पाक लष्कराला तालिबानची भीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2021   
Total Views |

Pak Army_1  H x
 
अपयशी राष्ट्र पाकिस्तान सध्या गृहयुद्धात होरपळते आहे. पाकमधील काही शहरांमध्ये लष्कर आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्येच संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे आपल्याच देशातील नागरिकांविरोधात लष्करी कारवाई करण्याची वेळ पाकवर आली आहे. अर्थात, दीर्घकाळपासून भारताविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया करण्याचे प्रयत्न करणार्‍या पाकवर अशी वेळ कधी ना कधी येणारच होती. त्यात सत्ताधारी इमरान खान यांच्याविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी आघाडी उघडली. या आघाडीनेही लष्करालाच थेट लक्ष्य केले. पाकच्या सध्याच्या दुरवस्थेस लष्करच कारणीभूत असून, त्यांनीच अतिशय सुमार दर्जाच्या व्यक्तीला सत्तासूत्रे सोपविल्याचा स्पष्ट आरोप केला जात आहे. यावरून विरोधी पक्षांचा रोख स्पष्ट आहे, त्यांना एकाच वेळी इमरान खान आणि त्यांच्या असलेल्या लष्कराला टार्गेट करायचे आहे.
 
 
कारण, देशात सत्ताबदल करण्यासाठी लष्कराला विरोध हे देखील अतिशय आवश्यक असल्याचे त्यांना आता समजले आहे. पाकमध्ये राजकीय पक्षांनी कितीही उड्या मारण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांची लगाम लष्कर आणि ‘आयएसआय’ नेहमीच आपल्या हातात ठेवत असतो. त्यामुळे आता लष्कराच्या हाती आपले लगाम लागू नयेत, यासाठी तेथील राजकीय पक्ष सज्ज झाले आहे. या सर्व प्रकारामध्ये गोची झाली आहे ती इमरान खान यांची. त्यामुळे त्यांनी पुन्हा ‘इस्लाम खतरे में’ अशी बांग देत युरोपियन राष्ट्रांमध्ये ईशनिंदेचा कायदा लागू व्हावा, असा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामागे ‘शार्ली हेब्दो’ने प्रकाशित केलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राची पार्श्वभूमी आहे. अर्थात, इमरान खान यांना युरोप भीक घालेल, अशी शक्यता अगदीच धुसरच!
 
 
या सर्व पार्श्वभूमीवर पाकमधील प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांनी आपल्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्रात पाक लष्कर आणि तालिबान यांच्यातील संबंध विकोपास गेले असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मतानुसार, पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी रावळपिंडी येथील सैन्य मुख्यालयात इफ्तार पार्टी दिली. त्यात त्यांचे अत्यंत विश्वासू लोक उपस्थित होते, प्रसारमाध्यमांमधील काही लोकही तेथे होते. त्यात त्यांन तालिबानसोबत पाक लष्कराचा समन्वय होत नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे तालिबान आणि भारत हे आपसात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा जनरल बाजवा यांनी केला आहे. अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात असतानाच बाजवा यांनी हा दावा केल्यामुळे त्यास महत्त्व प्राप्त होते.
 
अफगाणिस्तानचा विचार केल्यास तेथे शांतता प्रस्थापित होणे हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यास आर्थिक कारणांसोबतच भूराजकीय कारणेही आहेत. त्यामुळे तेथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत तालिबानसोबत जुळवून घेत असल्याचा दावा बाजवा यांनी केला. भारत आणि तालिबान यांच्यामध्ये समन्वय निर्माण झाल्यास अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानची भूमिका संकटात सापडेल, अशी भीती पाकला आहे. त्यातच गतवर्षी अफगाणिस्तानसाठी अमेरिकेने पाठविलेल्या विशेष प्रतिनिधीने एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. ते म्हणजे, “दहशतवादाविषयी भारताची चिंता अतिशय रास्त आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मुद्द्यावर भारताने थेट तालिबानसोबत चर्चा करावी.” आता हे त्यांचे विधान अतिशय धाडसी असेच होते. मात्र, त्यामुळे पाकला मोठा धक्का बसला होता. कारण, आतापर्यंत अफगाणिस्तान शांती प्रक्रियेमध्ये भारताला बाजूला ठेवण्यात आले होते आणि त्यामध्ये सहभागी होण्याचा भारत दीर्घकाळापासून प्रयत्न करीत होता.
 
 
भारताने आपल्या हितांसाठी जर खरोखरच तालिबानसोबत चर्चा करण्यास प्रारंभ केला आणि काही मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्यास, पाकसाठी ते अडचणीचे ठरणार आहे. कारण, तालिबानने आजवर पाक लष्कराला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पाकतर्फे भारताविरोधात होणार्‍या दहशतवादी कारवायांमध्येही तालिबानचा सक्रिय सहभाग असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे भारताने थेट तालिबानसोबत चर्चा केल्यास पाक लष्कराला तालिबानचे असलेले पाठबळ डळमळीत होऊ शकते. तसे झाल्यास पाकमधील राजकीय पक्षदेखील लष्कराला अधिक जोरकसपणे झुगारून देतील आणि लष्कराला खर्‍या अर्थाने झटका बसेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@