर असल्याने तिच्या संरक्षणाचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
भुईचक्र (Star grass Lilly)
Iphigenia ratnagirica या नावाची ही वनस्पती अतिशय प्रदेशनिष्ठ आहे. ही केवळ रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग?चे काही भाग यामध्येच दिसून येते. छोटीशी गुलाबी सुंदर गोलाकार आकाराची फुले असल्यामुळे हिला भुई?चक्र म्हटले जाते.
तुतारी (Tutari)
Rhamphicarpa fistulosa या नावाची ही वनस्पती गवताची मूळ परजीवी वनस्पती आहे. पाणथळ गवताळ प्रदेशात आणि सड्यावर ही प्रामुख्याने दिसून येते. तुतारी वाद्यासारखी फुलाची रचना आढळते. फुले संध्याकाळी उमलतात.
कापरे कमळ (Elegant Spider-Flower)
Corynandra elegans या नावाची ही सुंदर फुलांची रचना असणारी वनस्पती केवळ राजापूर तालुक्यातील साखरी नाटे आणि जैतापूर परिसरात दिसून येते. वर्षातून फक्त एकदाच पावसाळ्याच्या दिवसात उगवते आणि सुंदर फुलांनी पूर्ण? वाढ झाल्यावर हा परिसर भरून जातो. काही वर्षांत जमिनीवर झालेल्या अतिक्रमणामुळे या वनस्पतीच्या अस्तित्वाला आव्हाने निर्माण झाली आहेत.