चीनला दणका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2021
Total Views |

China_1  H x W:
 
 
गलवान खोर्‍यातील संघर्षाच्या एक वर्षानंतर चिनी वस्तू-उत्पादनांवरील बहिष्कारास्त्राचे नेमके काय झाले, याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यानुसार मागील वर्षभरात ४३ टक्के भारतीय नागरिकांनी एकही चिनी बनावटीची वस्तू खरेदी केलेली नाही, जे कौतुकास्पद म्हटले पाहिजे.
 
 
 
भारत आणि चिनी सैनिकांदरम्यान लडाखच्या गलवान खोर्‍यातील संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी भारतीय सैनिकांनी आपल्या मातृभूमीवर कब्जा करण्याच्या चिनी सैनिकांच्या प्रयत्नांना हाणून पाडले होते. त्यात भारताच्या २० सैनिकांनी प्राणांची आहुती दिली, तर चीनच्याही ४५पेक्षा अधिक सैनिकांचा मृत्यू झाला. तथापि, संघर्षाच्या अनेक दिवसांनंतरही चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूची माहिती दडवून ठेवली होती, तर भारताने मात्र आपल्या सैनिकांच्या हौतात्म्यासमोर नतमस्तक होत त्यांना आदरांजली वाहिली, त्यांचा सन्मान केला. तथापि, दोन्ही देशांतील सैनिकांतल्या संघर्षानंतरही चीनने अनेक दिवस-महिने भारतीय भूभाग बळकावण्याच्या उद्देशाने तणावाची परिस्थिती निर्माण केली, इशारे-धमक्या दिल्या. पण, चीनच्या बेटकुळ्यांसमोर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अजिबात झुकले नाही व सीमेवर सुरक्षा वाढवली, तसेच चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ केला. सोबतच चिनी सैनिकांच्या आगळिकीमुळे तमाम भारतवासीयांच्या मनातही त्या देशाविरोधात तीव्र विरोधाची भावना तयार झाली होती. प्रत्येक व्यक्ती सीमेवर जाऊन देशासाठी लढू शकत नाही. पण, चिनी वस्तू खरेदी न करून त्या देशाला आर्थिकदृष्ट्या दणका देऊ शकतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले. परिणामी, चिनी वस्तू-उत्पादनांच्या बहिष्कारासाठी देशभरातून आवाहन केले जाऊ लागले, त्यासाठी अभियान चालवले गेले. आता एक वर्षानंतर चिनी वस्तू-उत्पादनांवरील बहिष्कारास्त्राचे नेमके काय झाले, याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली असून, ती सुखावह आहे. त्यानुसार मागील वर्षभरात ४३ टक्के भारतीय नागरिकांनी एकही चिनी बनावटीची वस्तू खरेदी केलेली नाही, जे कौतुकास्पद म्हटले पाहिजे.
 
 
दरम्यान, भारतभूमीकडे वाकडे डोळे करून पाहणार्‍या चीनला धडा शिकवण्यासाठी प्रत्येक राष्ट्रवादी व्यक्ती उत्सुक होती. त्यासाठीच चिनी वस्तू-उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम चालवली गेली. पण, त्याचीही परधार्जिण्या नेते, पक्ष, संघटना व तथाकथित विचारवंत, बुद्धिजीवी वगैरेंनी खिल्ली उडवली, तर अर्थतज्ज्ञ, अर्थविश्लेषक म्हणवणार्‍यांनी बलाढ्य चीनविरोधातील जराशा बहिष्कारास्त्राने काय होणार, असेही सवाल केले. अर्थातच, वरील सर्वांनी भारतातील देशप्रेमी, देशभक्त जनतेच्या मनातील भावनेचा विचार केला नाही, तिला कवडीमोल ठरवले. चिनी वस्तू-उत्पादनांच्या बहिष्काराने त्या देशाला किती नुकसान होईल, त्याला किती फटका बसेल, हा नंतरचा भाग होता. पण, भारताचे वाईट करू इच्छिणार्‍या देशाविरोधातली जनभावना महत्त्वाची होती व तिचा मान राखणे गरजेचे होते. पण, त्यांनी ते केले नाही. तथापि, सर्वसामान्य भारतीयांनी मात्र आपले बहिष्कारास्त्र उगारले आणि त्याचाच परिणाम आज आपल्यासमोर आल्याचे दिसते. ‘कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्कल्स’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार चिनी वस्तू-उत्पादनांवरील बहिष्काराचे आवाहन यशस्वी ठरले आणि ४३ टक्के लोकांनी स्वेच्छेने त्या वस्तू-उत्पादनांची खरेदी करणे नाकारले, तर याच कालावधीत ज्यांनी चिनी वस्तू-उत्पादनांची खरेदी केली, त्यातल्या ६० टक्के लोकांनी चीननिर्मित एक ते दोनपेक्षा अधिक वस्तू-उत्पादने खरेदी केली नाही, असे सांगितले. वरील आकडेवारी आश्वासक आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चे आवाहन केले होते. विविध आंतरराष्ट्रीय नियमांमुळे कोणत्याही शासनाला थेट एखाद्या देशाच्या वस्तू-उत्पादनांवर बहिष्काराचा निर्णय घेता येत नाही. पण, ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाने जनतेलाही नेमके काय करायचे, हे समजले. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत जनतेने स्वदेशी वस्तू-उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावे, असा उद्देश होता. त्यालाही जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याचे सदर सर्वेक्षणातील आकडेवारी दाखवून देते. सोबतच भारत सरकारने नियमांचे पालन न करणार्‍या व भारतीय नागरिकांची माहिती चीन सरकारला देत असल्याच्या संशयावरून अनेक चिनी संकेतस्थळे व मोबाईल अ‍ॅप्स कायमस्वरूपी बंद केले. ‘टिकटॉक’सारखे अ‍ॅप बंद केल्याने भारतविरोधी चिनी प्रपोगंडा थंडावला, तसेच अनेक नवीन भारतीय अ‍ॅप्सची निर्मिती झाली व त्याचा भारतालाच फायदा झाला.
 
 
 
‘लोकल सर्कल्स’ने सदर सर्वेक्षण देशातील २८१ जिल्ह्यांतील १८ हजार नागरिकांची मते जाणून केले आहे. त्यातल्या ४३ टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात कोणतीही चिनी वस्तू-उत्पादने खरेदी केली नाहीत. त्यातून चीनला नक्कीच दणका बसल्याचे स्पष्ट होते. पण, तरीही सदर सर्वेक्षण अंतिम नाही, तर १०० टक्क्यांपर्यंत जनतेने चिनी वस्तू-उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे, असे वाटते. कारण, चीन सदैव भारताच्या वाईटाची अपेक्षा मनी बाळगूनच वागत आला. १९६२ साली चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला, तर आता दहशतवादाचा बालेकिल्ला असलेल्या पाकिस्तानला चीनचा पाठिंबा आहे. पाकिस्तान सतत भारताविरोधात कट-कारस्थाने करत असतो. भारत अस्थिर राहावा, असे त्याला वाटत असते. चीनचीही तीच मनीषा असल्याने तो देशही पाकिस्तानची मदत करत असतो. म्हणजेच, चीन असो वा पाकिस्तानी, दोन्ही देश भारतविरोधी भूमिकेत असून दोघांनी त्यासाठी हातमिळवणी केलेली आहे. अशा परिस्थितीत भारतीयांनी चिनी वस्तू-उत्पादने खरेदी केल्याने चीनचाच आर्थिक फायदा होतो व तो देश त्या पैशांचा वापर भारताच्या कुरापती काढण्यात करतो. म्हणूनच, देशातील १०० टक्के जनतेने चिनी वस्तू-उत्पादनांवर बहिष्कार टाकून त्या देशाला अद्दल शिकवली पाहिजे. परंतु, चिनी वस्तू-उत्पादने खरेदी करणार्‍यांच्या मते ती स्वस्त असतात आणि चांगलीही असतात किंवा कमी किमतीत चांगल्या वस्तू-उत्पादने मिळतात. त्यामुळेच चीननिर्मित इलेक्ट्रिकल वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, मोबाईल्ससारख्या वस्तूंसाठी भारत अजूनही मोठा बाजार आहे. भारताच्या ‘इंटरमिजिएट गुड्स इंपोर्ट’मध्ये चीनचा १२ टक्के, तर ‘कॅपिटल गुड्स’मध्ये ३० टक्के आणि ‘कन्झ्युमर गुड्स’मध्ये २६ टक्के वाटा आहे. तो कमी करण्यासाठी गलवानसारख्या घटनेनंतरही भारतीय वस्तू-उत्पादनांच्या गुणवत्तेत वाढ व दरात घट होणे गरजेचे आहे, असे दिसते. जेणेकरून भारतवासी भारतीय वस्तू-उत्पादनांचीच खरेदी करतील व चीनला आतापेक्षाही जोराचा झटका बसेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@