उलवे नोडमध्ये ‘कोविड केअर सेंटर’मध्ये महत्त्वाची सोय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2021
Total Views |

Fadanvis _1  H
 
 
पनवेल : “उलवे नोडमधील नागरिकांसाठी कोपर येथील ‘कोविड केअर सेंटर’च्या माध्यमातून महत्त्वाची सोय झाली असून कोरोनाविरुद्धची लढाई आपण सर्वांनी अशाच प्रकारे मिळून लढूया,” असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, दि. २ मे रोजी केले.
 
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयामध्ये ६० बेड्सच्या ‘कोविड केअर सेंटर’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 
या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आ. आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी, ‘बीव्हीजी समूहा’चे हणमंतराव गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्रीनंद पटवर्धन, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सभापती देवकी कातकरी, उद्योजक जे. एम. म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जि. प. सदस्य रवींद्र पाटील, पं. स. सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, साई देवस्थानचे विश्वस्त रवी पाटील, निर्गुण कवळे आदी उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
 
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “रोज उठून केंद्र सरकारकडे बोटे दाखविणे, माहिती नसताना राजकीय विधाने करणे. यातून या देशाची लढाई आपण लढू शकत नाही. माझी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे की, तुमची लढाई ’कोविड’शी असली पाहिजे. भाजप व पंतप्रधान मोदींशी नाही. मोदीजी तर तुम्हाला सोबत घेऊन ‘कोविड’शी लढाई लढत आहेत. मात्र, तुम्हाला यामध्ये राजकारण करायचे असून ते कृपया बंद करा.
 
ज्या प्रकारे केंद्र सरकार मदत करते आहे. त्यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा या संकटामध्ये उभा राहतो आहे. अर्थातच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने मिळून हे काम केले, जे आज आपल्याला केंद्राकडून पूर्णपणे दिसते, तर आपण अतिशय वेगाने या संकटातून बाहेर येऊ, असा विश्वास वाटतोय. अशा प्रयत्नांमध्ये भाजपच्या आमदारांकडून प्रयत्न केले जात आहेत. याचा एक भाग म्हणून हे सुसज्ज ‘कोविड सेंटर’ उभारण्यात आले असून त्याचा येथील रुग्ण नागरिकांना फायदा होणार आहे. रेल्वेच्या मागण्यांबाबत नक्कीच पाठपुरावा करण्यात येईल.”
 
नवी मुंबईच्या विमानतळाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचा सन्मान होणे अतिशय आवश्यक आहे. मला राज्य सरकारला एकच सांगावेसे वाटते की, सन्माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे निश्चितपणे एक उत्तुंग प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे. मग त्यांचे नाव देत असताना ते लपूनछपून देण्याचे कारण नाही.
 
त्यांचे नाव अनेक ठिकाणी देता येईल, पण याबाबत लोकांशी चर्चा केली पाहिजे. नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. बाळासाहेबांच्या नावावर विवाद होता नये, तसेच अशा प्रकारे कुणाला माहीत नसताना अचानक ‘कोविड’च्या काळात निर्णय करणे त्यांच्या नावाला, व्यक्तिमत्त्वाला साजेसे नाही. मुख्यमंत्री याची दखल घेतील. सर्वांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. सध्या ‘कोविड’ची लढाई आहे ती लढूया.”
 
“’सिडको’ जे करायचे ते करीत नाही आणि नको ते धंदे करीत आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांनी येथील भूमिपुत्रांसाठी लढा दिल्याने १२.५ टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाले. म्हणूनच ’दिबां’चे नाव येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे आवश्यक असताना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जात आहे. बाळासाहेब हिमालयाएवढे आहेत. त्यांचे नाव इतर ठिकाणीही देता येऊ शकते. त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही. परंतु, ज्या माणसामुळे महाराष्ट्रात १२.५ टक्के भूखंडाचे तत्त्व लागू झाले त्यांचेच नाव येथील विमानतळाला देण्यात यावे,” अशी मागणी यावेळी आ. महेश बालदी यांच्याकडून करण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@