भावंडांपुरताच उरला पक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021   
Total Views |

Rahul Gandhi_1  
 
 
 
एकेकाळी गाजावाजा करून तयार करण्यात आलेली ‘टिम राहुल’ नामक ‘यंग ब्रिगेड’चे अस्तित्व आता राहिलेले नाही. तरीदेखील भावंडांखेरीच अन्य कोणाकडे नेतृत्व देण्याची त्यांची तयारी नाही. एकाच घराण्याभोवती पक्ष दावणीला बांधल्यास पक्षाची कशी वासलात लागते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस पक्ष आहे.
 
 
 
साधारणपणे २००० सालचा काळ. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत होते. त्याच वेळी काँग्रेसमध्ये प्रचंड अंतर्गत उलथापालथ सुरू होती. दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या नेत्यांनी सीताराम केसरी या पक्षाध्यक्षांना हिडीसफिडीस करून घालविण्याचे आणि सोनिया गांधी यांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्याची तयारी चालविली होती. सोनिया गांधी यांनी राजकारणात यावे, यासाठी शरद पवारांसह तत्कालीन मातब्बर नेत्यांनी त्यांच्या विनवण्या वगैरेही केल्या होत्या. त्या विनवण्यांना मान देऊन सोनिया गांधी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. आता कुटुंबातील व्यक्ती हा काँग्रेसचा अध्यक्ष असतोच, या पक्षाच्या परंपरेनुसार सोनिया गांधी यांना रीतसर पक्षाध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.
 
 
 
मात्र, हे तेवढे सोपे नव्हते. कारण, सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा मुद्दा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ऐरणीवर आणला होता. त्या मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९८ सालीच केली होती. मात्र, पक्षात राहूनच सोनिया गांधी यांच्या हाती अध्यक्षपद सोपविण्यास राजेश पायलट आणि जितेंद्र प्रसाद हे दोन मातब्बर नेते तीव्र विरोध करीत होते. त्यांचा मुद्दा अगदी रास्त होता, तो म्हणजे पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ, अनुभवी नेते असताना राजकारणात येऊन केवळ एक वर्ष झालेल्या व्यक्तीस थेट अध्यक्ष करण्याची गरज काय? काँग्रेसमध्ये ज्येष्ठत्वाला किंमत नाही का? आणि काँग्रेस केवळ घराणेशाहीच्याच मार्गाने वाढणार का? असे रास्त प्रश्न हे दोन नेते विचारत होते.
 
 
 
अर्थात काँग्रेस पक्षात असे प्रश्न विचारणार्‍यांना किंमत दिली जात नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीमध्ये राजेश पायलट यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात उभे राहण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी जितेंद्र प्रसाद यांच्यासोबत २१ मे म्हणजेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी प्रचंड मोठी रॅलीही केली. मात्र, त्यानंतर अवघ्या २० दिवसांत म्हणजे ११ जून रोजी एका मोटार अपघातात पायलट यांचा मृत्यू झाला. त्यानंतरही जितेंद्र प्रसाद यांनी आपली भूमिका सोडली नाही आणि ते स्वत: सोनिया गांधी यांच्याविरोधात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी पक्षातील अनेकांनी त्यांना समजाविले. मात्र, आपली भूमिका त्यांनी सोडली नाही. पुढे निवडणुकीत जितेंद्र प्रसाद यांचा दारुण पराभव झाला, तो त्यांना अतिशय जिव्हारी लागला आणि त्यानंतर काही दिवसांतच ब्रेन हॅमरेजने त्यांचा मृत्यू झाला.
 
 
 
तर याच जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र, काँग्रेसच्या ‘टिम राहुल’चे महत्त्वाचे सदस्य असलेल्या जितीन प्रसाद यांनी बुधवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा प्रवेश झाल्याबरोबर लगेचच जितीन प्रसाद काही महत्त्वाचे नेते नाहीत, त्यांना निवडणुकीत यश मिळत नाही, त्यांना जनाधार नाही, असा युक्तिवाद सुरू झाला. आता जर जितीन प्रसाद एवढे सुमार नेते असतील, तर २०१९ साली त्यांनी पक्ष सोडून नये म्हणून काँग्रेस नेतृत्व त्यांच्या विनवण्या का करीत होते, याचे उत्तर काँग्रेस आणि समर्थक देणार नाहीत. मात्र, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीस आता काही महिनेच उरलेले असल्याने जितीन प्रसाद यांच्यासारखा ब्राह्मण चेहरा भाजपच्या गोटात येणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
 
जितीन प्रसाद यांनी हा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. काँग्रेस पक्षातील गांधी कुटुंबाची घराणेशाही, घराण्याशी एकनिष्ठ नेत्यांची चलती, राहुल गांधी यांचे सततचे अपयश, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वास वयानुसार आलेल्या मर्यादा, प्रियांका गांधी-वाड्रा यांचा जेमतेम प्रभाव यातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी २३ नेत्यांचा एक गट ‘जी-२३’ काही काळापासून सक्रिय झाला आहे. त्यामध्ये जितीन प्रसाद यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, काँग्रेसचे एकेकाळचे तीन मातब्बर आणि गांधी घराण्याला आव्हान देण्याची क्षमता असणारे नेते-माधवराव सिंदीया, राजेश पायलट आणि जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र अनुक्रमे ज्योतिरादित्य सिंदीया, सचिन पायलट आणि जितीन प्रसाद यांनीदेखील आपल्या पित्यांचाच म्हणजे एकाधिकारशाहीस आव्हान देण्याचा मार्ग चोखाळला आहे. ज्योतिरादित्य यांनी गतवर्षीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, जितीन नुकतेच भाजपवासी झाले, तर राजस्थानात सचिन पायलटही त्याच मूडमध्ये असल्याचे चित्र आहे.
 
 
काँग्रेस पक्षात राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणास पक्षनेतृत्वाची संधी मिळणार नाही, हे लक्षात आल्यानेच सर्वप्रथम ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडली. त्यापूर्वी ज्योतिरादित्य यांची हरतर्‍हेने कोंडी करण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले होते. जितीन प्रसाद यांच्यासोबतही तसेच करण्यात आले. एकेकाळी जितीन प्रसाद यांना केंद्रीय मंत्रिमंडळात काँग्रेसने संधी दिली होती. मात्र, सत्ता गेल्यानंतर जितीन प्रसाद यांना जाणीवपूर्वक महत्त्वाची भूमिका देण्याचे टाळण्यात आले. काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांना उत्तर प्रदेशची भूमिका दिल्यानंतरच खरे तर जितीन यांची कोंडी करण्यास प्रारंभ झाला होता. त्यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठीच पश्चिम बंगालच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. एकीकडे प्रियांका पक्षाचे संघटन उभे करीत असल्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे, त्याचवेळी जितीन यांच्यासारख्या नेत्यांना पूर्णपणे बाजूला टाकण्यात आले. प्रियांकांचा स्वभाव आणि राजकीय वकूब पाहता त्या एकट्यानेच उत्तर प्रदेशात फार मोठी कामगिरी करण्याची शक्यता धुसर आहे. उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणे अतिशय जटील आहेत आणि अगदी प्रत्येक पक्षाला त्या समीकरणांची काळजी घ्यावीच लागते. असे असताना ब्राह्मण समाजाचा मोठा जनाधार असणार्‍या जितीन प्रसाद यांचे जाणे काँग्रेसला महागात पडू शकते. कारण उत्तर प्रदेशात २३ वर्षे राज्य करणार्‍या काँग्रेसने ब्राह्मण मुख्यमंत्री देणेच पसंत केले होते. उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाजाची टक्केवारी १० ते ११ टक्के आहे. त्यामुळे भाजपनेही २०१७ निवडून आलेल्या ५८ ब्राह्मण आमदारांपैकी नऊ जणांना मंत्रिपद दिले आहे. बसपाच्या मायावती यांनीदेखील एकेकाळी ब्राह्मण समाजाला आपल्याकडे खेचूनच सत्ता प्राप्त केली होती. असे असताना ‘ब्राह्मण चेतना परिषद’च्या माध्यमातून ब्राह्मण समाजाला एकत्र करणार्‍या जितीन प्रसाद यांना गमाविणे काँग्रेसला महागात पडणार आहे, तर भाजपला त्याचा लाभ होणार आहे.
 
 
यातून एक गोष्ट पुन्हा स्पष्ट होते, ती म्हणजे एकेकाळी गाजावाजा करून तयार करण्यात आलेली ‘टिम राहुल’ नामक ‘यंग ब्रिगेड’चे अस्तित्व आता राहिलेले नाही. ज्योतिरादित्य आणि जितीन हे भाजपवासी झाले आहेत. सचिन पायलटदेखील नाराज आहेत, मिलिंद देवराही आता काँग्रेसमध्ये नावालाच उरले आहेत. तर दुसरीकडे ‘जी-२३’द्वारे ज्येष्ठ नेते सक्रिय आहेत. आता कोंडीमध्ये काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंब पुरते अडकले आहे. तरीदेखील भावंडांखेरीच अन्य कोणाकडे नेतृत्व देण्याची त्यांची तयारी नाही. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास प्रियांकांचे ते मोठे अपयश असणार आहे. त्यानंतर त्यांच्याहाती पक्षाची सूत्रे देण्याचे टाळण्यात येईल. राहुल गांधी तर सततच अपयशी होत आहेत. त्यामुळे एकाच घराण्याभोवती पक्ष दावणीला बांधल्यास कशी वासलात लागते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस पक्ष आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@