सत्याला कोसो दूर ठेवणार्या या व्यक्ती आपल्या अहंकारालाच आपल्या जीवननाट्याचे निर्देशन करायला लावतात. आपल्या आयुष्यात उत्कर्ष होण्यासाठी आवश्यक सामग्री मिळते, पण विधायक मतं मात्र परिस्थितीजन्य सत्य आणि मानवी मूल्यांच्या आधारावर असावी लागतातमतं खूप महत्त्वाची आहेत. त्यात वैयक्तिक विकास, देशाची प्रगती आणि जगाचा.
जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती आपले मत व्यक्त करते, तेव्हा फार थोड्या सोडल्या तर इतर व्यक्ती गृहित धरतात की, आपली जी मतं आहेत वा जो दृष्टिकोन आहे, तेच जणू अंतिम सत्य आहे. आपल्या मताला सत्य मानणारे आज अनेक जण पाहतो. आपले मत गुलाबी रंगाच्या चश्म्यातून पाहायला आपल्याला आवडते. त्यात स्वतःला आनंदी ठेवण्याचा शहाणपणा आहे. आढ्यतेखोरपणे आपले मत हे अंतिम किंवा मूलभूत सत्य आहे, असे समजणार्या व्यक्तींना हे ठाऊक नाही की त्यांच्या या आडाख्याला शास्त्रीय आधार नाही. एखादी गोष्ट खरंच सत्य असेल, तर ती वास्तवावर आधारित असेल आणि म्हणून ती पुराव्यानिशी आपल्याला खरी का मिथ्या आहे, हे सिद्ध करता येईल. मत किंवा एखाद्याची धारणा ही त्यांची वैयक्तिक अभिव्यक्ती असते. ती त्या व्यक्तीच्या खासगी अनुभवांचे, भावनांचे किंवा विचारांचे वा मूल्यांचे संमेलन असते. त्यामध्ये वस्तुनिष्ठ पुरावा नसतो. त्यांच्या धारणा या बर्याच अंशी त्यांच्या मानसिक व सामाजिक संस्कारांशी निगडित असतात, म्हणून या त्यांच्या सवयींचा भाग असतात. सगळ्यात बारकाईने सांगायचे म्हटले, तर या सगळ्या धारणा, मते वा दृष्टिकोन हा त्या व्यक्तीच्या वा तिच्या कळपाच्या सोईचा भाग असतो. म्हणूनच तर निर्णायक प्रसंगी आपण एखाद्याला वस्तुनिष्ठ सल्ला द्यायची विनंती करतो. यामुळेच व्यक्तीच्या विविध पार्श्वभूमींवर अवलंबून असलेली विचारधारा अर्थपूर्ण वास्तवाशी जुळेल वा ती व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त असेल, याची खात्री देता येत नाही. आपण नेहमीच सर्वसामान्य माणसांकडून ऐकत असतो की, महाशय ‘अ’ हे महाशय ‘ब’ पेक्षा अमुक हुद्द्यावर योग्य कसे आहेत किंवा आपल्याला आवडत असलेला चिकू फळांचा राजा असलेल्या आंब्यापेक्षा कसा चांगला आहे. अर्थात, या मतांची किंमत तुम्ही त्या खास तुलनेपर्यंत कसे पोहोचला किंवा ते खरोखर सिद्ध करायला तुमच्याकडे काही सबळ पुरावा आहे का, यावर अवलंबून आहे. एकूण काय प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार जरी असला, तरी सगळीच मतं मौलिक किंवा प्रामाणिक असतील, असे नाही. आपण अगदी छोटेखानी परिसर असेल किंवा देशाचे राजकारण असेल, मग ती व्यक्ती आपली शेजारीण असेल किंवा नेता वा अभिनेता असेल, जो तो आपले मत ठासून मांडत असतो. आजकाल गंमतीदार गोष्ट आपण पाहतो ती म्हणजे, अनेक अभिनेते राजकीय नेते बनण्याच्या नादात जुळवाजुळव केलेली मतप्रणाली व्यक्त करत असतात. ‘प्रॉब्लेम’ काय आहे की, येथे त्यांचा अभिनय ‘सपशेल’ आपटतो आणि आपल्याला विरंगुळा मिळतो. काहीही म्हणा (सत्य काय आहे हे देव जाणे) पण ठासूनठोसून मत मांडताना कित्येक जण एक किक अनुभवतात. काहीजण तर अशा संधीची वाटच पाहत असतात. काही जणांना स्वत:चे मत मांडत बसण्याचा जन्मजात स्वभाव आहे की काय, असे वाटते.
आपल्याला निश्चिंत आणि खात्रीदायक परिस्थितीत राहायला आवडते. ती पृथ्वीतलावरील माणसांची एक मूलभूत अशी गरज आहे. थोडक्यात, आपण सुरक्षित असावं ही भावना मत मांडण्याच्या या प्रवृत्तीत ही सुरक्षितता अंतर्भूत आहे. दुसर्या प्रभावशाली बलाढ्य माणसांची मतं नुसती ऐकूनही अनेक उत्साही व्यक्ती सत्वर आपली मतनिर्मिती करतात. ही अशी गत अंमळ वरकरणी असतात आणि त्यात संधीसाधूपणा अपेक्षित आहे. म्हणजे ‘हो’ला ‘हो’ करत ‘प्रमोशन’ मिळवणार्या व्यक्ती अगदी उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या आपण पाहतो. खरंतर ही एक क्षुद्र प्रकारची हातोटी आहे आणि बरेच लोक यात वाक्बगार आहेत. ऐनवेळी आपली राजकीय पार्टी या व्यक्ती तळ्यातमळ्यात खेळल्यासारख्या खेळत असतात कदाचित यालाच मतांचे ‘राजकारण’ म्हणत असावेत.
कुणी जेव्हा माझं मत असं आहे, हे वाक्य ठासून बोलत असतं तेव्हा थोडंसं त्यामागे असलेले मानसशास्त्र समजून घ्यायला पाहिजे. या व्यक्तीची एखाद्या गोष्टीबद्दल असलेली खात्री किंवा त्या खात्रीमागची ‘पॉवर’ कुठेतरी डळमळीत झालेली असते, समोरच्या व्यक्तींना आपलं मत पटत नाही याची आंतरिक जाणीव झालेली असते. काही प्रमाणात स्वत:च्या मूल्यांबद्दल वा वैचारिक अभिव्यक्तीबद्दल या मंडळींच्या मनात संदेह निर्माण झालेला असतो. तेव्हा स्वत:ला ‘सिक्युअर’ करण्यासाठी या मंडळींना ‘इन माय ओपिनिअन’ या घोषवाक्याची गरज भासते. यातील महत्त्वाचं विश्लेषण असं आहे की, ही मंडळी आपल्या अपेक्षांनी आणि कल्पनांनी बनवलेलं आपलं परिपूर्ण जग विद्ध होऊ नये, याची काळजी घेत असतात. विशेषत: याचा उपयोग धार्मिक संदर्भात दिसून येतो. बर्याचदा असंही होतं की, आपण दुसर्याची मतं कशी निराधार आहेत, हे पटवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण ती प्रक्रिया आपण स्वत:च्या बाबतीत कधीच करत नाही. कारण, आपण पूर्वग्रहदूषित पार्श्वभूमीवर आपली वैचारिक मतं निर्माण करतो वा दुसर्याची खोडून काढतो. यामध्ये पुष्कळ लोक वस्तुस्थितीसंबंधित पुरावा सरळ सरळ नाकारतात. म्हणून बर्याच वेळा आपण प्रखर मतांमध्ये ‘लॉजिक’ कमी पाहतो. काही लोक स्वमतवादी असतात. या व्यक्तींना जगातील सगळी सत्यं फक्त आपल्याला ठाऊक आहे, असे वाटते. जिथे जिथे लोकांची मते त्यांच्या विरोधात जातात तेव्हा त्या व्यक्तींना ते चुकीचे कसे आहेत, याचा पाढा वाचून दाखवतात. आपली मते प्रत्येकाने प्रमाण मानायला हवीतच, हा त्यांचा ध्यास किंवा आस ही ठार वेड्या माणसाच्या भ्रमासारखीच असते. दुसरा कोणी ज्ञानी किंवा समर्थ असेल, असे त्यांना वाटत नाही. दुर्दैवाने (त्यांच्या आणि इतरांच्या) या व्यक्ती आपली बुद्धी आणि मन या दोघांची कवाडे कायम बंद ठेवतात. सत्य त्यांना पेलत नाही. सत्याला कोसो दूर ठेवणार्या या व्यक्ती आपल्या अहंकारालाच आपल्या जीवननाट्याचे निर्देशन करायला लावतात. आपल्या आयुष्यात मतं खूप महत्त्वाची आहेत. त्यात वैयक्तिक विकास, देशाची प्रगती आणि जगाचा उत्कर्ष होण्यासाठी आवश्यक सामग्री मिळते, पण विधायक मतं मात्र परिस्थितीजन्य सत्य आणि मानवी मूल्यांच्या आधारावर असावी लागतात.
"If you wish to see the truth, then hold no opinion for or against." - Rajneesh
- डॉ. शुभांगी पारकर