सुरक्षा ‘डिजिटल वॉलेट’ची

12 Jun 2021 22:01:42

wallet_1  H x W
 
 
ऑनलाईन व्यवहार करताना केवळ बँकांचे अ‍ॅप्सच नाही, तर पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या विविध ‘डिजिटल वॉलेट्’सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हल्ली व्यवहार केले जातात. पण, ज्याप्रमाणे आपण आपले वॉलेट प्रवासात किंवा घराबाहेर अगदी सुरक्षित असेल, याची वेळोवेळी खातरजमा करतो, तसाच प्रकार ‘डिजिटल वॉलेट्’सच्या बाबतीतही लागू आहे. तेव्हा, ऑनलाईन फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या ‘डिजिटल वॉलेट्’सची सुरक्षा कशी करायची, त्याची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया.
 
 
ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचा प्रवास इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग असा सुरू होऊन, सध्या तो बहुतांश वेळा ‘डिजिटल वॉलेट’/ ‘युपीआय’(गुगल पे, पेटीएम, फोन पे) अशा माध्यमातून केला जातो. ‘पेटीएम’, जे वॉलेट प्लेअर्समध्ये अग्रगण्य आहे आणि ‘फोन पे’, ‘गुगल पे’ आणि तुलनेने नवीन प्रवेशदार व्हॉट्स अ‍ॅप पूर्णपणे ‘युपीआय’वर काम करतात.
 
 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘फ्लिपकार्ट’पासून दूर करण्यात आलेल्या ‘फोन पे’ने सध्या ‘गुगल पे’ आणि ‘पेटीएम’शी स्पर्धा केली असून, जानेवारी २०२१ मध्ये सुमारे १.६८ लाख कोटी रुपयांच्या ९६८.७२ दशलक्ष ‘युपीआय’ व्यवहाराच्या तुलनेत यंदाच्या १.६८ लाख कोटी रुपयांच्या ९७५.५३ दशलक्ष ‘युपीआय’ व्यवहार पूर्ण झाले. इतक्या मोठ्या संख्येने हे व्यवहार होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे, हे वापरायला अतिशय सोपे पडते. एकदा मी वरीलपैकी कोणतेही अ‍ॅप व्यवस्थित सुरू केले की, मला एखादा व्यवहार काही सेकंदात पूर्ण करता येतो आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेसुद्धा ‘ओटीपी’ आणि ‘बायोमेट्रिक’ या दोन्हीचा वापर होत असल्यामुळे हा पर्याय सर्रास वापरला जातो आहे.
 
 
 
 
1_1  H x W: 0 x
 
 
 
या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आज अशा अनेक व्यवहारांसाठी आपण ‘पेटीएम’/‘गुगल पे’/‘फोन पे’ अशा विविध पर्यायांचा उपयोग करतो.
 
 
 
पण, याचबरोबर यातील सुलभतेचाच उपयोग करून फसवणुकीचे अनेक प्रसंग दैनंदिन जीवनात पाहायला/ऐकायला मिळतात.
जे लोक नियमितपणे याचा वापर करतात, त्यांना आता कशाप्रकारे फसवले जाते, याबद्दल बर्‍यापैकी कल्पना असल्यामुळे त्यांच्याबाबतीत असे प्रकार कमी झाले आहेत. पण, त्याचबरोबर अशी अ‍ॅप वापरणारे लोक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे व त्यांना यासंबंधी पूर्ण माहिती नसल्यामुळे असे प्रकार रोखण्यामध्ये अपेक्षित असे यश अजून येत नाहीये. सध्याच्या ‘लॉकडाऊन’मुळे हे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, त्याचबरोबर ‘हॅकर्स’ची संख्यासुद्धा खूप वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण स्वतः हे व्यवहार करत असताना याबाबतीत साक्षर, सजग व सतर्क राहिले पाहिजे, त्याचबरोबर शक्य असेल तेव्हा आपल्या परिचितांनासुद्धा याबद्दल योग्य ती माहिती आवर्जून दिली पाहिजे.
 
 
 
‘गुगल पे’संबंधित सतर्कता
 
 
 
१. केवळ आपल्या ओळखीच्या लोकांनाच पैसे पाठवा. ‘गुगल पे’वर पैसे पाठविणे, मित्र आणि कुटुंबासाठी आणि छोट्या व्यावसायिक व्यवहारासाठी आहे. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना त्याचे नाव व नंबर तपासूनच पुढे जावे.
 
 
२. व्यवहार सुरक्षित होण्यासाठी ‘गुगल पे’ने खूप चांगल्या प्रकारे सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे. तरीसुद्धा माहीत नसल्यामुळे चुका होतात आणि आपण पैसे गमावून बसतो. विशेषतः एक मुख्य गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, ‘गुगल पे’ वापरत असताना जेव्हा आपल्याला ‘ओटीपी’ येतो याचा एकमेव अर्थ असा की, तो बरोबर दिल्यावर आपल्या खात्यातून पैसे जाणार आहेत. अन्य कोणत्याही व्यवहारासाठी ‘गुगल पे’ हे ‘ओटीपी’ मागत नाही.
 
३. आपण एखाद्याला ‘गुगल पे’वरून पैसे पाठवले, तर नंतर त्याची पावतीसुद्धा पाठवतो. शक्यतो, पैसे मिळाल्याची खात्री झाल्यावर ती पावती किंवा ‘स्क्रिन शॉट’ हा डिलीट करून टाकावा, कारण त्यामध्ये दोघांचीही माहिती असते.
 
 
४. ‘गुगल पे’चा एखादा व्यवहार अपूर्ण झाला आणि आणि आपले पैसे वजा झाले, तर त्यावेळी सर्वप्रथम आपले जे बँक खाते ‘गुगल पे’शी संलग्न आहे, त्या बँकेशी तत्काळ संपर्क करावा. नंतर आवश्यकता लागली तरच ‘गुगल पे’शी योग्य नंबरवरच संपर्क करावा.
 
 
 
काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगात एका तरुणाने ‘गुगल पे’च्या माध्यमातून आपल्या विम्याचा हप्ता भरला. त्याच्या खात्यातून पैसे वजा झाले. पण, समोरून विमा कंपनीतर्फे हप्त्याची रक्कम मिळाल्याची पुष्टी झाली नाही. त्यामुळे घाबरून त्या तरुणाने ‘गुगल’वर ‘गुगल पे’चा हेल्पलाईन नंबर शोधला, जो नंबर दिसला (तो न पडताळता) त्याला त्यांनी कॉल केला व सर्व प्रसंग सांगितला, अर्थातच कॉल वरचा माणूस ‘हॅकर’ होता. त्याने सहानुभूतीने धीर देऊन मी तुमचा प्रश्न सोडवतो त्यासाठी एक ‘ओटीपी’ आवश्यक आहे, जो तुम्हाला आता आला असेल तो मला सांगा, त्या तरुणाने तत्काळ तो ‘ओटीपी’ सांगितला आणि त्याच्या खात्यातून आणखी काही हजार रक्कम त्या ‘हॅकर’ने काढून घेतली.
 
 
Paytm / Phone PegmaIo Digital Wallets (‘पेटीएम’/‘फोन पे’सारखे ‘डिजिटल वॉलेट्स’) वापरताना
 
 
 
१. जसे आपल्या खिशातील पाकिटात मोजके पैसे असतात व बाकीचे पैसे आपल्या घरी किंवा बँकेत सुरक्षित असतात, तसेच आपल्या ‘डिजिटल वॉलेट’मध्ये व्यवहारापुरते मोजकेच पैसे ठेवावेत.
 
 
२. तुम्हाला ‘डिजिटल वॉलेट’ सेट करण्यासाठी तुमचा मोबाईल फोन नंबर आणि ईमेल आयडी वापरून अकाऊंट सेटअप करण्याची गरज आहे. तुम्ही वॉलेटमध्ये एका महिन्यात साधारण दहा हजारपर्यंत व्यवहार करू शकता. आपण मासिक मर्यादा वाढवू इच्छित असल्यास, नंतर आपण ‘केवायसी’ पूर्ण करून ही मर्यादा वाढवू शकतो.
 
 
३. अशा प्रकारच्या ‘डिजिटल वॉलेट’मध्येसुद्धा बरेच चांगले सुरक्षेचे ‘फीचर्स’ आहेत. उदाहरणार्थ, आपल्या फोनचे ‘स्क्रिन लॉक’ आपण या वॉलेटशी जोडू शकतो, ज्यामुळे याचा गैरवापर होणार नाही.
 
 
४. आपण ‘पेटीएम पेमेंट’ स्वीकारत असल्यास, ‘क्यूआर’ कोडद्वारे असे करा. ‘क्यूआर’ कोड अद्वितीय आणि encrypted (इन्क्रप्टेड) आहेत.
 
 
५. आपले ‘पेटीएम’ वॉलेट रिचार्ज करताना आपल्या कार्डचा तपशील जतन करू नका. जरी हे थोडेसे गैरसोयीचे असले, तरी व्यवहार करताना कार्डची माहिती सेव्ह करून ठेवू नये.
 
 
६. आपल्या फोनवर इतर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. कारण, ते आपल्या मोबाईल डिव्हाईसवरील डेटामध्ये हस्तक्षेप करू शकतात, म्हणून शक्यतो अनावश्यक अ‍ॅप्स/गेम्स हे वापरणे टाळावे.
 
 
‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (युपीआय)
 
 
 
2_1  H x W: 0 x
 
 
‘युपीआय’ हे बँक खात्यांशी असते, तर ‘डिजिटल वॉलेट’ बँक खात्यांमधील मध्यस्थांसारखे कार्य करतात. ‘युपीआय’द्वारे बँक खाते वापरताना ‘व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस’ (व्हीपीए)चा उपयोग केला जातो. ‘युपीआय’ अ‍ॅपद्वारे ‘व्हीपीए’च्या माध्यमातून आपल्या विविध खात्यांतर्गत व्यवहार करता येतात, तसेच अन्य कोणत्याही बँक खात्याशी व्यवहार करता येतात. एखाद्या ‘व्हीपीए’शी व्यवहार करताना तो पूर्ण पडताळून, योग्य ती खात्री झाल्यावरच व्यवहार करावा. उदा. मागील वर्षी ‘पीएम केअर फंड’साठी ‘व्हीपीए’ निश्चित झाला होता, त्यामध्ये किंचित बदल करून हॅकर्सनी गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न केला, याबाबत आपण सतर्क असायला हवे.
 
 
फसवणूक करणारे ‘एसएमएस’द्वारे आपल्याला अनधिकृत देय दुवे (पेमेंट लिंक्स) पाठवू शकतात. या बनावट बँक ‘युआरएल’ मूळ ‘युआरएल’सारख्याच दिसतील. घाईघाईने आपण त्या दुव्यावर क्लिक केल्यास ते आपल्या फोनवर असलेल्या ‘युपीआय पेमेंट अ‍ॅप’कडे निर्देशित करेल आणि आपणास स्वयं-डेबिटसाठी (ऑटो डेबिट) कोणतेही अ‍ॅप्स निवडण्यास सांगेल. एकदा आपण परवानगी दिली की, ‘युपीआय’ अ‍ॅपवरून त्वरित रक्कम डेबिट होईल.
 
 
‘युपीआय’ अ‍ॅप डाऊनलोड करताना आपण खूप सतर्क असले पाहिजे. आपल्या बँकेसारखेच दिसणारे काही अ‍ॅप असतात, तसेच ‘गुगल पे’ किंवा ‘अ‍ॅपल स्टोअर’वरचे सर्वच अ‍ॅप पडताळलेले असतातच, असे नाही.
 
 
‘ऑनलाईन’ व्यवहार करताना कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये म्हणून सर्वच आर्थिक संस्था वेळोवेळी सर्व ग्राहकांना याबाबत मार्गदर्शन करत असतात, तरीसुद्धा या ‘सायबर’ धोक्याचे प्रमाण म्हणावे तितके कमी झाले नाही. यामध्ये प्रामुख्याने व्यवहार करताना आपण घाईघाईत असतो किंवा त्या अ‍ॅपबद्दलची पूर्ण माहिती नसते. या दोन गोष्टी जर टाळल्या तर हे धोके सुमारे ३५ टक्के कमी होऊ शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
 

- योगेश वाळूंजकर
 
 
Powered By Sangraha 9.0