नवी दिल्ली : भारतीय नेमबाज राही सरनोबतने टोकियो ऑलिम्पिक आधी शूटिंग वर्ल्ड कपमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाने भारतीयांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. सध्या क्रोएशियामध्ये सुरु असलेल्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये राहीने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. विशेष म्हणजे, वर्ल्ड कपमधील तिचे हे दुसरे पदक आहे. याआधी तिने १० मीटर एयरपिस्टल प्रकारात महिला संघ प्रकारात कांस्य पदक जिंकले होते.
राहीने २५ मीटर स्पोर्ट्स अंतिम सामन्यामध्ये ३९ गुण मिळवले, पण वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यापासून ती फक्त एक गुण मागे राहिली. तर, रौप्य पदक जिंकणाऱ्या शूटरपेक्षा राहीला ८ गुण जास्त मिळाले. शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला आतापर्यंत १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदके मिळाली आहेत. याचसोबत भारत या स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर आहे. रशिया पहिल्या क्रमांकावर आहे.