आसामचे नवे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

09 May 2021 17:33:00

assam_1  H x W:



नवी दिल्ली :
आसाममध्ये भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या हिमंता बिस्व सरमा यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता ते सोमवारी १० मे  रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना केंद्रीय राजकारणात सक्रीय केले जाण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित आघाडीने बहुमत प्राप्त केले. भाजपला ६०, आसाम गण परिषदेस ९ तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलला ६ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे विधानसभेच्या एकुण १२६ जागांपैकी भाजप्रणित आघाडीस भक्कम असे ७५ जागांचे बहुमत मिळाले. त्यानंतर शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांनी सर्बानंद सोनोवाल आणि हिमंता बिस्व सरमा यांच्यासोबत स्वतंत्रपणे चर्चा केली होती.

भाजपच्या संसदीय बोर्डातर्फे केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राष्ट्रय सरचिटणीस अरुण सिंह यांची विधानसभा गटनेतेपदाच्या निवडीसाठी निरिक्षक म्हणून नेमणूक केली होती. गुवाहाटी येथे रविवारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी हिमंता बिस्व सरमा यांची नेतेपदी निवड केली. त्यामुळे आता हिमंता बिस्व सरमा हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.


असा आहे सरमांचा राजकीय प्रवास


हिमंता बिस्व सरमा यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६९ रोजी गुवाहाटी येथे झाला. त्यांनी कामरूप अकादमी आणि कॉटन कॉलेज येथे शिक्षण घेतले आहे. राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेले सरमा विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून पीएच.डीही केली आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयात त्यांनी पाच वर्षे वकीली केली. त्यानंतर काँग्रेसमधून त्यांनी सक्रीय राजकारणास प्रारंभ केला आणि २००१ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आणि आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या वाद झाल्याने जुलै २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.


भाजपसाठी ठरले महत्वाचा चेहरा


काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतप सरमा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईशान्य भारतात आसाममध्ये भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. यंदा ते सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आसामसह संपूर्ण ईशान्य भारतातील राजकीय प्रवाहांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळेच आसाममध्ये एनआरसी आणि सीएए या मुद्द्यांना नेमकेपणाने हाताळणे केंद्र सरकारला सोपे झाले. त्याचप्रमाणे सोनोवाल मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री म्हणूनही त्यांनी चमकदार कामगिरी केली. जनमानसाची नस ओळखण्यात वाकबगार असलेल्या सरमा यांनी २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनिती आखण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे भाजपला तब्बल ६० जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन करणे शक्य झाले आहे.

Powered By Sangraha 9.0