तृणमूलच्या नाकावर टिच्चून निवडून आलेली भाजपची 'ही' आमदार चर्चेत

    दिनांक  03-May-2021 13:47:16
|
chandana bauri_1 &nbकोलकत्ता -
पश्चिम बंगालच्या निवडणूकीत तृणमुल काॅंग्रेस विजयी झाला असला, तरी भाजपाच्या एका विजयी उमेदवाराने सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले आहे. सल्तोरा विधानसभेमधून भाजपाच्या ३० वर्षांच्या उमेदवार चंदना बाउरी विजयी झाल्या आहेत. चंदना या एक गरीब रोजंदार कामगाराची पत्नी असून तीन मुलांच्या आई आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३ गायी, ३ बकऱ्या आणि ३१ हजार ९८५ रुपये एवढीच आहे.
 
 
 
 
बांकुरा जिल्ह्यातील सल्तोरा विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोषकुमार मण्डल यांच्या विरोधात चंदना बाउरी या उभ्या होत्या. त्यांनी मण्डल यांचा ४,१४५ मतांच्या फरकांनी पराभव केला. भाजप उमेदवारांच्या यादीत नाव आल्यानंतरच आपल्याला निवडणूकीची उमेदवारी मिळाल्याचे चंदना यांना समजले होते. तोपर्यंत त्यांना आपण निवडणूक लढवणार असल्याची कल्पनाच नव्हती. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी चंदना यांच्यासाठी सल्तोरा विधानसभेत प्रचार केला होता.
 
 
 

कोण आहेत चंदना ?
चंदना बाउरी या तीन मुलांच्या आई आहेत. निवडणूकीच्या प्रचारासाठी त्या आपल्या मुलांना आई आणि सासूजवळ ठेवून घराबाहेर पडायच्या. कधीकधी प्रचारामध्ये त्यांचे पती देखील सहभागी व्हायचे. तिचे पती एका बांधकाम कंपनीत रोजंदारीवर मजुरी करतात. निवडणूक शपथपत्रामध्ये त्यांनी आपली एकूण संपत्ती ३१,९८५ रुपये असून ३ बकऱ्या आणि ३ गायी असल्याचे सांगितले आहे. चंदना या २०१४ पासून सल्तोरा येथे भाजप कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. २०१८ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांच्या वेळी ती ग्रामपंचायत सदस्या झाल्या. त्यानंतर चंदना २०१९ मध्ये भाजपा बांकुरा जिल्हा समितीचे सदस्य झाल्या. चंदनाच्या म्हणण्यानुसार, भाजपामध्ये श्रीमंत किंवा गरीब पाहिले जात नाही. भाजप हा प्रत्येकाचा पक्ष आहे. त्या म्हणाल्या की, भाजपाने मला खूप आदर दिला आहे, त्याबद्दल मी पक्षाचे आभारी आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.