आयपीएल रद्द झाल्यास २००० कोटींचे नुकसान?

    दिनांक  04-May-2021 18:02:06
|

IPL Eco_1  H x
 
मुंबई : भारताचीच नव्हे तर जगातील लीग्सपैकी इंडियन प्रीमियर लीग ही मोठी मानली जाते. मात्र, याच्या २०२१च्या पर्वावर कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आता ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यामुळे खेळाडू, आयपीएलमधील संघ व्यवस्थापन आणि क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झालाच आहे. याशिवाय बीसीसीआय आणि आयपीएलला अंदाजे २ हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, स्पर्धेत खेळाडू किंवा सदस्यांना कोरोनही लागण होण्याची ही जगातील पहिलीच लीग नाही. याआधी पाकिस्तानची पीएसएल तसेच एक मोठी फुटबॉल लीगदेखील रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. एप्रिल ९ला चालू झालेली ही स्पर्धा ३० मेपर्यंत चालणार होती, मात्र खेळाडू तसेच सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
 
 
'स्टार इंडिया'सह बीसीसीआयला २००० कोटींचे मोठे नुकसान
 
 
बीसीसीआयने आयपीएल आयोजनाची घोषणा केल्यानंतर भारतीय संघाचे अनेक दौरे रद्द करण्यात आले होते. यानंतर जूनमध्ये जागतिक कसोटी विश्वचषकचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर आयसीसी टी - २० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आता आयपीएलचे उर्वरित समाने कधी आयोजित होणार ? हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर उभा असणार आहे.
 
 
याशिवाय असे सांगण्यात येत आहे की, आयपीएल स्थगित झाल्यामुळे 'स्टार इंडिया'ला फक्त जाहिरातीच्या महसुलात ६० टक्के तोटा सहन करावा लागणार आहे. साधारण स्टार वाहिन्या आणि डिजिटल (हॉटस्टार) मिळून स्टार इंडियाचा अंदाजे जाहिरात महसूल हा ३ हजार कोटींच्या आसपास असतो. परंतु, आता आयपीएल स्थगित केल्यामुळे स्टारला अंदाजे ५० ते ६० टक्के तोटा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजे अंदाजे १७०० कोटींचे नुकसान होणार आहे. याशिवाय एकूण ६० सामन्यांपैकी १६ सामने झाल्यानंतर उर्वरित सामन्यांच्या रद्द होण्याने आयपीएलच्या इतर प्रसारकांनादेखील मोठा फटका बसणार आहे. तसेच, फ्रँचायझी आणि आॅन ग्राउंड प्रायोजकांतर्फे अंदाजे १ हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
खेळाडूंसह सामान्य कामगारांनाही फटका
 
 
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे फक्त खेळाडू किंवा संघमालकच नाही तर, प्रत्येक संघासोबत असलेल्या बॉयची टीम, ग्राउंड स्टाफ आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे जवळजवळ हजारो रोजंदारीवर काम करणारे कामगार यांचेदेखील नुकसान होणार आहे. त्यामुळे आता जगातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणारे क्रिकेट बोर्ड बीसीसीआय या संकटावर कसे मात करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.