'हे राज्य जनतेचे नसून रझाकारांचेच'

18 Jun 2021 16:02:45

meghana bopardikar_1 



बीड :
उमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडविणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांवर बीडमध्ये लाठीचार्ज करण्यात आला आहे. यानंतर भाजपने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. 'मराठवाड्यात रझाकारी..' असे म्हणत भाजप आमदार मेघना साकोरे-बोपर्डीकर यांनी तीव्र शब्दात घटनेवर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणतात," मराठवाड्यात रजाकारी. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याकडे धाव घेणाऱ्या महिलांना लाठ्यांनी प्रतिसाद दिला जात आहे. हे राज्य जनतेचे नसून रझाकारांचेच असल्याचे सिद्ध होत आहे," असे त्या म्हणाल्या.


दरम्यान, बीड दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज १८ जून रोजी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. "आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत आहोत, मात्र शासनाकडून मनाला वाटेल तेव्हा आम्हाला काढलं जातं आणि पुन्हा कोरोना जास्त पसरला की आम्हाला घेतलं जात आहे. यामुळे आम्ही ज्या पदावर काम करतोय, त्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्या. ही मागणी घेऊन बीडमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तर या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आहे", असा आरोपही या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.


Powered By Sangraha 9.0