सहकार चळवळीत आदर्श प्रस्थापित करणारे, ‘शेतकरी सहकारी संघा’ला आकार देणार्या कोल्हापूरच्या तात्यासाहेब मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...
१९५०- ६० च्या दशकात तात्यासाहेब मोहिते हे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रणी नाव होते. ‘शेतकरी सहकारी संघ’ हे त्यांच्या कष्टाचे प्रतीक. यामुळेच शेतकर्यांना लागणार्या सर्व गरजेच्या वस्तू सहजपणे आणि योग्य किमतीत उपलब्ध झाल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या तयार मालाला उठाव मिळावा म्हणून त्यांनी ‘जिल्हा खरेदी-विक्री संघ’ स्थापन केला. तसेच सर्वसामान्य लोकांना योग्य किमतीत औषधे, भांडी, कापड, किराणा आदी वस्तू मिळाव्यात म्हणून अशा दुकानांची साखळी सर्व जिल्ह्यांत तयार केली.
कोल्हापूरजवळ यळगुड या गावी त्यांचा जन्म झाला. घरची गरिबी. त्यात शिक्षण फक्त मराठी चौथी इयत्तेपर्यंत. पण, दृष्टी विशाल असल्याने आणि कुठले काम कसे करावे, याचे योग्य ज्ञान उपजतच असल्याने शिक्षणावाचून त्यांचे कोठेही अडले नाही. बरोबर दुभाषी घेऊन ते परदेशीही गेले. तिथे त्यांनी निरनिराळ्या उद्योगधंद्यांची सविस्तर माहिती घेतली आणि त्याचा उपयोगही आपल्या संघासाठी केला.
कोल्हापूरचे गूळमार्केट भारतात प्रसिद्ध आहे. पूर्वी ते शाहूपुरीमध्ये अडचणीचे जागी होते. ते चांगल्या प्रशस्त जागेत नेऊन शेतकर्यांना व व्यापार्यांना सोईचे होईल या दृष्टीने कोल्हापूरच्या जवळ बंगळुरू रस्त्यावर एक मोठा प्लॉटही त्यांनी टाऊन प्लॉनिंगमध्ये राखून ठेवायला सांगितला होता. १९५८-५९ मध्ये त्यावेळचे द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राम प्रधान यांना मार्केट यार्डच्या कामात लक्ष घालण्यास सांगितले, तसेच तात्यासाहेब मोहिते यांची मदत घेण्यास सांगितले. तात्यासाहेब तर आता आपले उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, या भावनेने रात्रंदिवस कामासाठी कष्ट करू लागले. साधारण मे १९५८ मध्ये मार्केट यार्डचा आराखडा पूर्ण झाला. शेतकर्यांना याचा लवकरात लवकर फायदा मिळावा म्हणून पुढच्या गूळ हंगामापूर्वी याचे काम पूर्ण झाले पाहिजे या दृष्टीने १ डिसेंबर, १९५८ रोजी उद्घाटन करावे असे ठरले.
एवढ्या कमी वेळेत येवढे प्रचंड काम करणे शक्य नाही, असेच सर्वांना वाटत होते. जमीन सपाट करून कुंपण घालणे, सरकारी, व्यापारी, शेतकरी यांच्यासाठी निरनिराळ्या पद्धतीच्या इमारती बांधणे, रस्ते, वाहतूक सोयी वगैरे पुष्कळ कामे होती. संबंधित अभियंते, रचनाकार, कॉन्ट्रॅक्टर यांची रात्रंदिवस कामे सुरू झाली. याला विरोध करणारेही पुष्कळ होते. विशेषतः गुळाचा व्यापार करणारे गुजराती व्यापारी. त्यांनी शेतकर्यांना निरनिराळी आमिषे, भीती दाखविण्यास सुरुवात केली. पण, तात्यासाहेब आपले काम करीतच होते. अर्थमंत्री जीवराज मेहता पैसा उपलब्ध करून देत नव्हते. पण, मग मुख्यमंत्र्यांनी निराळ्या मार्गाने पैसा मिळवून दिला. व्यापारी लोकांनी सांगितले की, टेलिफोन लाईन आणि रेल्वे साईडिंग आणल्याशिवाय आम्ही येऊ शकणार नाही. ऑगस्ट महिना उजाडला होता. चार महिन्यांत हे काम कसे होणार, याची काळजी लागली. शेवटी जिल्हाधिकारी राम प्रधान यांनी अनेक खटपटी-लटपटी करून मुख्यमंत्री चव्हाण आणि रेल्वे आणि टेलिफोनमंत्री स. का. पाटील यांना भेटून या सर्व गोष्टी डिसेंबरपूर्वीच पूर्ण होतील हे पाहिले.
स्थानिक व्यापारी विरोधीचाल खेळत होते. सर्वसाधारणपणे गुळाचा व्यापार लिलाव पद्धतीने चालतो. पण, शेतकरी संघाशिवाय कोणीही यात भाग घेण्यास तयार नव्हते आणि व्यापारी कोर्टात जाऊन स्थगिती आणून मार्केट यार्डचे काम बंद पाडू पाहत होते. मग तात्यासाहेबांनी कोल्हापुरी हिसका दाखविला. रातोरात सर्व तालुक्यांतील सहकारी संघांना मार्केट यार्डात नावं रजिस्टर करायला लावली. एवढेच नव्हे, तर दुकानाच्या गाळ्यामध्ये टेबल-खुर्ची ठेवून बाहेर दुकानाचे नाव देऊन ३०-४० दुकाने तयार केली. ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी टेलिफोनवरून शुभेच्छा दिल्या आणि अशा रीतीने मार्केट यार्डचे उद्घाटन केले. काम सुरू झाले. पण, काही दिवसांनंतर शेतकरी येणे कमी झाले. कारण, व्यापारी लोक मार्केटबाहेर जास्त भाव देऊन गूळ खरेदी करत होते. शेवटी शासनाने (तात्यासाहेब यांच्या विनंतीवरून) गावातील खरेदी-विक्री बेकायदेशीर ठरविली.
परत शेतकरी मार्केट यार्डात माल आणू लागले. दोन दिवसांनी परत शेतकरी यायचे कमी झाले. व्यापारी शेतकर्यांना जयसिंगपूर येथे जाण्यास सांगत होते. तेथे यार्डापेक्षा जास्त भाव देत होते. तात्यासाहेब इरेला पेटले. त्यांनी जयसिंगपूर येथे आपला एक माणूस पाठवला. त्याला रोजच्या रोज तेथील भाव टेलिफोन करून कळविणेस सांगितले आणि जयसिंगपूरपेक्षा चार-पाच रुपये जास्त भाव देऊ केला. परत मार्केट यार्डात शेतकर्यांचा ओघ सुरू झाला. गुजराती व्यापार्यांनी संगनमत करून रेल्वेच्या बहुतेक वाघिणी आधीच बुक करून ठेवल्या. त्यामुळे संघाला वाघिणी मिळेनात. त्यामुळे यार्डातून वाहतूक सुरू करणे शक्य होईना. तात्यासाहेबांनी रेल्वे अधिकार्यांना भेटून अडचण सांगितली. तेव्हा रेल्वेने व्यापार्यांना नोटीस पाठविली की, एक दिवसात वाघिणी उपयोगात आणाव्या. पण, त्यांच्याकडे माल कुठे होता. शेवटी व्यापारी नरमले. वाघिणी परत दिल्या. यार्डातून वाहतूक सुरू झाली. हळूहळू त्यांचा विरोध मावळला. मार्केट यार्डात त्यांनी आपली दुकाने आणली. अशा रीतीने खरीखुरी गुळाची व्यापारपेठ सुरू झाली. तात्यासाहेब यांच्या अविरत परिश्रमाची जिद्दीची यशाची ही पावती होती.
पण, या अविश्रांत परिश्रमाने ते आजारी पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पाच-सहा महिने ते आपल्या यळगुड गावात अंथरुणावर झोपून काम पाहत होते. पण, दुर्दैवाने २७ जून, १९५९ रोजी निधन झाले. अवघे ५०-५१ वर्षाचे आयुष्य. सर्वसामान्य माणसासाठी झिजले. जन्मभर ते साधेपणाने वागले. दुटांगी धोतर, शर्ट, कोट, टोपी किंवा पटका अशा पोषाखात ते रुबाबदार दिसत. ते गेले तरी त्यांनी आपले कार्य मागे ठेवले आहे. या २७ जूनला त्यांना जाऊन ६२ वर्षे होत आहेत म्हणून त्यांचे पुण्यस्मरण.
- गजानन गोसावी