अमेरिकेतील दुसऱ्या विश्व मल्लखांब स्पर्धेचा बिगुल वाजला

    दिनांक  28-May-2021 15:59:36
|

news _1  H x W:


मुंबई : २०१९ मध्ये मुंबईत झालेल्या मल्लखांबाच्यापहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताबाहेरील १५ देशांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता आणि समारोपाच्या वेळेस विश्व मल्लखांब संघटनेचा ध्वज पुढच्या स्पर्धेसाठी मल्लखांब फेडरेशन यू. एस्. ए. चे प्रतिनिधी ओंकार देशपांडे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला होता. दर दोन वर्षांनी होणार असलेली मल्लखांबाची ही विश्व अजिंक्यपद स्पर्धा अमेरिकेत खरं तर २०२१ साली होणार होती, पण अकस्मात उद्भवलेल्या कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे ही स्पर्धा आता नियोजित वेळेपेक्षा एका वर्षानी पुढे म्हणजे सप्टेंबर २०२२ मध्ये मल्लखांब फेडरेशन यू. एस्. ए. यांच्या वतीने अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी होणार आहे.
 
 
संयोजन सचिव श्री. चिन्मय पाटणकर, अमेरिकन मल्लखांब फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. प्रज्ञा पाटणकर व अमेरिका-कॅनडा मधील अनेक माजी मल्लखांबपटू, प्रशिक्षक, पालक या त्यांच्या चमूने कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल काळातही ज्या उमेदीने, उत्साहाने व चिकाटीने या दुसऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेची तयारी सुरु केली आहे, त्याला तोड नाही
 
.
मल्लखांबाच्या पहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या १५ देशातील तसेच काही कारणानी सहभागी होऊ न शकलेल्या अनेक देशातील प्रतिनिधींची मल्लखांब फेडरेशन यू. एस्. ए. नी नुकतीच ‘ऑनलाईन व्हर्च्युअल किक ऑफ मीटिंग’ घेतली होती. त्या ‘झूम’ बैठकीला मेक्सिको, कॅनडा, फ्रांस, यू. के., नेपाळ, बांगला देश, मलेशिया, जपान, सिंगापूर, अमेरिका, भारत, ब्राझील तसेच पोलंड या देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर होते. विश्व मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार तसेच महासचिव श्री. उदय वि. देशपांडे यांनाही या बैठकीस निमंत्रित करण्यात आले होते.
 
 
संयोजन सचिव श्री. चिन्मय पाटणकर हे मल्लखांबाचा ध्यास घेतलेले मूळचे पुण्यातील राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मल्लखांबपटू असल्याने व गेली २० वर्षे अमेरिकेत स्थायिक असून संगणकीय क्षेत्रात नोकरी करीत असल्याने तेथेही अव्याहतपणे मल्लखांबाची पाळेमुळे रुजविण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न चालविला आहे.
त्यांनी पुढील सोळा महिन्यातील दुसऱ्या विश्व मल्लखांब स्पर्धेच्या वाटचालीतील,
 
 
१. शुभारंभ तसेच मल्लखांब प्रेमी मंडळींचे एकत्रीकरण (जून ते डिसेंबर २०२१),
  
२. क्रीडा ज्योत, सर्व सहभागी देशात एका आठवड्याचे मल्लखांब शिबीर (जानेवारी २२ ते जून २०२२),
३.न्यूयॉर्क रोड शो, अमेरिकेत ‘युनो’च्या तसेच विविध दूतावासांच्या कार्यालयांसमोर मल्लखांब प्रात्यक्षिके (ऑगस्ट २०२२),
४. सांस्कृतिक प्रदर्शन, दुसरी विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा (सप्टेंबर २०२२).
५. श्रमपरिहार, आभार प्रदर्शन (सप्टेंबर २०२२ ), अशा प्रत्येक टप्प्याची माहिती सुरेख द्रृक्श्राव्य सादरीकरणाद्वारे करून दिली.
 
 
सहभागी देशातील मल्लखांबपटुंना अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा मिळवून देण्याचे प्रयत्न,त्या त्या देशांमध्ये मल्लखांब क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत, ‘ग्लोबल इंश्युरंस’चे सहकार्य, अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मौलिक माहिती दिली. ‘इमिग्रेशन’ साठी संजय मुळ्ये,वृत्त प्रसिद्धीसाठी मुक्ता प्रधान, माध्यम संपर्कासाठी अमित यादव, संगणकीय कामासाठी स्वप्निल खेसे, जनसंपर्कासाठी महेश वाणी, प्रत्येक सहभागी देशातील एका आठवड्याच्या मल्लखांब कार्यशाळेसाठी रुपेश कुलकर्णी, प्रात्यक्षिकांचे नियोजन - जयदेव अट्टा, सेलेब्रिटीज संपर्क - शैलेश शेट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम - दीप्ती बक्षी, नियम आणि प्रशासकीय कार्य - नीरज नारगुंद, स्पर्धा स्थळ - अनंत चौधरी आणि न्यूयॉर्क मधील आगमन - स्वतः चिन्मय पाटणकर, अशी कार्यकर्त्यांची भक्कम फळीच त्यांनी यावेळेस जाहीर केली.
 
 
या पहिल्या ‘किक ऑफ मिटींग’ला उपस्थित असलेल्या तेरा देशांखेरीज पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भाग घेणारे स्पेन, झेक रिपब्लिक, इटली, नॉर्वे, जर्मनी, व्हिएतनाम, बहारीन, हे देश या दुसऱ्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेलाही संघ पाठवतील आणि ऑस्ट्रिया, मॉरीशियस, साउथ आफ्रिका, रशिया, हॉंगकॉंग, लिथुएनिया, आयर्लंड, ग्रीस,अर्जेन्टिना, व्हेनेझुएला, स्लोवेनिया, फिलिपाईन आणि भूतान असे अनेक देश या दुसऱ्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.