ठाकरे सरकारकडुन खासगी बसमालक वाऱ्यावर...

10 Jun 2021 18:28:06

Buses_1  H x W:
 
 
ठाणे : राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या खासगी बस मालकांची अवस्था लॉकडाऊनमुळे अत्यंत बिकट झाली आहे. अशा स्थितीमध्ये बस मालकांच्या जखमेवर फूंकर घालण्याऐवजी बैठकीला बोलावून बोळवण करण्याचा प्रयत्न परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी केल्याचा आरोप मुंबई बस मालक संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, एकीकडे खासगी बस मालकांकडून कर रुपाने घेतलेले पैसे एसटीच्या उन्नतीसाठी लावून खासगी बसमालकांना सापत्न वागणूक दिली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय ठप्प असल्याने बँकेचे हप्ते,कर्मचार्यांचे पगार, उभ्या असलेल्या बसगाड्यांचे होणाारे नुकसान विम्याचे हप्ते यामुळे सर्व बसमालक कर्जबाजारी झाले आहेत.असेही संघटनेने प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.
 
 
 
कारोनाच्या दुसऱ्या लाटेत सार्वजनिक सेवा पुरवणारा खासगी बस वाहतूक व्यवसाय पुन्हा ठप्प झाला आहे. परिणामी, वाहतूकदारांसह त्यावर अवलंबून असलेल्या विविध घटकांच्या समस्या निवारणाकरिता अनेकवेळा मुंबई बस मालक संघटनेने प्रशासकीय यंत्रणेशी पत्रव्यवहार केला होता.अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतर परिवहन आयुक्तांनी सोमवारी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिली.मात्र,मागण्यावर सकारात्मक प्रतिसाद न देता या भेटीमध्ये त्यांनी बस मालकांची निराशाच केली.
 
 
 
दरम्यान, एकीकडे एसटीच्या केवळ १६ हजार बसगाड्या रस्त्यावर धावत असताना त्यांना २१५० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.याचाच अर्थ एका बसमागे ७ कोटी दिले. तर, सुमारे ९० हजार खासगी बसकडून कोट्यवधीचा महसूल सरकारी तिजोरीत पडत असतानाही या बसमालकांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे.खासगी बस मालकांना ‘सवतीच्या पोरासारखी’वागणूक देण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री आणि परिवहन आयक्तांकडून केला जात आहे.सद्यस्थितीत खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय ठप्प आहे. त्यातच डिझेलची दरवाढ सुरूच असुन विम्याच्या प्रीमियममध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे.त्यामुळे आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने बसमालकावर आत्महत्येची वेळ आल्याचे मुंबई बस मालक संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.
 
 
काय आहेत मागण्या ?
 
 
सन २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी वाहनधारकांना शंभर टक्के करमाफी द्यावी; शालेय बसवाहतूकदारांसह चालक, वाहक आणि सहाय्यकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे; परिवहन कार्यालयाच्या भरारी पथक आणि वाहतूक पोलिसांकडून होणारी लूटमार थांबवावी; वित्तीय संस्था (बँक) यांचेकडील कर्ज हप्त्यांना मुदतवाढ देऊन व्याजमाफी देऊन वाहन विम्याला एक वर्षाची मुदतवाढ द्यावी,आदी मागण्यांचा उल्लेख निवेदनात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0