पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी घेतली निवृत्ती, ममतांनी नेमले सल्लागारपदी

31 May 2021 18:41:24
wb_1  H x W: 0



ममता बॅनर्जींचा केंद्राविरोधात संघर्षाचा पावित्रा कायम
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे बदली केलेले पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी सोमवारी निवृत्ती स्विकारली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना आपल्या सल्लागारपद नियुक्त केले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी केंद्र सरकारसोबत संघर्षाच्याच पावित्र्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अवर मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांची आता मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
 
प. बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय हे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ पुढील तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आला होता. त्यानंतर त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या सेवेमध्ये करून त्यांची बदली नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली होती. राज्य सरकारने बंडोपाध्याय यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते.
 
 
 
मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यावरून केंद्र सरकारसोबत संघर्षास प्रारंभ केला. केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हुकूमशहाप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. बंडोपाध्याय यांनी ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता दिल्ली येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सध्याच्या संकटाच्या काळात मुख्य सचिवांच्या सेवेची राज्यास गरज आहे. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करता येणार नाही, असे म्हटले.
 
 
 
त्यानंतर काही वेळातच बंडोपाध्याय यांनी निवृत्ती स्विकारली. त्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी त्यांची नियुक्ती आपल्या सल्लागारपदावर केली. अल्पन बंडोपाध्याय यांना आपण बंगाल सोडू देणार नाही, ते आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार आहेत, त्यामुळे ते दिल्लीत जाणार नाहीत. राज्य सरकारच्या सहमतीशिवाय केंद्र सरकार अधिकाऱ्यांना सेवेत येण्यासाठी बाध्य करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0