कल्पनेच्या हिंदोळ्यावर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2021
Total Views |

Imagination_1  
 
कल्पना करणं हे मानवी विचारांचा सर्जनशील पैलू आहे. जे कधी आपल्या आयुष्यात घडलंच नाही वा शक्यतेच्या बाजूने कधी घडणार नाही, अशा गोष्टींची कल्पना करणं ही सामान्य बुद्धीला जमणारी गोष्ट नाही, म्हणून तर अशा प्रकारे हाताळलेले अनैसर्गिक चित्रपट लोकांना खूप आवडतात.
 
 
 
बर्‍याच वेळा आपली विचार करायची पद्धत किंवा आपण ज्या पद्धतीने आपल्या अवतिभोवतीच्या गोष्टींचे आकलन करतो, ती आकलनक्षमता या गोष्टी आजूबाजूला ज्या घटना घडत असतात किंवा वस्तुस्थिती जशी असते त्यावर अवलंबून असतात, असे नाही. बर्‍याच वेळी त्या गोष्टी कशा होत्या, असतील किंवा ते प्रसंग कसे काय घडले असतील, या काल्पनिक प्रतिक्रियेवर अवलंबून असतात. अशाप्रकारे घडत असणारी ही प्रक्रिया आपल्या बौद्धिक आयुष्याचा महत्त्वाचा भाग असते, ज्याला ‘कल्पनाशक्ती’ म्हणतात. वस्तुस्थितीला न नाकारता या कल्पनाविश्वाचा साजेसा वापर करायला शिकणे, हा आपल्या नैसर्गिक वाढीचाच भाग आहे. कल्पना ही आपल्या मनाची अशी कार्यक्षमता आहे की, ज्यायोगे व्यक्ती अनेक संकल्पना, विविध भाव, संवेदना, प्रतिमा वेगवेगळ्या पद्धतीनेे वा दृष्टिकोनातून पाहू शकते किंवा त्यांचा भिन्न अर्थबोध करू शकतो. कल्पनाशक्तीची व्याप्ती प्रचंड आहे, विविध आहे. त्यात जितके शास्त्रशुद्ध विश्लेषण आहे, तितकेच संगीत वा एखाद्या कलेचे विधायक रसग्रहण आहे. यात श्रद्धेचा भाग आहे, इच्छेचा भाग आहे, आकलनशक्तीचा भाग आहे आणि भावनेचाही भाग आहे. आपण दगडात देव पाहतो, तोही विविध रुपांत. कधी गणपती, कधी कृष्ण, कधी लक्ष्मी, तर कधी सरस्वती. या सगळ्या देवीदेवतांची भक्तिभावाने पूजा करताना प्रत्येकाबद्दलचे भाव आणि पूजाविधीसुद्धा विविध पद्धतीने केेले जातात. यामध्ये कल्पनाशक्तीची विविध रुपं आपण पाहतो व ती आचरणांतही आणतो. आपलं मन जे काही विचार करतं, त्यामध्ये आपली कल्पनाशक्ती एखादी अवघड गोष्ट शक्य असल्याचे समर्थन करत असते. आपण ‘सुपरमॅन’चे वागणे, बोलणे या गोष्टी जरी वरकरणी चिरंजिवी वाटल्या, तरी त्या शक्यतेच्या परिघात आहेत, म्हणूनच तर मुलांना आपण त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते. अर्थात, गोष्टींमधील वेताळ, भूत, हडळ वा सैतान या गोष्टी वैज्ञानिकशास्त्रात जरी अस्तित्त्वात नसल्या, तरी अनादीकालापासून माणसाने गूढ विश्वात त्यांचे अस्तित्व स्वीकारले आहे. आज आपण ऑक्सिजनबद्दल दैनंदिन व्यवहारात रोज बोलत आहोत. ‘कोविड’च्या या काळात आपल्याला जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे. शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला ऑक्सिजन म्हणजे काय, हे माहीत आहे. पण, जर माहिती नसती, तर ऑक्सिजनबद्दल आपण काहीतरी वेगळीच कल्पना केली असती. पण, शास्त्र एखाद्या गोष्टीबद्दल चमत्कारिक कल्पना करण्याविषयी मर्यादा घालते. तरीही कल्पनेच्या विश्वात विचार पुढे पुढे सरकत कधी कधी शास्त्र निर्माण होते आणि कधीकाळी अशक्य वाटणार्‍या गोष्टी वस्तुस्थिती बनून शेवटी शास्त्राच्या परिघात जाऊन बसतात, नाहीतर आज कोरोनाच्या जागी आपल्याला जगाचा विध्वंस करणारी विनाशक अनैसर्गिक दुष्टशक्ती दिसली असती. आज आपल्याला माहीत आहे की, कोरोना हा एक नवा विषाणू या जगात आला आहे. काल्पनिक जगही तसे अस्तित्वात आहे. आपण ते मुलांच्या जगात अनेक वेळा पाहतो. मुलांचा वास्तविक जगाचा अनुभव कमी असतो, पण त्यांच्या काल्पनिक जगात मात्र, सुख आणि दु:ख या दोहोंचा अनुभव मुले घेत असतात. आईविना जगणार्‍या बाळाची आई त्याला अंगाई गात झोपवत असते, ती त्याच्या कल्पनेच्या दुनियेतूनच.
 
 
 
कधी कधी आपण आपल्या स्मृतीला कल्पनेची प्रतिकृती मानतो. कधी काळी समुद्रकिनार्‍यावर रमलेल्या प्रसंगांच्या आठवणी जशाच्या तशा आपल्या स्मृतिपटलावर रंगविल्या जातात. कधीकधी आपल्या स्मृतींचा एक कोलाज आपल्या मनात बनतो आणि त्या स्मृतीला एक नवा स्पर्श देऊन जातो, ही खरंतर कल्पनेची सर्जनशीलता आहे. म्हणून तर, कल्पना ही सुपीक आणि विधायक मानली जाते. मन आपल्या जुन्या अनुभवातून एक नवी प्रतिमा निर्माण करत जातं. कल्पना करणं हे मानवी विचारांचा सर्जनशील पैलू आहे. जे कधी आपल्या आयुष्यात घडलंच नाही वा शक्यतेच्या बाजूने कधी घडणार नाही, अशा गोष्टींची कल्पना करणं ही सामान्य बुद्धीला जमणारी गोष्ट नाही, म्हणून तर अशा प्रकारे हाताळलेले अनैसर्गिक चित्रपट लोकांना खूप आवडतात. प्रेक्षक या काल्पनिक जगात रमतात. कारण, ते केवळ विलोभनीय असतं म्हणून नाही, तर त्यात बुद्धीला चालना देण्यासाठी आवश्यक असा थरार असतो, स्फुरण असतं. याहीपेक्षा चित्तवेधक असतं, ते काल्पनिक जगात आपण आपलं अपूर्ण, अर्धवट जग पूर्णत्वाकडे नेतो, त्याचा मनाला खरंतर लाभच होतो. मनाला कठीण परिस्थितीत आधार मिळतो, तो काल्पनिक विचारांतल्या सकारात्मकतेला. अर्थात, कल्पनेतील सृजनक्षमता अस्सल जगात घेऊन जाण्याची खरी प्रज्ञा आहे.
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@