सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील गावे पुनर्वसनासाठी तयार

17 Jun 2021 13:39:55
sahydri tiger reserve _1&



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोयनेच्या खोऱ्यातील वेळे आणि देऊर या गावातील ग्रामस्थ हे पुनर्वसनासाठी तयार झाले आहेत. शिवाय इतरही पाच गावे पुनर्वसनासाठी तयार झाल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्र हे वन्यजीवांच्या अधिवासच्या दृष्टीने सुरक्षित आणि मोकळे होणार आहे.
 
 
 
कोयना आणि चांदोली अभायरण्याचे संरक्षित क्षेत्र मिळून २०१० मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. हा व्याघ्र प्रकल्प १,१६६ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला असून याचे गाभा क्षेत्र ६००.१२ चौ.किमी आणि कवच क्षेत्र ५६५ चौ.किमी क्षेत्रावर आहे. व्याघ्र प्रकल्पातील वनसंपत्तीचे संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षित क्षेत्रामधील गावांचे पुनर्वसन आवश्यक आहेे. मात्र, या प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील सात गावांचे पुनर्वसन झाले नव्हते. आता या पुनर्वसानातील अडथळे दूर झाले आहेत. कोयना अभयारण्यातील बामणोली वनपरिक्षेत्रामध्ये वेळे आणि देऊर या गावांचे पुनर्वसन झाले नव्हते. परंतु, आता ही गावे पुनर्वसनाकरिता तयार झाल्याची माहिती साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.
 
 
 
 
वेळे आणि देऊर गावाचे पुनर्वसन हे भोपेगाव येथील वनजमिनीवर करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही.क्लेमेंट बेन यांनी दिली. हे पुनर्वसन वनजमिनीवर होणार असल्याने त्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक असल्याने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळे या गावात ६१ कुटुंब आणि देऊरमध्ये २८ कुटुंब वास्तव्यास आहेत. या दोन गावांव्यतिरिक्त चांदोली अभयारण्यातील मळे, कोळणे, पाठारपुंज, खुंडलापूर आणि जनाईवाडी या गावांचे पुनर्वसनही होणार असल्याची माहिती मोहिते यांनी दिली. यागावांचे पुनर्वसनही वनजमिनीवर होणार आहे. त्यामधील खुंडलापूरचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असून उर्वरित गावांचा प्रस्ताव या महिन्यामध्ये केंद्राला पाठवणार असल्याचे बेन यांनी सांगितले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रामध्ये केवळ या सात गावांचे पुनर्वसन राहिले होते. आता ते होणार असल्याने येथील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होऊन वनक्षेत्र मोकळे होणार असल्याचे मोहिते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0