नांदेडमध्ये शिवसेनेची ताकद भाजप वाटेवर

07 May 2021 17:27:40


NANDED_1  H x W


पंढपुरनंतर नांदेडमध्ये भाजप करिष्मा करणार  ?

मुंबई : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसून येत आहे. नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नांदेडमधील देगलूरच्या पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपाचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशारा साबणेंनी दिला आहे.

 

नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय अंतापूरकर यांच्या मुलाला पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे.दुसरीकडे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे. देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी साबणे यांनी केली आहे.

 

सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. १९९९ ते २००९ या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर २००४ मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१९) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.
 

आता साबणे यांनी उमेदवारीसाठी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा इशारा दिल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.

Powered By Sangraha 9.0