मनोरंजनाचे मूल्य किती?

    दिनांक  10-Jun-2021 20:52:26
|

OTT Platforms_1 &nbs
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि मनोरंजनक्षेत्राचे महत्त्व दोन अर्थाने स्पष्ट जाणवू लागले. कोरोनामुळे पारंपरिक मनोरंजनक्षेत्रावर सर्वप्रथम परिणाम झालेला दिसून आला. यामध्येच पारंपरिक मनोरंजनक्षेत्रावर अवलंबून असणारा रसिक वर्ग हा सध्याच्या नवमाध्यमे म्हणजे ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मचा उपयोग करू लागला आणि टोळेबंदीच्या काळामध्ये यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरचा विषय आणि आशय याची चर्चा सुरू असताना या माध्यमांकडे रसिकांचा वाढलेला आकडा हा त्यांची मनोरंजनाची भूक आणि पर्याय नसणे हाच होता. पारंपरिक मनोरंजनक्षेत्रामध्ये ‘टेलिव्हिजन’ मालिकांमध्ये त्याच त्याच आशयामुळेही आणि टाळेबंदीच्या काळामध्ये बंद असलेल्या चित्रीकरणामुळेही या माध्यमावरील प्रेक्षक दुसरीकडे गेलेला दिसून आला. 'ग्लोबल वेब इंडेक्स रिपोर्ट’नुसार जगभरामध्ये भारत ‘ओटीटी’मध्ये झपाट्याने वाढणारे क्षेत्र असून, २०२३पर्यंत यामध्ये प्रचंड वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. व्हिडिओ मार्केटमध्ये सध्या ७०० कोटी डॉलर इतके या क्षेत्राचे मूल्य असून, भारतामध्ये २०२३ पर्यंत २.४ कोटी डॉलर वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. टाळेबंदीच्या काळामध्ये पारंपरिक मनोरंजनक्षेत्रावर अवलंबून असणार्‍या प्रेक्षकांनीसुद्धा ‘ओटीटी’चा मार्ग निवडला असला तरी तो सध्या तरी मध्यमवर्गाला परवडेल, असा नसल्याने भारतामध्ये ‘टेलिव्हिजन’क्षेत्राकडेही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग असलेला दिसून येतो आहे. परंतु, कोरोनाकाळामध्ये चित्रपटगृहांना असलेल्या टाळ्यांमुळे चित्रपटांच्या ‘पायरसी’चा प्रकारही वाढताना दिसत आहे. कारण, न परवडणार्‍या प्लॅटफॉर्ममधून मनोरंजनासाठी चित्रपट पाहणे शक्य नसल्यामुळे ‘पायरसी’चे प्रचंड प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. यामुळेच चित्रपट निर्मांत्यांना, प्लॅटफॉर्ममालकांना आणि ओघानेच कलाकारांना बसणारा भुर्दंड प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे मनोरंजनाचे मूल्य किती? हा प्रश्न पडलेला आहे. कारण, मनोरंजनासाठी किंमत अदा करण्याची मानसिकता निर्माण होत नाही, तोपर्यंत मनोरंजनक्षेत्राला मूल्य मिळणार नाही. कारण, भारतासारख्या मोठ्या मनोरंजनाची इंडस्ट्री असणार्‍या देशामध्ये अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नैतिक अधिष्ठानाची वाट न बघता कठोर कायदे निर्माण करून त्या कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
 
 

‘पायरसी’ धोक्याचीच घंटा...

 
 
 
चित्रपटगृहामध्ये चित्रपट पोहोचायच्या आधीच बेकायदेशीररीत्या जतन करून तो लोकांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध केल्या जाण्याच्या घटना सिनेसृष्टीला प्रचंड तोटा निर्माण करणार्‍या आहेत. या अशा प्रकारांमुळे संसदेने २०१९मध्ये ‘सिनेमॅटोग्राफी कायदा १९५२’मध्ये बदल करून, चित्रपटगृहामध्ये चित्रपटाचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांमध्ये पसरविणे, हे कायद्याचे उल्लंघन मानले. परंतु, सध्या ‘ओटीटी’वरून चित्रपट जतन करून ते मोफत इंटरनेटद्वारे पसरविले जात असल्याने त्या कायद्याअंतर्गत हाही गुन्हा मानण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी टोळेबंदीच्या काळामध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ची हाक दिली. ती व्यवसायांना ज्याप्रकारे पूरक होती, तशीच मनोरंजनक्षेत्रालाही पूरक असलेली दिसून येत आहे. कारण, समाजमाध्यमातून मोबाईलद्वारे व्हिडिओ निर्मिती करून ती जागतिक स्तरावरच्या प्लॅटफॉर्मद्वारे प्रदर्शित होत असून, हीसुद्धा ‘आत्मनिर्भर भारत’ व्याख्येच्या साधर्म्य साधणारी बाब आहे. कारण, नुकताच सातारा जिल्ह्यातील वाई भागातील मुलांनी एकत्र येऊन मोबाईलवरून ‘पिक्चर’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करून ‘एमएक्स प्लेअर’वर तो प्रदर्शित केला. यामधून स्थानिक कलाकारांना योग्य ते व्यासपीठ मिळालेच; परंतु त्यामधून व्यवसायाच्या संधीसुद्धा निर्माण झालेल्या दिसून येतात. मात्र, ‘पायरसी’मुळे निर्माता व त्यावर अवलंबून असणार्‍या अनेकांना व्यवसायाला मुकावे लागत आहे. सध्या ‘प्राईम टाईम’च्या स्क्रिन मराठी चित्रपटांना मिळण्यासाठी आपणास भांडणे करावी लागतात, यामध्ये हक्काच्या ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्ममधून मिळणारा प्रेक्षकसुद्धा ‘पायरसी’मुळे तुटत आहे. मनोरंजनक्षेत्रावर जगणारे कोट्यवधी लोक अशा ‘पायरसी’मुळे बेघर होतात. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेमध्येही इथल्या विषय आशयाबाबतची निर्मिती करावयाची असेल व ती जागतिक पातळीवर प्रदर्शित करून त्यातून व्यावसायिक गणिते साध्य करावयाची असतील, तर ‘पायरसी’सारख्या किडीला या क्षेत्रापासून लांब ठेवणे व ती रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. मराठी ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मसाठीची ही धोक्याची घंटा असून निर्मात्यांनी याबाबतची आग्रही मागणी करून मनोरंजनक्षेत्राला या धोक्याच्या घंटेपासून वाचविणे गरजेचे.
 
 
- स्वप्निल करळे
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.