रक्ताळलेल्या हातांनी ममतांच्या तिसऱ्या कार्यकाळास प्रारंभ; जगतप्रकाश नड्डांचा घणाघात

    दिनांक  05-May-2021 18:34:15
|
JPNPC_1  H x W:


बंगाली जनतेसाठी भाजप निर्णायक लढा देणार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी :
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी रक्ताळलेल्या हातांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळास प्रारंभ केला आहे. गेल्या ३६ तासांमध्ये भाजपच्या १४ कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. मात्र, भाजप तृणमूल काँग्रेसच्या राज्यपुरस्कृत हिंसाचाराविरोधात निर्णायक लढा देईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाशन नड्डा यांनी बुधवारी कोलकाता येथे केले.
 
 
 
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने हिंसाचारास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांची हत्या, बलात्कार, लूटमार असे प्रकार घडले आहेत. भाजपने त्याची गंभीर दखल घेतली असून भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी दोन दिवस प. बंगालचा दौरा केला. यावेळी त्यांनी तृणमूलच्या हिंसाचारात बळी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका मांडली.
 
 
 
 
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून हिंसेचे थैमान सुरु झाले आहे. गेल्या ३५ तासांमध्ये भाजपच्या १४ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी त्याविरोधात अद्यापही शांत बसल्या आहेत, त्यावरून ममता बॅनर्जी यांचाही या हिंसाचारामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात ही रक्ताळलेल्या हातांनी झाली आहे, असा घणाघात नड्डा यांनी केला.
 
 
तृणमूल काँग्रेसतर्फे भाजप कार्यकर्ते व त्यांचे कुटुंब लक्ष्य करण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, तृणमूल काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य केले आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे बंगालमध्ये महिला सर्वाधिक असुरक्षित असल्याचा भाजपच्या प्रचारातील मुद्दा खरा ठरला आहे. त्यामुळे जनादेशामुळे सत्य लपून राहू शकत नाही, बंगालमध्ये ममतांनी जनादेश जिंकला असला तरी मानवता येथे पराभूत झाली आहे. मात्र, असहिष्णुतेच्या या विचाराविरोधात भाजप निर्णायक लढा देणार असून त्यास नेस्तनाबूत केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही, असेही नड्डा म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
 
प. बंगालमध्ये 'खेला होबे' ही घोषणा तृणमूल काँग्रेसने दिली होती, त्याचा खरा अर्थ रक्तपात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात असा हिंसाचार मुस्लिम लीगच्या प्रत्यक्ष कृती दिवसाच्या घोषणेनंतर आणि देशाच्या फाळणीच्या वेळीच बघावयास मिळाला होता. तृणमूलच्या हिंसेपासून जीव वाचविण्यासाठी गावेच्या गावे ओस पडली असून ग्रामस्थांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे, त्यामुळे बंगालच्या समद्ध संस्कृतीच्या विरोधात ममतांचे राजकारणा असल्याचेही नड्डा यांनी नमूद केले.
 
 
 
मानवाधिकाराचे चॅम्पियन्स आता गेले कुठे ?
 
 
 
प. बंगालमध्ये राज्यपुरस्कृत हिंसाचार होत असताना देशातील अनेक राजकीय पक्ष शांत बसले आहेत. त्याचप्रमाणे देशातील मानवाधिकारांचे चॅम्पियन्सही या हिंसाचाराविरोधात चकार शब्द बोलायला तयार नाहीत. त्यावरून त्यांचा मानवाधिकाराचा लढा हा ‘सिलेक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट झाले आहे, असाही टोला नड्डा यांनी लगाविला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.