"मराठा आंदोलन सुरूच राहणार!"

17 Jun 2021 21:49:01

sambhaji raje_1 &nbs
 
 
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजी छत्रपतींनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा मूकमोर्चा आंदोलन थांबणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत २ तास झालेल्या चर्चेत सकल मराठा समाजाने सहा मुख्य मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. यावेळी या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.
कोल्हापुरामध्ये ५ जून रोजी छत्रपती शाहु महाराजांच्या समाधी स्थळापासून मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजी यांच्या नेतृत्वात पहिले मूक आंदोलन सुरु केले. राज्यातील ३६ जिल्ह्यात मराठा समाज अशाचप्रकारे मूक आंदोलन करणार असल्याचे संभाजीराजेनी सांगितले. पहिल्याच आंदोलनानंतर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली व त्यानुसार ६ जूनला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावल्याची माहिती संभाजी राजेंनी दिली.
 
 
 
या पत्रकार परिषदेत त्यांनी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले :
 
 
- मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारची भूमिका काय ? ते स्पष्ट करावे.
- येत्या गुरुवारी राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार. गायकवाड अहवालाचे भाषांतर करावे. या अहवालातील त्रुटी दूर कराव्या.
- सारथीला हजार कोटी जाहीर करावे. शनिवारी पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक होणार आहे.
- २३ जिल्ह्यात मराठा समाजासाठी वसतिगृह उभारण्याचे आश्वासन दिलंय.
- २०१४पासून रखडलेल्या नियुक्त्यावर मार्ग काढावा. १४ दिवसांमध्ये सरकार यावर मार्ग काढणार असे आश्वासन.
- अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज उपलब्धतेतील अडचणी दूर कराव्या.
- मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे.
 
 
या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सरकारच्या बरोबर चर्चेसाठी एक समिती गाठीन करण्यात यावी. आमच्या मागण्यांसाठी सुरु केलेले मूक आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. २१ जून रोजी नाशिकमध्ये मूक आंदोलन होईल. यावेळी नाशिकमध्ये सर्व समन्वयक भेटून आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0