रोगप्रतिकारकशक्ती आणि विवेकबुद्धी

    दिनांक  04-May-2021 19:10:57
|

Immunity_1  H x
 
 
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या या सकारात्मक क्रियेत आपल्याला आपल्या मनाच्या नाड्या या बुद्धीच्या हातात द्यायच्या असतात. मन हे चंचल असते, भरकटते व बुद्धी ही स्थिर असते. परंतु, बुद्धी स्थिर केव्हा असते, तर जेव्हा बुद्धीसोबत विवेक असतो. म्हणूनच जणू अर्जुनरुपी आपल्या मनाने कृष्णरुपी विवेकबुद्धीच्या हातात आपले सर्व विकार व विषय सोपवले होते, हे श्रीमद्भगवतगीतेत सांगितलेच आहे. म्हणूनच जर मनाला सामर्थ्यवान बनवून रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल, तर सर्व प्रथम सदसद्विवेक बुद्धी कार्यरत असणे अत्यंत गरजेचे आहे. यालाच म्हणतात ‘डिस्क्रिमिनेशन पॉवर.’
 
 
‘विवेकबुद्धी’ म्हणजे काय? तर जे सत्य आहे व जे असत्य आहे, हे ठरवू शकणारी मनाची क्षमता म्हणजेच ‘द रिझनिंग पॉवर.’ डॉ. हॅनेमान यांनी आपल्या या क्षमतेला ‘रिझन गिफ्टेड माईंड’ असे संबोधले आहे. विवेकबुद्धी कशी तयार होते? तर जी गोष्ट तर्कशास्त्राला धरून असते, जी गोष्ट नुसती कल्पनाशक्तीमुळे माहिती असते, यांच्यातील फरक लॉजिक वापरून ठरवणे. डॉ. हॅनेमान यांनी याला ‘इंडिक्टिव्ह लॉजिक’ आणि ‘डिडक्टिव्ह लॉजिक’ असे संबोधले आहे. ज्यावेळी तर्कशास्त्राचा वापर करून आपण एखादा निर्णय घेतो, तेव्हा तो सत्य जाणूनच घेतलेला असतो. माणसाने आपल्या अंगी ही ‘डिस्क्रिमिनेशन पॉवर’ म्हणजेच सदसद्विवेकबुद्धी बाणवावी. कारण, त्याचाच मुळे माणसाचे मन हे खंबीर व सकारात्मक होत असते.
 
 
ही विवेकीबुद्धी म्हणजे नक्की काय करते, तर समाजातील तसेच आजूबाजूच्या वातावरणातील ज्या गोष्टी निसर्गाच्या विरुद्ध आहेत व असत्य आहेत, त्याचा पडताळा घेऊन सत्याची कास धरते आणि सत्य हा निसर्गाचा नियम असल्याने पर्यायाने आपण सत्याची पाठराखण करतो व मन त्यामुळे मजबूज होते व प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिक्रिया कशी होते तर काही वस्तू वा घटनांचा अंदाज घेऊन व अवलोकन करून त्यानुसार सर्वसाधारण अंदाज व तर्क बांधणे म्हणजे उदगमन क्रिया म्हणजेच ‘इंडक्टिव्ह लॉजिक’ होय. पण, नुसत्या उदगमन क्रियेने नियम सिद्ध होत नाही व तो तर्काला अनुसरून होत नाही म्हणून मग त्याला निगामी निष्कर्षाची जोड असणे गरजेचे असते. त्यालाच ’डिडक्टिव्ह लॉजिक’ असे म्हणतात.
 
 
थोडक्यात काय, तर माणसाचे विचार हे सत्याच्या शोधासाठी असावेत व तर्कशुद्धतेवर पडताळून पाहावेत. सदसद्विवेक बुद्धी मूळ माणसाची निर्णयक्षमता अतिशय मजबूत होते व पर्यायाने आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढणे हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. म्हणून मग शरीरातील सर्व पेशींमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि या सकारात्मकतेमुळे रोगप्रकारशक्ती वाढीस लागते.
स्वामी विवेकानंदाचे विचार व लेखन हे नेहमी तर्कशुद्ध व सदसद्विवेक बुद्धीला अनुसरून होते, त्यांच्या साहित्याचा अभ्यास यासाठी फार उपयुक्त ठरेल. विवेकबुद्धीला जर शिस्तीची जोड मिळाली, तर मग कमालच होते, ते कसे ते पुढील भागात आपण पाहू.
 
 
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.