आजि सोनियाचा दिनु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021
Total Views |

TI_1  H x W: 0
 
 
शुक्रवार, दि. १८ जून हा दिवस कसोटी क्रिकेटच्या विश्वातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये १८ जूनपासून कसोटी क्रिकेटचा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा सामना इंग्लंडच्या धर्तीवर रंगणार आहे. एकदिवसीय सामन्याच्या ‘विश्वचषक’प्रमाणेच हादेखील एक महत्त्वाचा सामना असून क्रिकेटविश्वात याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार, हे या सामन्यानंतर स्पष्ट होणार असल्याने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्याकडे असणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेने का होईना जगभरातील क्रिकेट रसिकांमध्ये कसोटी क्रिकेटची उत्सुकता पुन्हा एकदा वाढल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रयत्नांना अखेर यश आले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, क्रिकेटमध्ये जेव्हापासून ‘टी-२०’ सामन्यांचा प्रकार सुरू झाला, तेव्हापासून क्रिकेट रसिकांमधील कसोटी क्रिकेटची उत्सुकता काही प्रमाणात घटण्यास सुरुवात झाल्याचे निरीक्षण अनेक क्रिकेट समीक्षकांनी आतापर्यंत नोंदवले आहे. साधारणतः २००७ सालापासून क्रिकेटविश्वात ‘टी-२०’च्या मन्यांना सुरुवात झाली. २००७ साली दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर ‘टी-२०’ची पहिली-वहिली ‘विश्वचषक’ स्पर्धा भरविण्यात आली. २००७ सालाआधीही काही देशांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकांसोबत ‘टी-२०’च्या सामन्यांचे आयोजन केले होते. परंतु, त्याचे प्रमाण कमी होते. २००७ साली ‘आयसीसी’ने ‘टी-२०’च्या ‘विश्वचषक’ स्पर्धेचे आयोजन केले आणि त्यानंतर हळूहळू कसोटी क्रिकेटला उतरती कळा लागली. क्रिकेट रसिकांना आणि काही खेळाडूंनाही ‘टी-२०’ क्रिकेटचे सामने पसंतीस उतरू लागल्याने काही देशांनी दौर्‍यादरम्यान कसोटी मालिका वगळण्यास सुरुवात केली. परिणामी, कालांतराने कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होऊ लागले. ‘आयसीसी’ने याची दखल घेत विविध प्रयोग करत कसोटी क्रिकेटचे महत्त्व पुन्हा एकदा वाढविण्यावर भर दिला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा हादेखील त्याच एक यशस्वी प्रयोगाचा भाग असून शुक्रवार, दि. १८ जून रोजी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यास सुरुवात होणार आहे. म्हणूनच, क्रिकेटविश्वाच्या इतिहासात या दिवसाची नोंद सुवर्ण अक्षरांनी केली जाणार आहे.
 
 


‘अच्छे दिन’ आले!

 
 
केवळ आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ सामनेच नाही तर वाढीस लागलेल्या लीग स्पर्धादेखील कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी करण्यास जबाबदार आहेत, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. २००७ साली जरी ‘आयसीसी’ने आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’च्या ‘विश्वचषक’ स्पर्धेचे आयोजन केले असले, तरी त्यानंतर विविध देशांमध्ये झालेल्या अनेक मालिकांदरम्यान कसोटी मालिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्या काळातील कसोटी क्रिकेटचे प्रमाण पाहता या प्रकारच्या क्रिकेटवर परिणाम होईल, असा विचारदेखील करण्यात आला नव्हता. परंतु, कालांतराने कसोटी क्रिकेटवर परिणाम झाला आणि याचे महत्त्व काहीसे कमी झाल्याचे अधोरेखित झाले. २००८ सालानंतर क्रिकेटविश्वात विविध देशांकडून ‘टी-२०’च्या ‘लीग’ स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. ‘लीग’ स्पर्धा सुरू करण्यात भारतानेच सर्वात आधी आघाडी घेतली. भारताने २०08 साली ‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धेचे आयोजन केले. कालांतराने भारताप्रमाणेच विविध देशांनी आपल्या देशांमध्ये ‘लीग’ स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. दरवर्षी या ‘लीग’ स्पर्धांचे आयोजन होण्यास सुरुवात झाल्याने सामन्यांची संख्या वाढली. अनेक खेळाडू एकदिवसीय आणि ‘टी-२०’ स्पर्धांदरम्यानच व्यस्त राहू लागले. या दोन्ही प्रकारांमध्ये खेळल्यानंतर नेमक्या कसोटी क्रिकेटदरम्यान नामवंत खेळाडू आराम करू लागले. यामुळे कसोटी क्रिकेटमधील महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली. प्रत्येक दौर्‍याची सुरुवात आधी कसोटी मालिकेपासून होत असे. मात्र, अनेक दौर्‍यांची सुरुवातदेखील एकदिवसीय आणि ‘टी-२०’ सामन्यांनी होऊ लागली. अनेकदा दौर्‍यादरम्यान तर केवळ एकदिवसीय आणि ‘टी-२०’ क्रिकेट प्रकारच्या मालिकांचे आयोजन होऊ लागले आणि कसोटी मालिकांना वगळण्यास सुरुवात झाली. परिणामी, कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होऊ लागले. खेळाडू आणि क्रिकेट रसिकांना याकडे पुन्हा वळते करण्यासाठी ‘आयसीसी’ने विविध प्रयोग केले. गुलाबी चेंडूचा वापर करत दिवस-रात्र कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास ‘आयसीसी’ने सुरुवात केली. गुलाबी चेंडूच्या उत्सुकतेमुळे क्रिकेट रसिक पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटकडे वळण्यास सुरुवात झाली. यानंतर ‘आयसीसी’ने कसोटी क्रिकेटच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटला महत्त्व प्राप्त झाले. कसोटी क्रिकेटचे जुने म्हणजेच पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ आले, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@