आणि आता पुन्हा ‘उत्तम शेती’

17 Jun 2021 20:26:10

farming_1  H x

कृषी क्षेत्रातील ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअप कंपन्यांमुळे कृषी विषयातील शिक्षित व प्रशिक्षितांना स्वयंरोजगारासह व्यवसायाची व त्याद्वारा शेतकर्‍यांना शेतीतील जोखीम व नासाडी कमी करून आपले उत्पन्न वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यातूनच अनेकांना पुन्हा ‘उत्तम शेती’ची फलदायी वाटही गवसली आहे.
 
 
‘उत्तम शेती, मध्यम धंदा व कनिष्ठ नोकरी’ ही व्यावहारिक म्हण भारतीय अर्थ-शेती-व्यवसायाच्या संदर्भात सुमारे ५० वर्षांपर्यंत लागू होती. नंतरच्या काळात आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेत, व्यावहारिक मानसिकतेत बरेच बदल झाले. व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहण्याच्या संकल्पना बदलत गेल्या. कालमानानुरूप व्यवसाय वा उत्पन्नाचे साधन म्हणून शेतीला दुय्यमच नव्हे तर कनिष्ठ स्थान मिळत गेले. मात्र, आता या सार्‍याच व्यावसायिक दृष्टिकोनांमध्ये व्यावहारिक बदल होत असून, शेतीसह कृषीक्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस लाभण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसून येत आहे त्याचाच हा मागोवा.
 
कृषीक्षेत्रात झालेल्या बदलांचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे हे बदल ट्रॅक्टरपासून टेक्नोलॉजीपर्यंत व सहकारी शेतीपासून व्यावसायिक शेतीपर्यंत अशा लक्षणीय स्वरूपात झाले आहेत. या बदलांमध्ये कृषी-विज्ञानाला अभियांत्रिकी-तंत्रज्ञानाची चपखल साथ मिळाल्यानेच या बदलांना चालना मिळून त्यांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. या बदलांच्या प्रक्रियेला विज्ञानासह माहिती तंत्रज्ञानाची साथ प्रयत्नपूर्वक व सातत्याने मिळत गेली हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 
शेतीसह कृषीक्षेत्राला अद्ययावत व उपयुक्त बनविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ, संशोधन संस्था व संशोधकांनी मिळून विशेष कामगिरी केली आहे. परिणामी, वारे-वातावरणाचा अंदाज, वेळी-अवेळी येणारा पाऊस, पर्जन्यमान, या सार्‍यांचा पीकपाण्यावर होणारा परिणाम इ.ची माहिती संगणकीय पद्धतीपासून उपग्रहांपर्यंतच्या प्रगत माध्यमातून देण्यात येत असल्याने त्याचा फायदा शेती आणि शेतकरी या उभयतांना होत आहे. या अभ्यासपूर्ण अंदाजामुळे शेतकर्‍यांना ऐन मोसमात ज्या अनिश्चिततेला सामोरे जावे लागते व अधिकांश वेळा नुकसानीचा सामना करावा लागतो, त्यावर तोडगा निघणे ही बाब आता बर्‍याच प्रमाणात दृष्टिपथात आली आहे.
 
यासंदर्भात काही शेतकर्‍यांचे प्रयत्न, स्वानुभव व त्यांना झालेले लाभ पडताळून घेणे म्हणूनच सर्वांसाठी मार्गदर्शक ठरते, यासंदर्भात बंगळुरूजवळील संग्रामेश तालिकोही या प्रयत्नशील शेतकर्‍याचे उदाहरण महत्त्वाचे ठरते. ४० वर्षीय या शेतकर्‍याने शेतीच्या संदर्भातील परंपरागत व पिढीजात ज्ञान आणि त्याला प्रगत तंत्रज्ञानाची साथ या कृषी पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवून त्यानुसार प्रयत्न सुरू केले.
 
गेल्या वर्षी संग्रामेशने ३८ हजार रुपये खर्चून आपल्या अडीच एकरातील टोमॅटो शेतीसाठी तीन सेंसर्स खरेदी केले. यासाठी त्यांनी शास्त्रीय पद्धतीने अभ्यासही केला. याकामी त्यांना बंगळुरू येथील अ‍ॅग्रो-टेक स्टार्टअप ‘फसल’चे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांना त्यांच्या पिकाच्या संदर्भातील माहिती, सद्यःस्थिती व तंत्रज्ञान इ.ची माहिती अद्ययावत व पूर्व सूचना स्वरूपात मिळू लागली. मुख्य म्हणजे, ही माहिती त्यांना त्यांच्या बसल्याजागी व स्मार्टफोनद्वारे मिळू लागली.
 
शेतातील सेंसर्सच्या माध्यमातून आता संग्रामेश यांना त्यांची शेती आणि पिकाच्या दृष्टीने अभ्यास करून शेतीला पाणी देण्यासाठी ओलिताचे नियोजन, ओलिताचे प्रमाण, टोमॅटोवरील किडे-कीटकांचा प्रादुर्भाव, निगराणी, पिकाच्या तोडणीची आखणी व त्याची अंमलबजावणी इ.ची अचूक माहिती वेळेत मिळते. त्यामुळे अधिकांश प्रमाणातील पीक विषयक अनिश्चिततेवर संग्रामेश यांना मात करणे आता सहज शक्य झाले आहे. शेतात खत, कीटकनाशके फवारणी-तोडणी इ.साठी सर्वसाधारणपणे केव्हा आणि किती मजूर नेमावे लागतील, याचा व्यावहारिक अंदाज ते लावू शकतात. त्यामुळे नेमक्या गरजेच्या वेळी मजुरांची नेमणूक करून मजुरीवर होणारा खर्चाचा अपव्यय ते सहजपणे टाळू शकले. टोमॅटोसारख्या नाजुक व खर्चिक पिकाच्या संदर्भात अशा अचूक व वेळेत घेतलेल्या निर्णयांमुळे संग्रामेश यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्याचा मोठा फायदा त्यांना झाला.
 
शेतकर्‍यांमध्ये कृषीविषयक परंपरागत अनुमान आणि अनुभवाला ज्ञान-विज्ञानाची जोड देण्याबद्दल विशेष चोखंदळपणा वाढल्याने कृषी-स्टार्टअप उपक्रमांना आता बरकत आलेली दिसून येते. उदाहरणार्थ, आज बंगळुरूच्या ‘फसल’ या कृषी स्टार्टअपमध्ये ३० कर्मचारी कार्यरत आहेत, ही बाब या बदलत्या परिस्थितीची परिचायक आहे. या कृषी स्टार्टअपचे संस्थापक व मुख्याधिकारी आनंद वर्मा यांच्या मते सध्या त्यांच्या स्टार्टअपचा मुख्य उद्देश शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्याव्यतिरिक्त विशेषत: बागायती शेतीतून फलोत्पादनाला चालना देणे हा आहे.
 
‘फसल’ स्टार्टअपचे सध्याचे स्वरूप हे शेती व कृषी उत्पादन सल्लागार कंपनी असे आहे. कंपनीच्या कामकाजात त्यांनी संगणकतज्ज्ञ, प्रयोगशाळा प्रमुख, फलोत्पादन मार्गदर्शक, विषय-तज्ज्ञ-मार्गदर्शक, मार्गदर्शनासह प्रत्यक्ष सल्ला देणारे, माहिती संकलन व विश्लेषण करणारे इ.चा समावेश केल्याने त्यांच्या प्रयत्नांना व्यावसायिक दिशा अल्पावधीतच मिळाली हे विशेष.
 
‘फसल’ पाठोपाठ ‘अ‍ॅग-स्मार्टिक’, ‘क्रॉप-इन’ यांसारख्या कृषी-स्टार्टअप्सनीही या क्षेत्रात आता यासंदर्भात व्यावसायिक पुढाकार घेतलेला दिसून येतो. या कृषी स्टार्टअप कंपन्या आता प्रकल्प व्यवस्थापन तत्त्व पद्धतीने शेती आणि शेतकर्‍यांसह अधिक शास्त्रीय व उपयुक्त पद्धतीने काम करीत असतात. याचा फायदा शेतकर्‍यांना दुहेरी स्वरूपात होतो. एक म्हणजे त्यांना तंत्रज्ञानासह तंत्रज्ञांचे मार्गदर्शन मिळते व दुसरे म्हणजे त्यांना शेतीच्या इतर कामांवर लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो आणि त्याचा फायदापण होतो.
 
यासंदर्भात प्रमुख उदाहरण म्हणून पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील हेमंत वाव्हळ या युवा शेतकर्‍याच्या प्रयत्नांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. ३५ वर्षीय हेमंत वाव्हळ यांनी यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आळेफाटा परिसरातील आपल्या दोन एकर डाळिंब शेतीत सेंसर लावून घेण्याचे काम ‘फसल’ या कृषी स्टार्टअप कंपनीकडे सोपविले. त्यासाठी त्यांना सुमारे ४७ हजार रुपये खर्च आला. मात्र, सेंसर बसवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार डाळिंब शेतीच्या नेमक्या कुठल्या भागात रासायनिक द्रव्याची फवारणी करायची, ही फवारणी केव्हा आणि किती प्रमाणात करायची, याचे नेमके आणि अचूक मार्गदर्शन लाभल्याने सेंसरनंतरच्या डाळिंबाच्या पहिल्याच हंगामाने त्यांना चांगला हात दिला. परिणामी, हेमंत वाव्हळ यांचे त्याद्वारे सुमारे ३० हजार रुपये वाचण्याचा मोठा फायदा झाला.
 
या निवडक प्रातिनिधिक स्वरूपांच्या उदाहरणांद्वारे प्रत्यक्षात स्पष्ट झालेली बाब म्हणजे शेतीला अनुभव व शिक्षणाशिवाय तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याचा मोठा फायदा शेती आणि शेतकर्‍यांना होत असतो. यासाठी एकीकडे शासकीय स्तरावर विविध योजनांद्वारे सरकारतर्फे शेतकर्‍यांना आर्थिक मदतीसह मार्गदर्शन केले जात असतानाच कृषीविषयक मार्गदर्शन कंपन्या व त्यातही कृषी स्टार्टअपद्वारा शेतकर्‍यांना त्यांच्या नेमक्या व विशेष गरजांनुरूप मार्गदर्शन केले जाते. प्रयत्नशील व धडपडणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. अशा ‘अ‍ॅग्रो टेक’ वा स्टार्टअप कंपन्यांची सतत वाढणारी संख्या व त्यांचा वाढता व्याप ही बाब याचीच परिचायक आहे.
 
तंत्रज्ञानावर आधारित कृषी स्टार्टअप कंपन्यांना भाजीपाला पिकविणार्‍या शेतकरी आणि त्यांच्या सहकारी शेती संस्थांकडून पण मोठी मागणी आहे. उदाहरणार्थ भाजीपाल्याला तुलनेने अधिक; पण नेमक्या प्रमाणात पाण्याची गरज असते. अशा शेतीत पाण्याचे नेमके प्रमाण, वेळापत्रक व नियंत्रण साधण्याचे तंत्र ‘क्रॉपिन’ या कृषी स्टार्टअपने विकसित केले असून, त्याचा फायदा बटाट्यासारख्या भाजीची लागवड करणार्‍या विविध प्रांतातील शेतकर्‍यांना होत आहे.
 
कृषी क्षेत्रातील ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअप कंपन्यांमुळे कृषी विषयातील शिक्षित व प्रशिक्षितांना स्वयंरोजगारासह व्यवसायाची व त्याद्वारा शेतकर्‍यांना शेतीतील जोखीम व नासाडी कमी करून आपले उत्पन्न वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यातूनच अनेकांना पुन्हा ‘उत्तम शेती’ची फलदायी वाटही गवसली आहे.
- दत्तात्रय आंबुलकर
 
Powered By Sangraha 9.0