भारतातील पहिल्या वन्यजीव 'अंडरपास'मधून वाघांचा वावर १२७ टक्क्यांनी वाढला

    दिनांक  03-May-2021 20:43:10
|
tiger_1  H x W:
मुंबई (प्रतिनिधी) - 
'एनएच-४४' महामार्गावर 'नागपूर ते शिवनी’ दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालींसाठी बांधण्यात आलेल्या 'अंडरपास’मधून वाघांच्या हालचालीमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२० साली १२७ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच 'अंडरपास’मधून वावरणाऱ्या वन्यजीवांच्या संख्येतही १९३ टक्के वाढ झाली आहे.
 
 
’राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडून उभारण्यात आलेला ’एनएच-४४’ महामार्ग महाराष्ट्रामधून पेंचच्या जंगलाला छेदून जातो. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीवेळी वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीच्या दृष्टीने त्यावर काही बांधकाम करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही या मागणीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाला वन्यजीवांच्या दृष्टीने काही बांधकाम उभारण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी प्राधिकरणाने 'भारतीय वन्यजीव संस्थान’मधील (डब्लूआयआय) तज्ज्ञांच्या मदतीने या महामार्गावर काही बांधकाम केले. यामध्ये ८० ते ७५० मीटर आकाराचे नऊ अंडरपास बांधण्यात आले. अंडरपास म्हणजे महामार्ग उन्नत स्वरूपाचा बांधून त्याखालून वन्यजीवांना सुरक्षित हालचाल करण्याची सोय निर्माण करून देणे. कान्हा ते पेंच राष्ट्रीय उद्यानादरम्यानचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेले हे भारतातील पहिलेच 'अंडरपास’ आहेत.


भारतीय वन्यजीव संस्थानकडून (डब्लूआयआय) ’एनएच-४४’च्या अंडरपासमधून वावरणाऱ्या वन्यजीवांच्या सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येते. 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२० मध्ये वन्यजीवांच्या २१ प्रजातींनी ’एनएच-४४’च्या अंडरपासचा वापर केला आहे. यामध्ये वाघ, लांडगे, रानकुत्रे, चितळ, चौशिंगा, गवे, खवले मांजर इ. प्रजातींचा समावेश आहे. २०१९ मध्ये ही प्रजातींची ही संख्या १८ होती. २०१९ मध्ये वाघांनी १५५ वेळा या अंडरपासचा वापर केला होता. २०२० मध्ये वाघांकडून अंडरपास वापर ३५२ वेळा करण्यात आला. २०१९ मध्ये ३७ वेळा बिबट्यांनी या अंडरपासचा वापर केला होता. २०२० मध्ये हीच संख्या १६७ होती. अंडरपासमधून वन्यजीवांच्या एकूण वावराचा विचार केल्यास, २०१९ मध्ये ५,६७५ वेळा वन्यजीवांनी अंडरपासाचा वापर केला होता. २०२० मध्ये वापराच्या या संख्येत वाढ होऊन ती १६,६०८ झाली आहे.
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.