मुंबई - ओबीस विभागाचा कार्यभार असणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या विभागाविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या विभागाच्या कामकाजासाठी मला समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे विना कर्मचारी, अधिकारी मी खात कसं सांभाळणार असा सवाल त्यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणाप्रकरणी मंत्री विजय वडेट्टीवार हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खात्याबरोबर इतर मागास बहुजन कल्याण खात्याची देखील जबाबदारी आहे. या खात्यामधील ओबीसी विभागाकडे सरकारकडून झालेल्या दुर्लक्षाबद्दल वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. या खात्याच्या कारभार सांभळणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या आडमूठेपणाबद्दल त्यांनी सांगितले आहे.
पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "माझ्याकडे असणाऱ्या ओबीसी विभागाला समाजकल्याण विभागाचे अधिकारी जोडले गेले आहेत. या विभागासाठी कोणतेही संरचना नाही. या विभागासाठी आवश्यक असणाऱ्या पदांना मंजूरी दिली आहे. मात्र, ही पदे भरण्याचे अधिकार मला नाही. त्यामुळे विना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशिवाय मी खात कसं सांभाळणार ? मी मुख्यमंत्री यांच्याकडे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. तसेच अजित पवारांनाही पत्र लिहून समाजकल्याण विभागाकडून ओबीसी विभागासाठी देण्यात येणारी १५० ते २०० पदे मंजूर करण्याची विनंती केली आहे. मात्र, समाजकल्याण विभाग ही पदे सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सरळ सेवा भरतीमधून ही पदे भरण्याची विनंतही उपमुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे."