तृणमूलच्या हिंसाचारास प्रारंभ, ५ भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2021
Total Views |
wb_1  H x W: 0


राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली गंभीर दखल
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठे यश मिळाले असले तरीदेखीस ममता बॅनर्जींच्या पराभवामुळे पक्ष चांगलाच चवताळला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात भाजपच्या ५ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे बंगाल भाजपने म्हटले आहे. त्यामुळे ममतांच्या हिंसेच्या राजकारणास पुन्हा प्रारंभ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर पुन्हा एकदा हिंसासाराचे थैमान सुरू झाले आहे. तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून पराभव केला आहे. त्यामुळे तृणमूलच्या विजयाला ममतांच्या पराभवाचे गालबोट लागले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अतिशय चवताळले आहेत. त्यांनी रविवारी रात्रीच सुवेंदू अधिकारी यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे तेथे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. निकालानंतर सर्वप्रथम आरामबाग येथील भाजपचे कार्यालयदेखील जाळण्यात आले तर सोमवारी सकाळी नंदीग्राम येथील भाजपचे कार्यालयदेखील फोडण्यात आले. त्याचप्रमाणे कोलकाता येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावरही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
 
 
प. बंगाल भाजपने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये भाजपच्या ५ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. जगदल येथे शोवारानी मोंडल, रानाघाट येथे उत्तम घोष, बेलघाटमध्ये अभिजीत सरकार, दक्षिण सोनारपूर येथे होरोम अधिकारी आणि सितालकुची येथे मोमिक मोइत्रा यांची हत्या झाली असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी भाजपला मत देणाऱ्या नागरिकांच्या घरांवरदेखील हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
या हिंसाराची दखल राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली आहे. त्यांनी त्वरीत राज्याचे पोलिस महासंचालक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले. धनखड ट्विटद्वारे म्हणाले, राज्याच्या विविध भागांमध्ये हिंसा, जाळपोळ आणि हत्येच्या अनेक घटना घडल्या असून त्यामुळे अतिशय चिंतीत आहे. पक्ष कार्यालये, घरे आणि दुकानांना लक्ष्य केले जात असून ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आणि ममता बॅनर्जी यांना तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे, असे धनखड यांनी म्हटले आहे.
 
 
 
भाजपची जबाबदारी वाढली
 
 
बंगालमध्ये भाजपचे ७७ आमदार निवडून आले आहेत, मात्र त्यासाठी शेकडो भाजप कार्यकर्त्यांचे बलिदानही झाले आहे. ममतांना भाजपने दिलेले आव्हान, त्यांचा झालेला पराभव यामुळे तृणमूलचे हिंसक कार्यकर्ते भाजप आमदार, कार्यकर्ते यांच्याविरोधात हत्यासत्र सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला सुरक्षा देणे आणि त्याच्या जीवाची काळजी घेणे ही जबाबदारी भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाकडे आली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@