फक्त बॉटल बाजूला ठेवल्याने कोका कोलाला २९,३२३ कोटींचा फटका

16 Jun 2021 16:05:22

Ronaldo_1  H x
 
 
मुंबई : खेळाडूच्या एका कृतीमुळे एखाद्या कंपनीला हजारो कोटींचे नुकसान झाल्याची घटना नुकतीच जगाने पाहिली. जागतिक सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो याने युरो कपमध्ये हंगेरीविरुद्धच्या सामन्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये आला. यावेळी त्याने कॅमेरासमोर ठेवलेल्या कोका कोलाच्या बॉटल बाजूला केल्या आणि तिथे पाण्याच्या बॉटल ठेवल्या. स्वतःच्या आरोग्याची अपार काळजी घेणार्‍या रोनाल्डोच्या या कृतीमुळे कोका कोला कंपनीला तब्बल ४ बिलियन युएस डॉलर म्हणजेच २९, ३२३ कोटींचा मोठा फटका बसला आहे.
 
 
युरो कप २०२०ची प्रायोजक म्हणून कोका कोला कंपनी आहे. तरीही, रोनाल्डोच्या कृतीतून नकळतपणे 'शीतपेयाऐवजी पाणी प्या' असाच संदेश गेला. त्याच्या या एका कृतीमुळे कंपनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू तब्बल २९, ३२३ कोटींनी कमी झाली आहे. कोका कोला कंपनीचे ५६.१० डॉलर किंमतीचे शेअर ५५.२२ डॉलर झाले आहेत. म्हणजेच, रोनाल्डोच्या या कृतीमुळे कंपनीच्या शेअरची किंमत १.६ टक्क्यांनी पडली आहे. यामुळे कोका कोलाची ब्रॅण्ड व्हॅल्यू २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलर झाली.
 
 
"कोणी काय प्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न"
 
 
रोनाल्डोच्या या कृतीवर आता कोका कोलानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. "प्रत्येकाला आपल्याला काय प्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे, कारण लोकांच्या आवडी आणि गरजा वेगळ्या असतात." असे कंपनीने संगितले आहे. "खेळाडू पत्रकार परिषदेसाठी येतात तेव्हा त्यांच्यासाठी कोका कोला, कोका कोला झिरो शुगर सोबतच पाणीही ठेवलेले असते." असे युरो कपच्या प्रवक्त्यांनी संगितले आहे.
 
रोनाल्डोने रचला आणखी एक विक्रम
 
मंगळवारी झालेल्या हंगेरीविरुद्ध सामन्यात पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोने आणखी एक विक्रम रचला. पोर्तुगालने या सामन्यात हंगेरीचा ३-० ने पराभव केला. पाचवा यूरो कप खेळणाऱ्या रोनाल्डोने मॅचच्या ८७ व्या आणि ९०व्या मिनिटांना दोन गोल करत त्याच्या संघाला ३-० असा विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे शेवटच्या १० मिंनिटांमध्ये हा सामना पोर्तुगालच्या बाजूने वळला.
 
Powered By Sangraha 9.0