भय तिथले संपत नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2021   
Total Views |

pakistan _1  Hइमरान खान सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानातील पत्रकारांना दिल्या जाणार्‍या धमक्या, हल्ले यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाकची वृत्तपत्रेच आकडेवारीसकट अधोरेखित करतात. परंतु, आधी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानात पत्रकारांना सरकार, राजकीय पक्ष यांच्याबरोबर पाकिस्तानी लष्कराविरोधात अवाक्षरही काढून चालत नाही.पाकिस्तानमध्ये पत्रकारांवरील जीवघेणे हल्ले आणि प्रसंगी त्यांची निर्घृण हत्या, ही तशी जुनीच परंपरा. कारण, या देशात माध्यमांच्या अभिव्यक्तीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मर्यादा आहेतच. त्यात पाकिस्तानात एक नव्हे तर दोन सत्ताकेंद्र. एक नामधारी सरकार आणि दुसरे लष्करी गणवेशातील ‘सरकारराज.’ त्यामुळे आधीच सर्वत्र अनागोंदी माजलेल्या या देशात पत्रकारांना सरकारच्या आणि लष्कराच्या खप्पामर्जीला सामोरे जावेच लागते. जे पत्रकार आपले तोंड दाबून ही तारेवरची कसरत करतात, त्यांचे फावते आणि जे आपली मर्यादा ओलांडतात, त्यांना माध्यमजगतापासूनच नव्हे, तर या जगातूनच अल्लाघरी धाडले जाते. त्यातच इमरान खान सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानातील पत्रकारांना दिल्या जाणार्‍या धमक्या, हल्ले यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाकची वृत्तपत्रेच आकडेवारीसकट अधोरेखित करतात. परंतु, आधी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानात पत्रकारांना सरकार, राजकीय पक्ष यांच्याबरोबर पाकिस्तानी लष्कराविरोधात अवाक्षरही काढून चालत नाही.


पण, पाकिस्तानातील मागील काही काळातील परिस्थिती पाहता, लष्करी अधिकार्‍यांची कित्येक भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आली. साहजिकच माध्यमांनी त्यांचे काम करून ही प्रकरणे जनतेपर्यंत पोहोचविली. पण, यामुळे पाकिस्तानी जनतेच्या मनात लष्कराविषयी रोष-द्वेष निर्माण होऊन लष्कराची प्रतिमा अधिक डागाळू शकते, म्हणून माध्यमांच्या मुस्कटदाबीसाठी लष्कर सतत सक्रिय असते. असाच एक प्रकार प्रसिद्ध पाकिस्तानी व्हिडिओ ब्लॉगर आणि माजी टीव्ही निर्माता असलेल्या असद अली तूर यांच्याबाबतीत घडला. त्यांचा दोष तो काय, तर त्यांनी गेल्या काही काळात लष्करातील गैरव्यवहारांची पोलखोल केली होती. इतकेच नाही तर न्यायमूर्ती फैझ इसा यांचे सरकार, लष्कराशी असलेले ‘अर्थ’पूर्ण संबंधही तूर यांनी चव्हाट्यावर आणल्याने एकच खळबळ उडाली. परिणामस्वरूप, तीन अज्ञातांनी त्यांना घरात घुसून जबर मारहाण केली.

सुदैवाने त्यांना प्राण गमवावे लागले नाहीत, एवढेच. पण, या प्रकारानंतर पाकिस्तानातील सर्व पत्रकार एकवटले व त्यांनी सरकार आणि लष्कराविरोधात रस्त्यावर उतरत निषेधही नोंदवला.पाकिस्तानातील आणखीन एक सुप्रसिद्ध पत्रकार हामिद मीर, जे स्वत: या दबावतंत्रातून वारंवार तावूनसुलाखून बाहेर पडले आहेत, त्यांनीही आपल्या ‘जिओ टीव्ही’च्या ‘टॉक शो’मधून या घटनेचा निषेध नोंदवला. मग काय, लगोलग दुसर्‍या दिवशी ‘जिओ टीव्ही’च्या व्यवस्थापनाने मीर यांना त्यांचा ‘टॉक शो’ बंद केल्याचे सांगितले. कारण, पाकी लष्कराकडून तसा दबावच ‘जिओ टीव्ही’वर निर्माण करण्यात आला आणि लष्कराच्या आज्ञांचे पालन करण्याशिवाय व्यवस्थापनाकडेही पर्याय नसल्याने त्यांनी मीर यांचा आवाज दाबून टाकला.


पण, वरकरणी हा प्रकार दिसतो तितकाच मर्यादित नाही. काही दिवसांपूर्वीच पाक लष्करप्रमुख बाजवा यांनी काही निवडक माध्यम प्रतिनिधींना अनौपचारिक गप्पांसाठी आमंत्रण दिले होते. विषय होता भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानी माध्यमांनी लष्कराला साथ द्यावी आणि त्या अनुषंगाने जनमतनिर्मिती करावी. खरंतर भारत-पाकिस्तान चर्चा या उघड उघड सुरू नसल्या तरी बंद दाराआड या चर्चांना गेल्या काही काळात वेग आला आहे. बाजवांच्या नेतृत्वात या चर्चा विविध पातळीवरही पारही पडल्या, ज्यांना दोन्ही देशांनी दुजोरा दिलेला नाही. एकूणच या चर्चांमधील सूर लक्षात घेता, काश्मीरच्या विषयावरून पाकला माघार घ्यावी लागणार हे स्पष्ट आहेच. तेव्हा, ही बाब पाकी जनमानसाच्या गळी उतरविणे हे कर्मकठीण, याची बाजवा यांना पुरेपूर कल्पना आहे.

कारण, पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते आजतागायत काश्मीर मुद्द्यावरूनच पाकचे राजकारण आणि अर्थकारण केंद्रित होते. पण, पाकिस्तानची सर्वार्थाने ढासळणारी स्थिती पाहता, बाजवा यांनी त्यांच्या निवृत्तीपूर्वी भारत-पाक संबंध सुधारण्याचा निश्चय केलेला दिसतो. पण, लष्कराअंतर्गत आणि इमरान खान सरकारही यासाठी फारसे अनुकूल नाहीच. तेव्हा, माध्यमांनी याकामी लष्कराच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची सूचना बाजवांनी केली, जी खरंतर तेथील माध्यमांनाही तितकीशी पचनी पडलेली दिसत नाहीच. तेव्हा, कुठे तरी लष्कराच्या भूमिकेविरोधात जाणार्‍या माध्यमांचा बंदोबस्तच बाजवा करतील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्यःस्थिती पाहता, माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत जगभरात १४५व्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानात आगामी काळात पत्रकारांवरील हल्ल्यांचे हे संकट अधिक गहिरे होण्याचीच शक्यता नाकारता येत नाही.

@@AUTHORINFO_V1@@