कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आदित्य ठाकरे करत्यात 'ही' तयारी

03 May 2021 18:12:18
aaditya thackeray _1 
मुंबई - मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत जम्बो कोविड केअर सेंटर आणि बालरोग कोविड केअर वाॅर्ड तयार करण्यासंदर्भात चर्चा झाली.
 
 
 
मुंबईतील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे शहरात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांसोबत ठाकरे यांनी बैठक घेतली. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जैसवाल यांच्यासोबत ठाकरेंनी आज चर्चा केली. यावेळीची माहिती ठाकरे यांनी ट्विट करुन दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने मी आज संजीव जैसवाल यांना भेटून मुंबईतील उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली."
 
 
"मी त्यांना सुचवले आहे की, येणाऱ्या पुढच्या लाटेची शक्यता आणि ती लक्ष्य करु शकणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन बालरोग कोविड केअर वाॅर्ड तयार करणे आवश्यक आहे. बालरोग कोविड केअर वाॅर्डबरोबरच पाळणाघरांचे जाळे तयार करण्यामध्येही लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोना बाधित पालकांना त्यांच्या बाधित नसलेल्या पाल्यांना या पाळणाघरांमध्ये ठेवता येईल." असे ठाकरेंनी ट्विटव्दारे म्हटले.
 
 
गेल्या वर्षापासून जंबो कोविड केअर सेंटरमध्ये कोविड पाॅझिटिव्ह डायलिसिस आणि कोविड पाॅझिटिव्ह प्रसूती या सुविधा देण्यात येत आहेत. विषाणू वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना लक्ष्य करतो आहे. त्यामुळे त्यावरील आपला प्रतिसादही सक्रियपणे बदलला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. गेल्या महिन्यामध्ये मुंबईत कोरोना बाधितांमध्ये वाढ झाली. यावेळी खाटांची व आरोग्य सुविधांमध्ये वाढ केल्यामुळेच बाधितांना योग्य सुविधा मिळाली. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही जंबो केअर सेंटरची निर्मिती करुन त्यामध्ये जवळपास ६,५०० आॅक्सिजन बेड आणि १,५०० आयसीयू बेड तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Powered By Sangraha 9.0