२१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. पण, सध्या योग म्हणजे फक्त योगासने आणि प्राणायाम एवढाच मर्यादित अर्थ प्रचलित झालेला दिसतो. याच्या पलीकडे विचार करत योग हे एक दर्शन, जीवन पद्धती आणि संस्कृती आहे, याचा आढावा घेणारा हा लेख.
दि. २१ जून हा ‘आंतराष्ट्रीय योग दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. सध्याच्या काळात तणावग्रस्त जीवन, दुभंगलेली नाती, मानसिक अस्वस्थता अशा वि’योग’ परिस्थितीत योगसाधनेचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. पण, सध्या योग म्हणजे फक्त योगासने आणि प्राणायाम एवढाच मर्यादित अर्थ प्रचलित होतो आहे. वास्तविकता ही योगाच्या अनेक परंपरांपैकी एका अष्टांगयोगातील घटक अंगे आहेत. याच्या पलीकडे विचार करता योग हे एक दर्शन, जीवनपद्धती आणि संस्कृतीदेखील आहे. योगदर्शन हे मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान, नीतिशास्त्र व अध्यात्मशास्त्र यांचा अनोखा समन्वय आहे.
योगच्या अनेक व्याख्या विविध ग्रंथांत आढळतात. पतंजलींच्या मते, मनात उठणार्या विचारांच्या, भावनांच्या तरंगांना शांत करणे म्हणजे योग. ’योगश्चित्तवृत्त निरोधः।’ सांख्य दर्शनानुसार - ’पुरुषप्रकृत्योर्वियोगेपि योगइत्यमिधीयते।’ जड प्रकृती आणि सचेतन आत्मा यांच्यातील भेद कळत स्वस्वरूपाचे ज्ञान होणे हा योग आहे. ‘कुशल चितैकग्गता योगः।’ कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे योग, असे बौद्ध तत्त्वज्ञानात म्हटले आहे. विष्णुपुराणाने आत्माचे परमात्म्याशी मिलन म्हणजे ‘योग’ मानले आहे. (योगः संयोग इत्युक्तः जीवात्म परमात्मने) ‘योगः कर्मसु कौशलम् ‘म्हणत गीतेने योगाला व्यावहारिक आयाम दिला आहे. पण, योग म्हणजे नेमके काय? ‘योग’ हा शब्द संस्कृतमधील ‘युज्’ धातूपासून बनला आहे. पाणिनीने याचे तीन अर्थ दिले आहेत - ’युज् समाधौ, युजिर योगे, युज् संयमने.’ संयोग म्हणजे निश्चित उद्देशाने दोन किंवा अधिक घटक एकत्र आणणे. संयमन म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवणे, तर समाधी म्हणजे एकरूपता होय. योग म्हणजे जोडणे. प्रथम चंचल मनाला शरीराशी त्यानंतर शरीर-मन-बुद्धी हे आत्म्याशी जोडले जाणे. व्यक्तीचे कुटुंबाशी, कुटुंबाचे समाजाशी, समाजाचे राष्ट्राशी आणि राष्ट्राचे संपूर्ण सृष्टीशी जोडले जाणे, इतका व्यापक अर्थ ’योग’ या शब्दात आहे.
योग म्हटला की, फक्त पतंजली हे नाव डोळ्यासमोर येते. पण, पतंजली हे पहिले योग प्रवर्तक नाही. ‘अथ योगानुशासनम्’ या पहिल्याच सूत्रामध्ये पतंजलींनी ‘अनु’ (नंतर) हा उपसर्ग वापरून सूचित केले आहे की, योगावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ नसून आधीपासून अस्तित्वात असणार्या योगशास्त्राच्या परंपरेचे ते अनुसरण करीत आहेत. योगाला प्रदीर्घ परंपरा आहे. किंबहुना, जेव्हापासून भारतीय संस्कृती आहे तेव्हापासूनच योग आहे, असे म्हणता येईल. अनेक पाश्चात्य विद्वान योग हा फारफार तर ५०० वर्षे जुना असेल, असे मत मांडत होते. पण, १९२० मध्ये सिंधू-सरस्वती संस्कृती उजेडात आली. इ.स.पू. ३३०० ते इ.स.पू. १३०० या काळात असणार्या या संस्कृतीतील अनेक अवशेष उत्खननात सापडले. यात विविध योगासनातील मातीच्या अनेक मूर्ती आढळून आल्या आहेत. अनेक मुद्रांवर योगमुद्रेतील योगी, कार्योत्सर्ग मुद्रेतील साधक अशी योगविषयक प्रतीके आढळतात. ‘मूलबंधासन’ मुद्रेत ध्यानस्थ बसलेल्या पशुपती शिवाची मुद्रा प्रसिद्धच आहे, पण या संस्कृतीत फक्त योगासनेच प्रचलित होती, असे नाही. सार्वजनिक स्नानगृहे, वजनमापातील अचूकता, नगररचनेत काटेकोरपणा यातून योगातील शौच, संतोष इ. यम-नियम म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक नैतिकता हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते, हेदेखील दिसून येते.
‘योग’ या संकल्पनेचे लिखित संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. वेदांमध्ये अनेक ठिकाणी ‘योग’ हा शब्द आला आहे. ऋग्वेदात ‘स धीनां योगमिन्वति’ (ऋ.१.१८.७) म्हणजे योगशिवाय कुठलेच कर्म पूर्ण होत नाही, असे म्हटले आहे. वेदात योगाच्या आज प्रचलित स्वरूपाचा थेट उल्लेख नसला, तरी आत्म्याच्या परमात्म्याशी संबंध अशा योग तत्त्वज्ञानाच्या प्राथमिक संकल्पनांची पाळेमुळे इथे आढळतात. उपनिषदात ही संकल्पना अधिक व्यापक स्वरुपात विस्तारित झाली. ’तां योगमित्तिमन्यन्ते स्थिरोमिन्द्रिय धारणम्’ (कठोपनिषद २.६.११ ) म्हणजे चंचल इंद्रियांना ताब्यात ठेऊन मन परमेश्वराशी एकरूप करणे म्हणजे योग अशी योगाची पहिली थेट व्याख्या आढळते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा आणि प्राणायामाचा, तर छान्दोग्य उपनिषदामध्ये ‘प्रत्याहार’ या संकल्पनेचे उल्लेख येतात. विविध उपनिषदांत आत्मा, परमात्मा, जगाची उत्पत्ती, चेतना, दृश्य जगाचे खरे स्वरूप अशा विविध विषयांवर सखोल चिंतन करत योग तत्त्वज्ञानाचा पाया घातला गेला.
उपनिषदांनी ‘तत्त्वमसि’ हे महावाक्य सांगत जीव आणि शिवाचे ऐक्य, तर सांगितले. पण, याचा साक्षात्कार कसा करून घ्यायचा, हा प्रश्न उभा राहिला. याच शोधाची विविध मतमतांतरे म्हणजे दर्शने. ‘दृश्यतेऽनेन इति दर्शनम्’ म्हणजे ज्याच्याद्वारे पाहिले जाऊ शकते असा दृष्टिकोन, तत्त्वज्ञान म्हणजे दर्शन होय. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, कर्ममीमांसा, ब्रह्ममीमांसा ही वेदांना प्रमाण मानणारी ‘आस्तिक’, तर जैन चार्वाक, बौद्ध ही वेदप्रामाण्य नाकारणारी ‘नास्तिक दर्शने’ होय. यातील ‘सांख्य’ हे सगळ्यात प्राचीन दर्शन असून त्यांनी सृष्टीच्या मुळाशी प्रकृती (जड) आणि पुरुष(चेतन) ही दोन तत्त्वे असतात, असे सांगत प्रकृती, पुरुष, महत्, अहंकार, मन, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच महाभूते, पाच तन्मात्रा अशा विश्वातील २५ मूलभूत तत्त्वांची प्रथम गणना केली. प्रकृती व पुरुष यांच्यातील भिन्नत्वाचे ज्ञान म्हणजे मोक्ष होय. पण, या बौद्धिक चर्चेचे प्रायोगिक रूप योग दर्शनाने दिले. ‘सांख्य’ तत्त्वज्ञानाच्या पायावर ‘ईश्वर’ हे २६ वे तत्त्वं स्वीकारत योग दर्शन आकारात आले.
सांख्य व योग ही एकाच तत्त्वज्ञानाच्या बौद्धिक व आनुभविक अशा दोन बाजू आहेत. तसेच योग दर्शनातील अनेक संकल्पना इतर दर्शनांनीदेखील स्वीकारल्या आहेत.योग दर्शनाचा सध्या उपलब्ध असणारा सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे इ. स. पूर्व दुसर्या शतकात सूत्रबद्ध झालेला पतंजलिप्रणीत ‘योगसूत्रे’ हा ग्रंथ होय. ‘समाधिपाद’, ‘साधनपाद’, ’विभूतिपाद’ आणि ‘कैवल्यपाद’ अशा चार भागांत १९५ सूत्रांतून पतंजली मुनींनी योगदर्शन अत्यंत सुसूत्रपणे मांडले आहे. योगसाधनेच्या परिपूर्णतेसाठी पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे सांगितली आहेत. यम म्हणजे सार्वजनिक जीवनातील आचरणाचे सिद्धांत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच यम आहेत. शुचिता, संतोष, स्वाध्याय, तप व ईश्वरप्रणिधान हे यम वैयक्तिक आचरणाचे सिद्धांत आहेत. आज प्रचलित एकाही योगासनाचा उल्लेख योगसूत्रात नाही. पतंजलींनी स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसन इतकंच याविषयी सांगितलं आहे. ‘कुंभक’, ‘रेचक’ व ‘पूरक’ अशा तीन विभागांची श्वसननिरोधाची क्रिया म्हणजे प्राणायाम. विषयांपासून मन आवरणे म्हणजे ‘प्रत्याहार.’ एखाद्या विषयावर मन स्थिर करणे म्हणजे ‘धारणा’ होय. त्या विषयाशी पूर्णपणे एकरूपता साधणे हे ‘ध्यान’ आहे. परमेश्वराशी एकरूपता साधणे ही ‘समाधी’ आहे. तसेच मानसशास्त्रातील अनेक विषय योगसूत्रात आहेत.
योगसूत्रात आणि त्याच्यावरील ‘व्यासभाष्य’, ‘तत्त्ववैशारदी’, ‘योगवार्तिक’ अशा टीकाग्रंथांत तसेच २० योगविषयक उपनिषदांत योगाच्या तत्त्वज्ञानाच्या बाजूवर भर दिला आहे. हठयोगाच्या ‘हठयोगप्रदीपिका’, ‘घेरंडसंहिता’, ‘शिवसंहिता’, ‘योगतारावली’ अशा अनेक ग्रंथांतून योगाची प्रात्यक्षिक बाजू अधिक सविस्तर मांडली आहे. यात विविध आसने, प्राणायामाचे प्रकार, बंध, शुद्धीक्रिया यांची सखोल चर्चा आहे.पण, या सगळ्यातून योग ही संसारापासून दूर एकांतात अवघड आसने, क्लिष्ट क्रिया यांची साधना आहे, असा गैरसमज पसरू लागला. एखादे तत्वज्ञान कितीही थोर असले, पण ते रोजच्या जगण्यात उपयोगी आणि व्यावहारिक नसेल तर निरर्थक ठरते. श्रीमद्भगवद्गीतेने योगाला व्यावहारिक आयाम देत सर्वसामान्यांना कळेल, अशी योगाची मांडणी केली. म्हणूनच प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भगवद्गीतेला ‘योगशास्त्र’ ही संज्ञा दिली आहे. ’योगः कर्मसु कौशलम्‘ अशी योगाची साधीसोपी व्याख्या गीतेत आहे. प्रारब्धवशात प्राप्त झालेले नियतकर्म संतुष्ट मनाने कुशलतापूर्वक करणे हाच योग आहे. परमेश्वराशी जोडले जाण्याचे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे तीन मार्ग गीतेने सांगितले. जीव, जगत व परब्रह्म यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या अभ्यासाने व गुरुच्या साहाय्याने करून घेऊन त्यावरून ब्रह्म ऐक्य जाणणे आणि अनुभवणे याला ‘ज्ञानयोग’ म्हटले आहे. निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हा ‘कर्मयोग’ आहे. परमेश्वरावर आत्यंतिक प्रेम करत मोक्षप्राप्ती करणे हा ‘भक्तियोग’ आहे. हे तिन्ही समांतर मार्ग नसून या तिघांचा समन्वय साधत त्याला ‘राजयोगा’ची जोड देणे अपेक्षित आहे.
परकीय आक्रमणे, पारतंत्र्य अशा प्रतिकूल परिस्थितीतदेखील भारतात योग तत्त्वज्ञान टिकून राहिले. स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, श्री अरबिंदो, जे कृष्णमूर्ति, आचार्य रजनीश, महेश योगी, आचार्य गोयंका अशा अनेक योग्यांनी आधुनिक काळात विविध माध्यमांतून योगाला पुनरुज्जीवित केले. रामदेवबाबांमुळे घराघरात योगासने लोकप्रिय झाली. योगाचे शारीरिक, मानसिक फायदे लक्षात घेत जागतिक पातळीवर योग स्वीकारला गेला आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याला मान्यता मिळून आता जगभर हा दिवस साजरा केला जातो.
योग हा सांप्रदायिक नाही. ईश्वराच्या विशिष्ट रूपाचा आग्रह यात नाही. त्यामुळे धर्म, पंथ, देश यांच्या सीमा ओलांडत योग हा सर्वसमावेशक आहे. शरीर आणि मनाचा समतोल राखण्याचे हे शास्त्र आहे. व्यक्तीचे विस्तारित रूप म्हणजे कुटुंब, कुटुंबाचे विस्तारित रूप म्हणजे समाज, समाजाचे राष्ट्र आणि राष्ट्राचे विस्तारित रूप म्हणजे हे विश्व होय. हे सर्व एकाच तत्त्वाचे वेगळे अविष्कार आहेत, ही जाणीव होताच समाज, राष्ट्र, विश्वाच्या सेवेसाठी समरसतेने कार्य करण्याची प्रेरणा योग देतो. नियमित योगसाधनेतून सशक्त शरीर, निकोप मन आणि विवेकी बुद्धी असणारा समाज घडत विश्वात मांगल्य नांदावे, याच योग दिनाच्या सदिच्छा...