कोकणसुपुत्राची ‘कोरोना’विरोधातील तांत्रिक लढाई

    दिनांक  03-May-2021 22:58:18   
|

Jagdish kolekar_1 &n
 
 
 
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या ज्ञान-कौशल्याचा उपयोग करणारे जगदीश कोळेकर हे आधुनिक तंत्रज्ञान युगाचे लोक तपस्वीच आहेत. त्यांच्याविषयी...
 
 
‘व्हायरोकिल’ हे उपकरण असे आहे की, घरातले सर्वच प्रकारचे विषाणू मारण्याची त्याची क्षमता आहे. अगदी कोरोनाचा विषाणूही मारण्याची क्षमता आहे. मारण्याची यासाठी म्हणायचे की, एका खोलीत ‘व्हायरोकिल’ उपकरण लावले की, काही तासांनी ती खोली पूर्ण विषाणूरहित होते. विषाणूमुक्त; पण आरोग्यदायी हवा आणि वातावरण या उपकरणाने तयार होते. या उपकरणाच्या या सर्वोत्तम फायद्याला प्रमाणित आणि या क्षेत्रातील अधिकारी असलेल्या प्रयोगशाळेनेही मान्यता दिली आहे. हे उपकरण बनवणारे कोण आहेत? तर सध्या ठाण्यात राहणारे; पण मूळचे राजापूर आणि नंतरचे चिपळूणचे जगदीश कोळेकर.
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि गेल्या वर्षी साधारण मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सना कोरोनाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगदीश यांनी ठरवले की, आपल्या देशबांधवांना नव्हे, तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ नात्याने जगभरातल्या नागरिकांना कोरोनाला मात करण्यासाठी मदत करायची. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला आपली माहिती आणि इच्छा कळवली. काही दिवसांतच जगदीश यांना त्यासंबंधी सकारात्मक उत्तरही प्राप्त झाले. जगदीश आणि त्यांची पत्नी सुलभा ज्या स्वत:ही उद्योजक आहेत, हे दोघे जे काही साहित्य आहे, ते घेऊन त्यांच्या डोंबिवलीच्या कंपनीत निवासालाच गेले. पूर्वी जगदीश लहान मुलांची कावीळ आणि विषाणू यांच्या प्रतिरोधासाठी एक उपकरण तयार करायचे. पुढे ‘डी-३’ जे जीवनसत्व नैसर्गिकरीत्या सूर्यप्रकाशाद्वारे मिळते, त्याचे किरण विशिष्ट बल्बद्वारे कृत्रितरीत्या तयार करण्याचे कामही जगदीश यांनी केले. हे विशिष्ट बल्ब ते दक्षिण कोरियातून मागवायचे. मात्र, ज्यावेळी दक्षिण कोरियाला या शोधाविषयी कळले, त्यावेळी त्यांनी हे बल्ब जगदीश यांना विक्री करणे बंद केले. असो. त्यामुळे कोरोना आणि इतरही विषाणू मारण्यासाठी असेच काही उपकरण तयार करण्याचे जगदीश यांनी ठरवले आणि जवळ-जवळ दहा महिन्यांनी त्यांना त्यात यशही आले. ‘व्हायरोकिल’ हे उपकरण अवघे साडेचार हजारांचे आहे. हे उपकरण बनवण्याचा दुसरा हेतू हा की, अशाच प्रकारची उपकरणं जगभरातही तयार झाली आहेत. पण, त्यांची किंमत २५ हजारांच्या खाली नाही. सर्वसामान्यांनाही कोरोनाकाळात कमी किमतीत सुरक्षा मिळावी, यासाठी त्यांनी ‘व्हायरोकिल’ उपकरण बनवले.
 
 
जगदीश यांच्या जीवनाचा मागोवा घेतल्यावर दिसते की, माणसाला त्याची संस्कृती आणि आजूबाजूचे संस्कार घडवत असतात. जगदीश यांचे वडील चिंतामण हे प्राथमिक शिक्षक, तर आई मंगला गृहिणी. शिंपी समाजाचे हे कुटुंब अतिशय सुसंस्कृत आणि तितकेच समाजशील. जगदीश यांचे दोन मामा डॉक्टर, तर दोन मामा इंजिनिअर्स. जगदीश यांना लहानपणापासून वाटे की, आपण इंजिनिअर व्हावे. लहानपणी एक घटना घडली. घरातल्या लाकडी सामानांना वाळवी आणि तत्सम कीटकांपासून वाचवण्यासाठी त्यांना डांबर लाववायचे ठरले. जगदीश यांना वाटले की, डांबरात रॉकेल टाकण्याऐवजी डांबराला उकळून घेऊ म्हणजे ते वितळेल. दिवसभराचे काम चार तासांत होईल. त्यांनी डांबर उकळवले. लाकडी सामानांना व्यवस्थित भराभर लावू लागले. पण, हे करताना उकळत्या डांबराचा एक थेंब त्यांच्या हातावर पडला आणि ते संपूर्ण डांबर जगदीश यांच्या अंगावर पडले. आई-बाबा पटकन धावत आले. पण, एका शब्दाने त्यांना काही बोलले नाहीत. ‘तू बरा होशील’ म्हणत धीर देत राहिले. त्यावेळी ते सातवीत होते. या प्रसंगातून जगदीश यांना संदेश मिळाला की, कल्पना कितीही चांगली असली तरी ती प्रत्यक्षात किती उपयुक्त आहे आणि किती सोप्या पद्धतीने कार्यरत करता येते, हे महत्त्वाचे. पुढे आठवीला गेल्यानंतर त्यांना वाटू लागले ते स्वतः चार बहिणी, आई, आजी आणि आत्या या सगळ्यांना सांभाळताना वडिलांची फरपट होते. जगदीश यांचे काका फोटोग्राफर होते. जगदीश त्यांच्याकडून एका महिन्यात फोटोग्राफी शिकले. फोटोग्राफीच्या ऑर्डर घेऊ लागले. त्या गावात वसंत शेंबेकर नावाचे बडे प्रस्थ होते. ब्राह्मण आणि अतिशय श्रीमंत. त्यांचा लाकडाचा व्यवसाय होता. जगदीश सहजच लाकडांची संख्या लांबी, रुंदी मोजण्यासाठी त्यांना मदत करत. वसंतरावांनी जगदीश यांना बोलावले म्हणाले, “तू, कुणाच्या कॅमेर्‍याने फोटो काढतोस.” जगदीश म्हणाले, “मित्राच्या.” तर ते म्हणाले, “तू, स्वतः का घेत नाहीस.” काही न बोलता वसंतरावांनी ५५० रुपये जगदीश यांच्या हातात दिले आणि सांगितले, “उद्या तुझ्या कॅमेर्‍याने फोटो काढ.” इतकेच नाही तर त्यांनी गावातल्या सगळ्यांना जगदीश यांच्याकडून कार्यक्रमाचे फोटो काढा, असा आदेशच दिला. पुढे जगदीश वसंतरावांना परत पैसे द्यायला गेले, तर डोळ्यात आनंदाश्रू आणत वसंतरावांनी ते पैसे जगदीश यांच्या हातात पुन्हा देत म्हणाले, “खूप मोठा हो, गावाचं नाव काढ.” जगदीश म्हणतात, “माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली ती बापूंकडून म्हणजे वसंतरावांकडून, जे एक अतिशय निष्ठावान आणि साधनसूचिता पाळणारे संघ स्वयंसेवक होते.”
 
 
बारावीनंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते ठाण्याला मामांकडे आले. माटुंग्याच्या ‘व्हीजेटीआय’मध्ये प्रवेश मिळाला. एक-दोन वर्षे दिव्याच्या आत्याकडे राहिले. तिथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. पण, त्याचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांना एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. पुढे ‘कंट्रोलस अ‍ॅण्ड सिस्टीम’ नावाने त्यांनी कंपनी सुरु केली. प्रचंड मेहनतीने व्यवसायात जम बसवला. आता त्यांचा मुलगा व्यवसाय सांभाळतो, तर जगदीश म्हणतात की, “मला आता निवांतपणे मानवी जगण्यासाठी उपयुक्त असणार्‍या संशोधनाला पूर्णत: वाहून घ्यायचे आहे. अशा या माणसाच्या कल्याणासाठी कौशल्याचा वापर करणार्‍या जगदीश कोळेकर यांना शुभेच्छा.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.