शिवसेनेचे नेते प्रदीप शर्मांना अटक; २८ जूनपर्यंत कोठडी

18 Jun 2021 11:46:17

NIA_1  H x W: 0

‘एनआयए’ने करून दाखवलं!
 
 
लोणावळा/मुंबई : नालासोपारा येथून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणारे तसेच मुंबई पोलीस दलात एकेकाळी ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अशी ख्याती असलेले मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने गुरुवार, दि. १७ जून रोजी लोणावळ्यातून अटक केली.
 
 
 
‘एनआयए’च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २८ जूनपर्यंत ‘एनआयए’च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. बहुचर्चित ‘अ‍ॅन्टिलिया’ येथील स्फोटक प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरन हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याच्या कथित आरोपांप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे समजते.
 

गुरुवारी ‘एनआयए’ने शर्मा यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर सकाळी ६ वाजल्यापासून छापेमारी सुरु केली होती. छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरासहित त्यांच्या कार्यालयावर छापे टाकत सकाळपासून ते दुपारपर्यंत ‘एनआयए’चा मॅरेथॉन तपास सुरु होता. त्यानंतर शर्मा यांची पुन्हा चौकशी करून त्यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली.
 

 
त्यानंतर प्रदीप शर्मा यांच्यासह ताब्यात घेण्यात आलेल्या मनीष सोनी आणि सतीश मोटेकरीलादेखील न्यायालयात हजर करण्यात आले. काही काळापर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने प्रदीप शर्मा यांच्यासह या दोघांनाही २८ जूनपर्यंत ‘एनआयए’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सुनावणीदरम्यान आपण शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे प्रदीप शर्मा यांनी न्यायालयाला सांगितल्याची माहिती आहे. संतोष हा माझा जुना खबरी असल्याचे सांगतानाच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशी माझा काहीच संबंध नसल्याचेही प्रदीप शर्मा यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
 
 
सचिन वाझे याच्यासोबत शर्मा यांचा या गुन्ह्यात सहभाग होता. सतीश, मनीष, रियाज, संतोष आणि आनंद यांचाही या हत्या प्रकरणात सहभाग होता. सचिन वाझे आणि शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेन हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत, असा युक्तिवाद ‘एनआयए’कडून करण्यात आल्याचे समजते. प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या घरातून एक ‘रिव्हॉल्व्हर’ मिळाली आहे, ज्याच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे, असेही तपासात आढळून आल्याची माहिती आहे.


 
प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले व अटक केली. एनआयए कार्यालयात त्यांची आता कसून चौकशी पुढे होणार आहे . प्रदीप शर्मा आहे गेल्या काही वर्षापासून शिवसेनेशी संबंधित आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूकदेखील शिवसेनेकडून लढवली होती. त्यामुळे पुढील काळात तपास सुरू असताना शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांची नाव बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 
Powered By Sangraha 9.0