राजकारण बहुत करावे!

    16-Jun-2021
Total Views |

swami 2_1  H x

सच्चेपणा, चारित्र्यसंपन्नता, दूरदृष्टी, क्षात्रतेज, चतुरस्रता, शहाणपण इत्यादी गुणांना समर्थ ‘राजकारण’ म्हणतात. प्रजेच्या हितांचे रक्षण करणे, प्रजेच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पातळीत सुधारणा करण्यासाठी स्वराज्य व स्वातंत्र्य संपादन करणे, ही राजकारणाची व्याप्ती होती. यासाठी सक्षम नेतृत्व असायला हवे.
 
ज्या समाजाला चांगले नेतृत्व लाभत नाही, त्या समाजाची अवस्था बिकट असते. चांगले नेतृत्व दुर्मीळ असते. भाग्याने ते समाजाला मिळते. सर्व क्षेत्रांत चांगल्या नेत्यांची समाजाला गरज असते. तथापि नेतृत्व म्हटले की, आम्ही फक्त राजकीय नेत्यांचा विचार करतो. राजकारण हे आमच्या दृष्टीने सर्वस्व असते. ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ बदलत गेला आहे. आज ‘राजकारण’ शब्दाचा अर्थसंकोच झाला आहे. सत्ता संपादनासाठी व टिकवण्यासाठी केलेल्या हालचालींना आज आम्ही ‘राजकारण’ म्हणून संबोधतो. पण, समर्थांच्या काळी ‘राजकारण’ हा शब्द या अर्थाने वापरत नसत. सच्चेपणा, चारित्र्यसंपन्नता, दूरदृष्टी, क्षात्रतेज, चतुरस्रता, शहाणपण इत्यादी गुणांना समर्थ ‘राजकारण’ म्हणतात. प्रजेच्या हितांचे रक्षण करणे, प्रजेच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पातळीत सुधारणा करण्यासाठी स्वराज्य व स्वातंत्र्य संपादन करणे, ही राजकारणाची व्याप्ती होती. यासाठी सक्षम नेतृत्व असायला हवे. नेतृत्वहीन समाजाची किती वाईट अवस्था असते हे पाहायचे असेल, तर स्वामींच्या तीर्थाटन काळातील हिंदुस्थानची स्थिती पाहावी, हिंदू समाजाची स्थिती पाहावी.


 
आपल्या १२ वर्षांच्या तीर्थयात्रेच्या काळात समर्थांनी भारतीय समाजाची सर्व क्षेत्रातील दुरवस्था पाहिली. महाराष्ट्रापुरता विचार करायचा, तर उत्तरेकडील शहाजहानची सत्ता, त्याने नेमलेला दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगजेबासारखा जुलमी व कपटी सरदार, दक्षिणेकडील आदिलशाही असा सर्व बाजूंनी मुसलमानी राजसत्तांनी महाराष्ट्राला वेढा घातलेला होता. स्वामींनी पाहिले की, उत्तरेकडील बादशाही सत्ताधीश, त्यांचे अधिकारी उन्मत्तपणे वागत होते. हिंदू प्रजेवर, हिंदू संस्कृतीवर अत्याचार होत होते. सततच्या लढायांमुळे स्थिरता नव्हती. धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सर्वत्र गोंधळच होता. भोंदूगिरीला ऊत आला होता. भूतखेत, चेटके यांचे प्रयोग करणारे हातचलाखीने चमत्कार करुन दाखवणारे महाभाग स्वत:ला गुरू म्हणवून घेत होते. समर्थ म्हणतात-
जिकडे तिकडे ज्ञान झाले। उदंड गोसावी उतले। 
तयांचे संगतीने जाले। बाष्कळ प्राणी॥
 
 
या भोंदूगुरुंना स्वानुभवाचा लेश नव्हता. आध्यात्मिकतेचा त्यांना गंध नव्हता. एकंदरीत हिंदू समाजात जिकडे तिकडे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
 
 
ऐसे अवघे नासले। सत्यासत्य हरपले।
अवघे अनायेक जाले। चहूंकडे॥ (११.२.२४)
 
 
मतमतांचा गल्बला। कोणी पुसेना कोणाला।
जो जे मतीं सांपडला। तयास तेचि थोर॥ (२५)
 
 
अशा निर्नायकी नेतृत्वहीन समाजाला कसले भवितव्य असणार? चांगल्या नेतृत्वगुणांचा, कार्यकर्त्यांचा विचार समर्थांनी त्यांच्या काळाला अनुसरुन केला असला, तरी स्वामींचे विचार आजच्या काळातही मोलाचे आहेत.
 
 
स्वामींच्या मते राजकारणात दूरदृष्टी, सावधानता, सच्चेपणा, चारित्र्य, चतुरस्रता, क्षात्रवृत्ती इत्यादी गुणांची आवश्यकता असते. हे गुण कमी पडले, तर राज्य लयाला जाते. मुसलमानांच्या आक्रमणानंतर दक्षिणेकडील एकमेव उरलेले विजयनगरचे हिंदू साम्राज्य बेसावध राहिल्याने टिकू शकले नाही. दक्षिणेकडील पाच मुसलमानी शाही इस्लामच्या नावावर एकत्र आल्या आणि त्यांनी विजयनगरचे हिंदू साम्राज्य नष्ट केले. राजकारणात ज्या गुणांची आवश्यकता असते, ते गुण नेत्याने आत्मसात करुन ‘राजकारण बहुत करावे’ असे स्वामी सांगतात. या नेतृत्वगुणांची आवश्यकता सर्व ठिकाणी, सर्व क्षेत्रांत आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांतील नेत्यांनी लोकांना शहाणे करावे. रामदासांनी याची क्रमवारी सांगितली आहे.
 
 
मुख्य ते हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।
तिसरे सावधपण। सर्व विषयी॥
 
 
त्यानंतर चौथा अत्यंत साक्षेप असेे स्वामींनी सांगितले आहे. ’हरिकथा निरुपण’ याचा अर्थ सामान्य माणसे पुराणिक बुवांनी सांगितलेल्या भगवंताच्या अवतारी लिला असा घेतात. पण, समर्थांना तसा अर्थ अभिप्रेत नाही. अवतारी पुरुष राम, श्रीकृष्ण यांच्या कथा अभ्यासल्या, तर त्यांचे अवतारी कार्य ‘सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश’ हे स्पष्ट होते. भगवद्गीतेत ‘परित्राणाय साधुनां। विनाशायच दुष्कृताम्।’ हे जीवितकार्य स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. भगवंत पुढे असेही सांगतात की, पृथ्वीवर जेव्हा अधर्म बोकाळतो तेव्हा त्या अधर्माचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतो. हरिकथा निरुपणात अवतारांचे क्षात्रतेज, नि:स्पृहता, दुष्टांचा नाश करुन सज्जनांचा पाठीराखा या गुणांचा उल्लेख आला पाहिजे, असे स्वामींना वाटते. सर्वसामान्य नेत्यांनी सज्जनांचे रक्षण करावे आणि दुष्टांचा नायनाट करावा, हे मनावर पक्के बिंबले की, नंतर राजकारणाचा विचार करावा. याचा अर्थ हरिकथा निरुपणात राजकारण अनुस्यूत आहे, हे स्वामींनी स्पष्ट केलेले आहे. राजकारणाप्रमाणे कुठल्याही क्षेत्राचे पुढारीपण करायचे तर नेत्याच्या अंगी चारित्र्यसंपन्नता, समंजसपणा, नि:स्पृहता, नि:स्वार्थपणे काम करायची तयारी इत्यादी गुणांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे नेतृत्व करण्यासाठी नेत्याच्या अंगी व्यवहारचातुर्य लागते. समर्थ त्याला ‘राजकारण’ म्हणतात. चतुर माणूस नेहमी चौफेर निरीक्षण करीत असतो. कुठे काय चालले आहे, यांची माहिती मिळवून त्यानुसार तो घटनांचे आडाखे बांधतो. त्यांचे निर्णय सहसा चुकत नाहीत. अशा चतुरस्रांनी नेतृत्व करावे, या उलट मूर्ख हा ठरावीक चाकोरीने आयुष्य जगत असतो, तो स्वत:पुरते पाहत असल्याने स्वार्थी असतो व प्रसंगी त्यासाठी भ्रष्टाचार करतो. अशा माणसाने समाजाचे नेतृत्व करु नये. राजकारण हा त्यांचा प्रांत नव्हे. समर्थ सांगतात की, ‘मूर्ख येकदेयी होतो। चतुर सर्वत्र पाहतो॥’
 
 
समर्थांनी त्यांच्या काळाला अनुसरुन महंताना नेतृत्वगुणांचे महत्त्व सांगितले. सर्वप्रथम महंताने आत्मज्ञानी असावे. आत्मज्ञानी असल्याने महंत त्यांचे निर्णय अंत:प्रेरणेने घेतो. त्यामुळे महंताच्या मनात नेमके काय चालले आहे, हे लोकांना कळत नाही. हा महंत नेता एकांतात राहून ध्यानधारणा परिस्थिती व ग्रंथांचा अभ्यास करतो. लोकांना सन्मार्गाला लावून आपला काळ सार्थक लावतो. तसेच लोकसमुदाय तयार करण्याचे काम तो गाजावाजा न करता करीत असतो.
 
 
उत्तम गुण तितके घ्यावें। घेऊन जनास शिकवावे॥
उदंड समुदाय करावें। गुप्तरुपे॥
 
 
नेत्याच्या अंगी आणखी एक स्वभावगुण असावा, तो म्हणजे माणसे ओळखता आली पाहिजेत. पाहिल्याबरोबर त्याला माणसाची योग्यता समजावी. त्यामुळे लायकीनुसार कोणाला जवळ करायचे अथवा दूर ठेवायचे, हे नेत्याला ठरवता येते. लायक माणसाला काम दिले तर ते व्यवस्थित पार पडते. लायकी नसताना काम दिले, तर त्या कार्याचा नाश होतो.
 
 
अधिकारपरत्वे कार्य होते। अधिकार नस्ता वेर्थ जाते॥
जाणोनि शोधावी चित्ते। नाना प्रकारे॥
 
 
नेत्याने नेतृत्वाचे सर्व गुण आत्मसात करुन लोकांसाठी काम केले, एवढ्याने भागायचे नाही. कामाचा व्याप मोठा असल्याने त्याने आपल्यासारखे गुणवान नेते व कार्यकर्ते तयार करावेत आणि आपल्या अनुभवाचे शिक्षण देऊन त्यांना जिकडे तिकडे काम करण्यासाठी पाठवून द्यावे. आपल्या कामासाठी नेत्यांचे जाळे तयार करावे, त्या नेत्यांना दूरदूर पाठवून त्यांच्याकडून काम करुन घ्यावे.
 
 
महंते महंत करावे। युक्तिबुद्धिने भरावे।
जाणते करुन विखरावे। नाना देसी॥
 
 
अशा गुणसंपन्न नेत्यांनी, नि:स्पृहांनी राजकारण बहुत करावे, ते समाजहिहताचे असून त्यानेच लोकांचा व देशाचा उद्धार होतो

 
- सुरेश जाखडी