नेत्यांचे ऐका, अन्यथा वाईट दिवस येतील : कपिल सिब्बल

    दिनांक  10-Jun-2021 17:59:45
|

delhi _1  H x W


पंजाब काँग्रेसचा अंतर्गत कलह, समितीचा अहवाल सोनिया गांधींना सादर

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद सोडविणाऱ्या समितीने आपला अहवाल पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचेच नेतृत्व कायम ठेवण्याविषयी एकमत झाल्याचे समजते. दरम्यान, राजस्थानमध्ये सचिन पायलट हे पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात नवज्योतसिंग सिद्धू यांनी बंडाचा झेंडा फडकविला होता. निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन विरुद्ध सिद्धू या वादाने गंभीर स्वरूप धारण केले होते. त्यामुळे त्यातून तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची अंतर्गत समिती स्थापन केली होती. समितीसमोर कॅप्टन अमरिंदर सिंग, सिद्धू आणि अन्य आमदार-खासदारांनी भूमिका मांडली होती.

सदर समितीने आपला अहवाल पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणूक लढविण्याचे सांगण्यात आले असल्याचे समजते. त्याचवेळी सिद्धू यांना सरकार अथवा पक्ष संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी देण्याचेही सांगण्यात आले आहे.

सिब्बल यांचा पक्ष नेतृत्वास पुन्हा सल्ला


माजी केंद्रीय मंत्री आणि टिम राहुलचे सदस्य जितीन प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशात त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्याविषयी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ गटाचे सदस्य कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वास पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, जितीन यांनी जो काही निर्णय घेतला त्याच्या मी विरोधात नाही. तसा निर्णय घेण्यामागे नक्कीच काही गंभीर कारण असणार, जे अद्याप समजू शकलेले नाही. तरीदेखील त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मला तरी समजलेला नाही. मात्र, यातून काँग्रेस नेतृत्वाने धडा घेण्याची गरज आहे. नेमकी अडचण काय आहे आणि त्याचा तोडगा काय, याची पक्षनेतृत्वास जाणीव असावी असे मला वाटते. त्यामुळे पक्षनेतृत्व प्रत्येकाची भूमिका ऐकेन अशी आशा आहे. कारण नेत्यांचे ऐकून न घेतल्यास वाईट दिवस सुरू होतील, असा इशाराही सिब्बल यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

समर्थक आमदारांसोबत सचिन पायलट यांची महत्वाची बैठक


राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या सरकारवर पुन्हा एकदा बंडाचे ढग येऊ लागले आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पायलट यांनी बंड केले होते, मात्र पक्षनेतृत्वाने पायलट यांना त्यांच्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघाल्याने गुरूवारी पायलट यांनी आपल्या निवासस्थानी आपल्या विश्वासू अशा आठ आमदारांची तातडीची बैठक बोलाविली. त्यामध्ये रामनिवास गवाडिया, विश्वेंद्र सिंह, पी. आर. मीणा, मुकेश कुमार यांचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.