अरुणाचल प्रदेशातील अमली पदार्थांची समस्या आणि महिला कार्यकर्त्या

19 Jun 2021 21:07:38

arunachal_1  H


अनेकदा मारामारीचे प्रसंगही या महिला कार्यकर्त्यांवर आलेले आहेत. कधी पोलीसच सामील असल्याने कारवाई होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः नशाबाजीची तस्करी व विक्री थांबवणे, माल हस्तगत करून तो नष्ट करणे, अशी कामे केली आहेत, हे त्या अगदी सहजगत्या सांगत होत्या. त्या कथनात कुठलाही अभिनिवेश होता की, कसला अभिमान. केवळ ही विषवल्ली अरुणाचलच्या मातीतून पूर्णपणे निपटून टाकणे, या एकाच उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या या महिला कार्यकर्त्यांना भेटून मी अगदी धन्य धन्य झाले होते.


पासीघाट. अरुणाचल प्रदेशातील एक टुमदार शहर. २००३चा जानेवारी उजाडला आणि शहरात एकच हलकल्लोळ माजला. एकापाठोपाठ एक अशा सात अपघातांच्या बातम्या घरोघरी पोहोचल्या. हे अपघात शहराच्या विविध रस्त्यांवर झाले होते आणि त्यात गावातलीच तरुण मुले ठार झाली होती. कोणी बाईकवरून पडले होते, तर कोणी अचानकपणे वाहनासमोर आले होते. नवे वर्ष भलतीच आपत्ती घेऊन आले होते. गावातल्या संस्था, जागरूक नागरिक कामाला लागले. हे अपघात कसे झाले, याचा तपास सुरू झाला. तेव्हा आदल्या रात्री ३१ डिसेंबरच्या पार्टीत या मुलांनी केवळ दारूच नाही, तर चरस, गांजा इत्यादी मादक पदार्थांचेही सेवन केले होते, असे लक्षात आले आणि तशाच झिंगलेल्या अवस्थेत वाहने चालवताना विविध रस्त्यांवर हे जीवघेणे अपघात झाले होते, अशी माहिती समोर येऊ लागली.

मादक पदार्थ, त्यांची तस्करी आणि त्यांची अरुणाचल प्रदेशात होणारी विक्री हे आजवर कधीही कल्पनेतही नसणारे विषय लोकांच्या रोजच्या चर्चेत येऊ लागले. पीडितांनी, जागरूक कार्यकर्त्यांनी पोलीस, नगर परिषद, लोकप्रतिनिधी इत्यादी संवैधानिक संस्था आणि व्यवस्थांकडे या विषयात काहीतरी करावे, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून मागणी करायला सुरुवात केली. नशाबाजीचा बंदोबस्त व्हावा यासाठी सरकारी संस्थांकडून प्रयत्न केले जावेत, ही मागणी जोर पकडू लागली. परंतु, कशाचाही उपयोग होणार नाही, हे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले. कारण, कल्पना केली होती त्यापेक्षा कितीतरी खोलवर नशेच्या धंद्याची पाळेमुळे आधीच रुजली होती आणि आता त्याचे दृश्य परिणाम सतत समोर दिसू लागले होते. कोणतीही सरकारी व्यवस्था यावर काही करू धजत नव्हती. कधी सरकारी व्यवस्था या नशाबाजीच्या व्यवस्थेला विकल्या गेलेल्या असत, तर कधी या व्यवस्थेचाच त्या एक भाग असतात, तर कधी काही करू इच्छिणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना पुरेशी मदत मिळत नसे. एकंदरीत परिस्थिती अधिकच चिघळत जाणार असे वाटू लागले होते. अशीच वर्षामागून वर्षे चालली होती. घटना रोज वाढत होत्या. गावागावांतून दर महिना-पंधरा दिवसांनी एखाद्या तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागत होती. लोकांचा, विशेषतः महिलावर्गाचा धीर आता सुटू लागला होता.

शेवटी यात आपली कोणीही मदत करणार नाही, आपली मदत आपणच केली पाहिजे, आपणच आपल्या मुलांचे जीव वाचवले पाहिजेत, या नशिल्या पदार्थांच्या विळख्यातून आपणच आपल्या समाजाला वाचवले पाहिजे, ही तीव्र भावना महिलावर्गात मोठ्या प्रमाणात मूळ धरू लागली. आई म्हणून हा त्यांचा हक्क होताच आणि जबाबदारीही होती.त्या काळात ‘महिला आंचल समिती’सारखी महिला मंडळे अगदी छोट्या-छोट्या वस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती. त्यामुळे महिलांनी काही सामाजिक विषय घेऊन घराबाहेर पडणे, प्रवास करणे, बाकीच्या महिलांना भेटणे, अभ्यास शिबिरांत सहभागी होणे इत्यादी गोष्टी पासीघाट, जिल्ह्याच्या आणि अरुणाचलच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. या प्रयत्नांतूनच ‘आदी बाने केबांग’ नावाची संस्था नशाबाजी आणि महिलांवर होणार्‍या घरगुती हिंसाचारावर काम करण्यासाठी म्हणून निर्माण झाली. यात ऐनी तालो, जॉया मोयांग, येलेम तागा बोरॉन्ग अशा धडाडीच्या महिला जोरदार कामे करू लागल्या. विविध सरकारी अधिकार्‍यांशी, पोलिसांशी रोजची ऊठबस सुरू झाली. त्यांनी हॉस्पिटल्समधून, पोलीस चौक्यांतून अशा घटनांची आकडेवारी मिळवून त्यावर काम करायला सुरुवात केली. पीडितांना भेटून प्रश्नाचा आवाका किती मोठा आहे, त्याचे स्वरूप काय आहे ते समजून घ्यायला सुरुवात झाली. या धंद्यात कोण, कुठे, कसे गुंतलेले आहे वगैरे धोकादायक आणि गुप्त माहिती या सामान्य घरगुती महिला मिळवू लागल्या. त्याची माहिती पोलिसांना पोहोचवण्याचे काम सुरू झाले. गावांतून, वस्त्यांवर त्यांची स्वतःची विश्वासू ठाणी उभी राहू लागली.


arunachal_1  H


जॉया मौयांग यांना मी भेटायला गेले असताना त्यांनी या कामाची खूप माहिती सांगितली. ‘ड्रग पेडलर’ (अमली पदार्थांचा विक्रेता), कस्टमर, चरसी वगैरे शब्द रोजच्या वापरातले असल्याने अगदी सहजपणे त्या वापरात होत्या. अशा अनेक लोकांना त्यांनी आजवर पकडून दिलेले आहे. अनेक वेळा पैशाच्या लोभाने लोक अफूची शेती करतात. पण, ती खूप आत जंगलांमध्ये, उंचच उंच डोंगरांवर असते. अशी माहिती मिळाली की, सावधपणे तिथे जाऊन ती शेती जाळून टाकायचे काम या महिला लीलया करतात. आता इतक्या वर्षांत या महिलांची गुप्तहेर यंत्रणा चांगलीच तयार झाली आहे आणि ती जिल्ह्याजिल्ह्यांत पसरलेली आहे. “परंतु, एखाद्या गर्दुल्ल्याकडून किंवा पेडलरकडून कधीही हल्ला होईल, याची तयारी आम्ही महिला ठेवत असतो. मैत्रिणींपैकी कोणीही कधीही बोलावले तरी एकमेकींची पाठराखण करण्यात आम्ही कधीही कसूर करत नाही. कारण, कधी कोणता प्रसंग येईल ते सांगता येत नाही. इतके हे काम धोकादायक आहे,” असे त्या सांगत होत्या. अनेकदा मारामारीचे प्रसंगही या महिला कार्यकर्त्यांवर आलेले आहेत. कधी पोलीसच सामील असल्याने कारवाई होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः नशाबाजीची तस्करी व विक्री थांबवणे, माल हस्तगत करून तो नष्ट करणे, अशी कामे केली आहेत, हे त्या अगदी सहजगत्या सांगत होत्या. त्या कथनात कुठलाही अभिनिवेश होता की, कसला अभिमान. केवळ ही विषवल्ली अरुणाचलच्या मातीतून पूर्णपणे निपटून टाकणे, या एकाच उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या या महिला कार्यकर्त्यांना भेटून मी अगदी धन्य धन्य झाले होते.


या सगळ्या प्रयत्नांचा पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे जी मुले-मुली, महिला, पुरुष या नशाबाजीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत, त्यांच्या नशामुक्तीसाठी प्रयत्न करून त्यांचे पुनर्वसन करणे. या कामासाठी वासे मातांचे नाव आज सगळ्या ईशान्य भारतात फार आदराने घेतले जाते. ‘वासे मदर्स’ ही संस्थाही नशामुक्ती संदर्भात खूप मोठे कार्य करीत आहे आणि त्यांच्या कामाचे, संस्थेचे मॉडेल वापरून अनेक ठिकाणी अशी नशामुक्ती केंद्रे सुरू झाली आहेत. अशाच प्रकारचे काम नागालँडमध्ये ‘नागा मदर्स असोसिएशन’ करीत आहे. पण, अशा प्रकारचे सकारात्मक काम कितीही वाढले तरी ते कमीच पडावे, अशी परिस्थिती आहे. ‘वासे माता’ संस्थेच्या नशामुक्ती केंद्रात जेव्हा मी गेले, तेव्हा नशेच्या आहारी जाऊन माणसाची काय हालत होते, त्याचे प्रत्यक्ष प्रमाण पाहायला मिळाले. अनेक तरुण मुले-मुली अमली पदार्थ विकत घेता यावेत म्हणून अनेक प्रकारचे गुन्हे करायला तयार असतात. आपल्याच घरात चोर्‍या करून घरातली एकूण एक वस्तू विकून नशा करण्यासाठी पैसा उभा करतात. नशेच्या अमलाखाली महिला शरीरविक्रयालाही तयार होतात. म्यानमारची सीमा अरुणाचल, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांना लागून आहे. नशेच्या व्यवसायाचा सोनेरी त्रिकोण ज्यांना म्हणतात, त्यातील म्यानमार हा महत्त्वाचा देश आहे. स्वाभाविकपणे या भागांत मादक पदार्थांची तस्करी करणे विक्रेत्यांना फारच सोपे जाते. ईशान्य भारत हजारो प्रकारच्या सामाजिक अडचणींना सामोरा जातो आहे. त्यातले अनेक प्रश्न संवादाने, योग्य संवैधानिक प्रक्रियेने, सामंजस्याने सोडवताही येतील. पण, हा प्रश्न सोडवणे केवळ ईशान्य भारताच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या भावी पिढ्यांसाठी गरजेचे आहे. कारण, हे असे शस्त्र आहे की, जे शत्रूला फेकावे लागत नाही. भारतीय तरुण स्वतःहून जाऊन आपली मान या कालसर्पाच्या तोंडी देतो आहे. या विषयात अधिकांश लोकांनी काही ना काही काम करणे ही काळाची, मानवी वंशाची गरज आहे.
शेवटी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे,
अखंड सावधान असावे। दुश्चित कदापि नसावे।
तजविजा करीत बैसावे। येकान्त स्थळी॥
भारतीय समाज आणि भारत सरकार दोघांनीही हा उपदेश तंतोतंत अमलात आणणे फार आवश्यक झाले आहे.


- अमिता आपटे
Powered By Sangraha 9.0